आतंकवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे अन्वेषणात उघड !
पुणे – ए.टी.एस्.ने (आतंकवादविरोधी पथकाने) पुण्यातील आतंकवादी कटाच्या अन्वेषणात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्यांच्या मुसक्या आवळायला चालू केले आहे. २ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपावरून या आतंकवाद्याला २९ जुलै या दिवशी अटक करण्यात आली आहे. पुण्यात रहात असलेल्या २ आतंकवाद्यांना आणि त्यांच्यासह पळून गेलेल्या एकाला रात्री पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी या आरोपीने साहाय्य केल्याची माहिती आहे. त्याची पोलीस कोठडीही घेण्यात आलेली आहे.
२९ जुलै या दिवशी ए.टी.एस्.ने त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर आतंकवाद्यांशी त्याचा संबध असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे ए.टी.एस्.ने त्याला अटक केली आहे. तसेच परराज्यातील एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे. युसूफ खान आणि याकूब साकी यांच्यासह असणारा तिसरा आरोपी शहानवाझ आलम अजूनही पसार आहे. ए.टी.एस्.कडून त्याचा शोध चालू आहे.