सरंद (तालुका संगमेश्वर) गावातील लोखंडी साकव वाहून गेला : अनेक वाड्या आणि आंबव गावाचा संपर्क तुटला

संगमेश्वर – रत्नागिरी जिल्ह्यात मागील १५ दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील माखजन परिसरालाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे आलेल्या जोरदार पाण्यामुळे सरंद गावातील जाधववाडी येथील ओढ्यावर असणारा लोखंडी साकव तुटून वाहून गेला. त्यामुळे अनेक वाड्यांचा, तसेच आंबव गावचा संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार आहे.

अनुमाने २० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य श्रीधर फणसे यांच्या प्रयत्नाने हा लोखंडी साकव बांधण्यात आला होता. या साकवाचा उपयोग संगमेश्वर तालुक्यातील सरंद आणि आंबव गावातील लोकांना, तसेच विद्यार्थ्यांना होत होता. जुन्या झालेल्या या साकवाची दुरुस्ती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक जाधव यांनी पाठपुरावा केला होता; मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. (पूल दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन जनहित राखील का ? – संपादक)


संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ४० मि.मी. पाऊस

रत्नागिरी, ३१ जुलै – जिल्ह्यात गेल्या २४ तासात संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २१.४४ मि.मी. पाऊस झाला असून एकूण १९३ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अनुक्रमे आजपर्यंत झालेली पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. मंडणगड- १० (२,५९६), दापोली- ३२ (२,७३०), खेड- १६ (१,८६३), गुहागर- १३ (१,५४४), चिपळूण- २२ (२,३८९), संगमेश्वर- ४० (२,१४९), रत्नागिरी -१५ (१,६२७), लांजा – २८ (२,३४३) आणि राजापूर- १७ (२,२५७) असा पाऊस झाला आहे.