सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेल्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी घडणारे कालपरिवर्तन !

१. ‘सध्‍या भारतातील जागृत मंदिरांतील चैतन्‍य वाढत आहे. जनसमुदायाची देवावरील श्रद्धा आणि भक्‍तीही वाढत आहे. तरुण पिढी ईश्‍वराकडे आकर्षित होत आहे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी यापूर्वी म्‍हटले आहे, ‘भारतियांचे रक्षण होण्‍यासाठी आध्‍यात्मिक ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्‍यासाठी प्रत्‍येकाने ईश्‍वराचा धावा करणे आवश्‍यक आहे. ’

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

२. बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍यासारखे द्रष्‍टे देशात कार्यरत होत आहेत. ते जनसमुदायाला ईश्‍वर आराधनेची प्रेरणा देत आहेत. त्‍यांच्‍या सोहळ्‍यात लाखो लोक सहभागी होतात. ‘हा एक ईश्‍वरी संकल्‍प आहे’, असे मला वाटते. पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍यावर श्री हनुमंताची कृपा आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या माध्‍यमातून श्री हनुमंताचे अस्‍तित्‍व लोकांना जाणवते. यातून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात जागृत होत आहे.

३. पंडित धीरेंद्र शास्‍त्री हे पत्रकारांना हिंदु राष्‍ट्राविषयी अचूक उत्तरे देत आहेत. ते लोकांच्‍या रुढी, चालीरिती, धर्म यांविषयी शंकानिरसन करत आहेत. ते भक्‍तांच्‍या मनातील विचार अचूकपणे ओळखून त्‍याविषयीचे शंकानिरसन कोणतीही अपेक्षा न ठेवता करत आहेत. ते सगळ्‍या गोष्‍टींचे श्रेय हनुमंताला देतात. यामुळे ‘भारतीय संस्‍कृतीचा पगडा पुन्‍हा स्‍थापन होण्‍यास आरंभ झाला आहे’, असे मला वाटते.

४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही पूर्वीपासून ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र होईल’, असे सांगत आहेत. त्‍याचाच हा प्रारंभ आहे ! पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍याप्रमाणे अन्‍य संतही अशाच प्रकारे मोठ्या प्रेरणेने कार्यान्‍वित होत आहेत. यातूनच काल (काळ) परिवर्तन होत असल्‍याचे लक्षात येते. पंडित धीरेंद्र शास्‍त्री हे प्रसारमाध्‍यमांनाही दैवी शक्‍तीची जाणीव करून देतात. हे सर्व पहाता ‘संतांच्‍या आशीर्वादामुळेच आगामी काळात भारत जगामध्‍ये आध्‍यात्मिक क्षेत्रात उच्‍च स्‍थानी असेल. विश्‍वशांतीसाठी हे आवश्‍यक आहे’, असे वाटते.

५. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. हिंदु राष्‍ट्र येणार, त्‍या दृष्‍टीने ईश्‍वर आणि गुरु सिद्धता करून घेतात.

आ. रामराज्‍य आणण्‍यासाठी श्री मारुतिराय साहाय्‍य करतात.

. सर्वसाधारण जनतेच्‍या मनात ईश्‍वराप्रती गोडी निर्माण व्‍हावी, यासाठी संत निर्माण होतात आणि ते जनजागृती करतात.

ई. ईश्‍वरी कार्यात आपण सहभागी व्‍हावे; कारण ही एक पर्वणी आहे.

उ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या शिकवणीमुळे आपल्‍याला त्‍याची जाणीव होते. त्‍यामुळे आपण सत्‌सेवेत सहभागी होऊ शकतो. ही त्‍यांची कृपाच आहे.

ऊ. भारतच विश्‍वात शांती स्‍थापन करू शकतो; कारण ती संतांची भूमी आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्‍हाला या सर्व सूत्रांची पूर्वीच जाणीव करून दिली असून ते आमच्‍याकडून साधना करून घेतात. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी, फोंडा, गोवा. (२.४.२०२३)