ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी सुनावले
नवी देहली – भारताचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सध्याच्या क्रिकेट खेळाडूंवर टीका केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाच्या ‘वेक अप इंडिया’ या मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, काही वेळा अधिक पैसा असण्याने अहंकार निर्माण होतो. सध्याच्या युगातील खेळाडू पैशांच्या गर्वात इतके बुडाले आहेत की, त्यांना त्याच्यापुढे देश वगैरे काहीही दिसत नाही. त्यांना भारत जिंकला काय किंवा हरला काय, काहीही फरक पडत नाही. ‘हा विश्वचषक नाही जिंकू शकलो, तर पुढचा आहेच’, या मानसिकतेने ते सध्या खेळत आहेत; कारण मोठ्या स्पर्धेनंतरही कुठल्याही खेळाडूंवर दायित्व निश्चित केले जात नाही. त्यांना ठाऊक आहे की, संघातून कुणीही त्यांना बाहेर काढू शकत नाही आणि काढलेच, तर आयपीएल् स्पर्धा आहेच ‘.
भारत की शर्मनाक हार पर भड़के पूर्व कप्तान Kapil Dev, कहा- “खिलाड़ियों को पैसों का अहंकार” #IndVsWi #KapilDev #IndianPlayer #Cricket https://t.co/KXUSrqy7DV
— Dainik Jagran (@JagranNews) July 30, 2023
सध्याच्या खेळाडूंना वाटते ‘आपली कधी चूक होऊच शकत नाही’ !
कपिल देव पुढे म्हणाले की, काही वरिष्ठ खेळाडू किंवा युवा खेळाडू माजी खेळाडूंचा सल्ला घेत नाहीत आणि खेळतांना तीच चूक पुनःपुन्हा करतात. या खेळाडूंची चांगली गोष्ट म्हणजे ते फार आत्मविश्वासू आहेत. त्यांची नकारात्मक बाजू, म्हणजे त्यांना वाटते की त्यांना सर्व काही ठाऊक आहे. ‘आपली कधी चूक होऊच शकत नाही’, असेही त्यांना वाटते, तसेच ‘मी यापेक्षा चांगला कसा खेळू शकतो ?’ असा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही.
सुनील गावसकर यांचा सल्ला का घेत नाही ?
कपिल देव यांनी सल्ला घेण्याविषयी सांगितले की, या खेळाडूंना कुणाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. आमच्या पिढीत आणि आताच्या पिढीत हाच भेद आहे. मी म्हणेन की, असे बरेच क्रिकेटपटू आहेत, ज्यांना साहाय्याची आवश्यकता आहे. सुनील गावसकर यांच्यासारखा दिग्गज खेळाडू तुमच्याजवळ असतांना तुम्ही त्यांच्याशी का बोलू शकत नाही ? तुमचा अहंकार कुठे आडवा येतो ?
पूर्वीचे खेळाडू सल्ला घेत होते ! – सुनील गावसकर
माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर नुकतेच एका मुलाखतीत म्हणाले होते की, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस् लक्ष्मण, सौरव गांगुली यांच्यासारखे दिग्गज खेळाडू माझ्याकडे नियमित यायचे. ते माझ्याकडे विशिष्ट समस्या घेऊन यायचे आणि मी त्यांना ‘ते नेमके कुठे चुकत आहेत’, हे सांगत होतो. मला यात कोणताही अहंकार नव्हता किंवा त्यांनाही संकोच वाटत नव्हता. मी आताच्या खेळाडूंशी जाऊन बोलू शकत असतो; पण सध्या भारतीय संघासाठी राहुल द्रविड आणि विक्रम राठौर हे २ प्रशिक्षक असल्यामुळे, खेळाडूंना अधिक माहिती देऊन गोंधळात टाकू इच्छित नसल्यामुळे मी त्यांना भेटण्याचे टाळतो.