फसव्‍या चीनच्‍या तकलादू छत्र्या !

‘चीनची शेपूट वाकडी ती वाकडीच’, याचा अनुभव मला नुकताच आला. तो अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाजवळ गेल्‍यावर नवीन प्रकारच्‍या आणि पुष्‍कळ मोठा घेर असलेल्‍या छत्र्यांची विक्री चालू होती. तेथे गेल्‍यानंतर २ प्रकारच्‍या छत्र्या दिसल्‍या. त्‍यातील एकाचे मूल्‍य ४०० रुपये, तर दुसर्‍या प्रकाराचे ३५० रुपये होते. हे मूल्‍य अधिक वाटल्‍याने मी पुढे गेलो, तर तेथे अनेक ठिकाणी या नवीन छत्र्यांचे वितरण कक्ष लावले होते. त्‍यानंतर दादर रेल्‍वेस्‍थानकाजवळ या छत्र्यांचे मूल्‍य ‘४५० ते ५०० रुपये’ होते. या ठिकाणी एक युवक तशीच छत्री उघडून उभा होता. त्‍याची छत्री एका बाजूने मोडल्‍यासारखी दिसली. तो युवक मला म्‍हणाला, ‘‘दादा, ही छत्री घेऊ नका. मी ही छत्री विकत घेतल्‍यावर १५ दिवसांतच मोडली आहे. ही चिनी छत्री आहे.’’ हा तरुण एक प्रकारे ‘चिनी छत्री घेऊ नका’, याचे प्रबोधन करत होता; परंतु पैशांच्‍या लोभापायी अंध झालेल्‍या वितरकाने त्‍याला खडसावले. त्‍यांच्‍यात शाब्‍द़िक चकमक उडाली. तेव्‍हा भारतियांमध्‍येच स्‍वाभिमान नाही, हे लक्षात आले.

दादरच्‍या बाजारपेठेत या छत्रीचा वापर करणार्‍यांना मी विचारल्‍यावर त्‍यांनी ‘ही छत्री घेऊ नका, चीनची आहे, तकलादू आहे’, असे सांगितले. तेव्‍हा आकर्षक आणि मोठ्या वाटणार्‍या चिनी छत्रीचे खरे स्‍वरूप माझ्‍या लक्षात आले. या छत्र्यांचा प्रकार वरकरणी नवीन आणि चांगल्‍या बांधणीच्‍या दिसल्‍या, तरी त्‍या तकलादूच आहेत.

महाराष्‍ट्रात मिळणार्‍या बर्‍याच देशी छत्र्या भिवंडी येथे बनतात. या छत्र्यांसाठी लागणारा कच्‍चा माल या वर्षी तेवढ्या प्रमाणात उत्‍पादकांना मिळाला नाही, असे समजले परिणामी झटपट सिद्ध होणार्‍या आणि आतील सांगाडा फायबरच्‍या असलेल्‍या चिनी छत्र्यांनी ही संधी साधली अन् त्‍यांची मोठ्या प्रमाणात आवक मुंबई आणि उर्वरित महाराष्‍ट्रातील बाजारपेठेत वाढली. ‘स्‍टायलीश’ दिसण्‍याच्‍या सध्‍याच्‍या काळात ही छत्री समवेत असणे भूषणावह समजून अनेकांनी त्‍या विकत घेतल्‍या खरे; मात्र अनेकांना अधिक मूल्‍याच्‍या या छत्र्या घेऊन पश्‍चात्ताप होत आहे. चीन भारतीय बाजारपेठेतील एक एक वस्‍तूची जागा कशा प्रकारे बनावट उत्‍पादन आकर्षक आणि अल्‍प मूल्‍यात सिद्ध करून घेऊन भारतियांची फसवणूक करत आहे, हे पुन्‍हा एकदा लक्षात येते. अशा चीनला भारतीय बाजारपेठेत येऊ न देणे, असेच करायला हवे. त्‍यासाठी भारतियांनी स्‍वदेशी वस्‍तू घेण्‍यालाच प्राधान्‍य द्यावे !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.