गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

‘सेव्ह गोवा-सेव्ह टागयर’ संघटनेची पणजी येथे पत्रकार परिषद

पणजी, २९ जुलै (वार्ता.) – म्हादईच्या रक्षणासाठी म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र असे न करता न्यायालयात हेलपाटे मारण्यासाठी जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला म्हादईवर कळसा-भंडुरा प्रकल्प पुढे नेता येणार नाहीत. ‘सेव्ह गोवा-सेव्ह टागयर’ संघटना म्हादईच्या रक्षणासाठीचा लढा चालूच ठेवणार आहे, अशी माहिती ‘सेव्ह गोवा-सेव्ह टागयर’ संघटनेचे संयोजक राजन घाटे यांनी दिली. पणजी येथे आझाद मैदानात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजन घाटे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर, प्रतिमा कुतिन्हो आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राजन घाटे पुढे म्हणाले, ‘‘लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी. याउलट ‘हा प्रश्न सर्वाेच्च न्यायालयात नेणार’ असे सांगून निसर्गाच्या विरोधात काम करणारे वनमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून वनमंत्रीपद काढून घ्यावे, तसेच वनमंत्री विश्वजीत राणे यांना पाठिंबा देणार्‍या त्यांची पत्नी तथा आमदार डॉ. दिव्या राणे यांच्याकडून वनविकास महामंडळ काढून घ्यावे.’’

वाघांचे गोव्यातील जंगलात प्राचीन काळापासून वास्तव्य ! – प्रा. राजेंद्र केरकर

प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘गोव्याला वाघ नवीन नाहीत. वाघांचे येथील जंगलामध्ये प्राचीन काळापासून वास्तव्य आहे. गोव्यात काही गावांची नावेसुद्धा वाघांच्या अस्तिवाशी जुळलेली आहेत. फोंडा तालुक्यात ‘वाघुर्मे’ (सावईवेरे) आणि सत्तरी येथे ‘वाघूरे’ अशी गावांची नावे आहेत. याखेरीज सत्तरी तालुक्यात असलेला ‘वाघेरी’ डोंगर, पाळी येथील ‘वाघबिळ’, साट्रे येथील ‘वाघाची होवरी’, श्रीस्थळ-काणकोण येथील ‘वाघाहन्न’ (गुहा), खोतीगाव येथील ‘वाघा डोंगर’ या जागाही वाघांशी संबंधित आहेत. गोव्यात वाघांची शंभरहून अधिक देवळे आहेत. धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या तालुक्यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. स्वातंत्र्यानंतर अनियंत्रित शिकारीमुळे वाघांची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आली आहे.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा