श्री. अभय वर्तक कोरोनाने रुग्‍णाईत असतांना त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, मी कोरोनाबाधित झाल्‍यावर आपल्‍या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आहे. या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. कणकण जाणवल्‍यावर कोरोनाची चाचणी करणे आणि प्रकृती चांगली असल्‍यामुळे दुसर्‍याच दिवशी देहली येथे जाण्‍याचा निर्णय घेणे

श्री. अभय वर्तक

मी पनवेल येथे असतांना मला किंचित् खोकला आणि थोडी कणकण जाणवत होती. लगेचच मी कोविड केेंद्रात जाऊन माझी कोरोनाची चाचणी केली. दुसर्‍याच दिवशी मी देहली येथे आगगाडीने जाणार होतो. माझी प्रकृती चांगली होती आणि अन्‍य कुठलीही लक्षणे नव्‍हती. त्‍यामुळे मी देहली येथे जाण्‍याचा निर्णय घेतला.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२ अ. समवेत अधिक सामान असल्‍यामुळे देहली सेवाकेंद्रात जाण्‍यासाठी भाड्याने गाडी करावी लागणे आणि त्‍यामुळे न्‍यायला आलेल्‍या साधकापासून आपोआपच दूर रहाता येणे : ‘माझ्‍यामुळे अन्‍य साधकांना त्रास होऊ नये’, हा एकच विचार माझ्‍या मनात सतत येत होता. आगगाडी स्‍थानकावर एक साधक मला नेण्‍यासाठी आले होते; पण माझ्‍या समवेत पुष्‍कळ साहित्‍य असल्‍यामुळे मला भाड्याने ‘टेंपो’ ठरवावा लागला; म्‍हणून मी भाड्याच्‍या गाडीत बसलो. त्‍यामुळे मला न्‍यायला आलेला साधक माझ्‍यापासून आपोआपच दूर राहिला.

२ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे आणि त्‍यामुळे ‘स्‍वतःवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण नष्‍ट होऊन मृत्‍यूच्‍या दाढेतून बाहेर पडलो’, असे जाणवणे : मी देहली येथे पोचल्‍यावर कोरोनाच्‍या काळातील कार्यपद्धतीनुसार विलगीकरण कक्षात रहात होतो. १.१.२०२१ या दिवशी मी विलगीकरणात रहात असलेली सदनिका पहाण्‍यासाठी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्‍या होत्‍या. मला दुरून त्‍यांचे दर्शन झाले. ‘मला त्‍यांचे दर्शन होणे’, ही देवाची लीलाच होती. त्‍या वेळी ‘मला कोरोना झाला आहे’, हे मला ठाऊक नव्‍हते. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ येऊन गेल्‍यावर १ – २ घंट्यांनी कोविड केंद्रातून मला ‘तुम्‍हाला कोरोना झाला आहे. तुम्‍ही विलगीकरणात रहा’, असा भ्रमणभाष आला. तेव्‍हा मला वाटले, ‘मला त्रास होऊ नये’, यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साक्षात् देवीलाच (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना) पाठवून माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण नष्‍ट केले आणि मला मृत्‍यूच्‍या दाढेतून ओढून बाहेर काढले.’ पुढील ८ दिवस मी रुग्‍णालयात होतो; पण ‘ती केवळ औपचारिकता होती. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍या दर्शनानेच माझ्‍यावरील संकटाचा नाश झाला’, असे मला वाटले.

२ इ. कोरोना झाल्‍याचे कळल्‍यावरही मनावर ताण न येणे आणि स्‍वतःकडून झालेल्‍या चुका लक्षात येऊन देवाकडे क्षमायाचना करणे : ‘मला कोरोना झाला आहे’, हे कळल्‍यावर माझ्‍या मनावर कुठल्‍याही प्रकारचा ताण नव्‍हता; पण माझ्‍याकडून झालेल्‍या चुका माझ्‍या डोळ्‍यांसमोर आल्‍या. ‘माझ्‍यातील अहंमुळे माझ्‍या साधनेची हानी कशी झाली ?’, हे माझ्‍या लक्षात आले आणि मी देवाकडे क्षमायाचना केली.

२ ई. देहलीला येण्‍यापूर्वी साधक कुटुंबियांच्‍या समवेत राहिल्‍यामुळे त्‍यांची कोविड चाचणी करण्‍यात येणे; मात्र त्‍यांचा अहवाल साधारण (नॉर्मल) आल्‍यावर गुरुचरणी कृतज्ञता वाटणे : देहलीला येण्‍यापूर्वी मी माझे सासू-सासरे (सौ. जया शहाणे, वय ७५ वर्षे आणि श्री. यशवंत शहाणे, वय ७७ वर्षे) यांना भेटून त्‍यांच्‍या समवेत जेवलो होतो आणि माझी पत्नी (सौ. रूपाली वर्तक, वय ४८ वर्षे) माझ्‍या समवेतच होती. त्‍यामुळे त्‍यांची कोरोना चाचणी करण्‍यात आली. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने त्‍यांच्‍यापैकी कुणालाही कोरोना झाला नाही’, हे कळल्‍यावर माझ्‍याकडून श्री गुरुचरणी सतत कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती. त्‍या प्रसंगी मला माझी हतबलता अनुभवता आली. अन्‍य वेळी ‘मी हतबल आहे’, असे म्‍हणत असलो, तरी प्रत्‍यक्षात ‘माझ्‍या मनात अहं जागृत असतो’, याची देवाने मला जाणीव करून दिली. ‘या संकटातून देव मला माझ्‍या मर्यादांची जाणीव करून देत आहे आणि त्‍याच्‍या चरणी शरण जायला शिकवत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

३. रुग्‍णालयात भरती झाल्‍यावर जाणवलेली सूत्रे

३ अ. प्रत्‍येक २ दिवसांनी नवीन कक्षात हालवण्‍यात येणे आणि त्‍या वेळी मनाची झालेली स्‍थिती

३ अ १. रुग्‍णालयात भरती झाल्‍यावर मनात धाकधूक असणे आणि सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांच्‍या मार्गदर्शनामुळे ‘आपल्‍याला देवाचा भक्‍त बनायचे आहे’, अशी मनाला जाणीव होणे : एका साधिकेच्‍या परिचयामुळे २ दिवसांनी मी ‘एम्‍स’ रुग्‍णालयात भरती झालो. तेथील सुविधा पाहून ‘देव माझी किती काळजी घेत आहे !’, हे मी क्षणोक्षणी अनुभवले. तेव्‍हा माझ्‍याकडून प्रार्थना होत होती, ‘सर्वकाही देवाच्‍या नियोजनाप्रमाणे होऊ दे. ‘चांगले होऊ दे किंवा वाईट’, या दोन्‍हींमध्‍ये मला श्री गुरूंची कृपा अनुभवता येऊ दे’; पण माझ्‍या मनात थोडी धाकधूक होती. अधूनमधून माझे सद़्‍गुरु पिंगळेकाकांशी (सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याशी) बोलणे होत होते. त्‍यांनी मला सांगितले, ‘‘सतत भावजागृतीचे प्रयत्न कर. तुला देवाचा भक्‍त बनायचे आहे. बाकी काहीही विचार करू नकोस.’’ त्‍यांचे हे वाक्‍य मला सतत ऐकू यायचे. त्‍यामुळे ‘मला देवाचा भक्‍त व्‍हायचे आहे’, असे वाटत होते. आता माझ्‍या लक्षात येते, ‘देवाचा भक्‍त झाल्‍यावर सगळे देवच करून घेणार आहे.’

३ अ २. आरंभी अतीमहनीय व्‍यक्‍तींसाठी असलेल्‍या अतीदक्षता विभागात सोय होणे, तिथे सर्व रुग्‍ण सामान्‍य स्‍थितीतील असणे आणि नंतर अत्‍यवस्‍थ रुग्‍णांच्‍या कक्षामध्‍ये हालवण्‍यात येणे : तिथे कोरोनाच्‍या रुग्‍णांसाठी ७ माळ्‍यांचे वेगळे रुग्‍णालय होते. मी तिथे भरती झाल्‍यानंतर पहिले २ दिवस अतीमहनीय व्‍यक्‍तींसाठी असलेल्‍या अतीदक्षता विभागात होतो. त्‍या ठिकाणी सगळे रुग्‍ण सर्वसाधारण स्‍थिती असलेले होते. ते सगळे एकमेकांशी गप्‍पा मारत होते. तिथे काहीच अडचण नव्‍हती; पण नंतर तेथे काही अडचणी आल्‍यामुळे मला तळमजल्‍यावरील अतीदक्षता विभागात हालवण्‍यात आले. तळमजल्‍यावर केवळ पुष्‍कळ गंभीर स्‍थिती असलेल्‍या रुग्‍णांना ठेवले होते. तिथे चांगल्‍या स्‍थितीतील केवळ २ रुग्‍ण होते. बाकी साधारणतः ३० रुग्‍ण अत्‍यवस्‍थ होते. ‘काही जणांचा आता मृत्‍यू होतो कि काय ?’, अशी स्‍थिती होती. तेव्‍हा मला सतत देवाची आठवण होत होती. ‘देवाला मला मृत्‍यूचे दर्शन जवळून घडवायचे आहेे’, असे मला वाटले.

३ अ ३. अकस्‍मात् रक्‍तातील साखर वाढल्‍याने मधुमेह झाल्‍याची भीती वाटून मन अस्‍वस्‍थ होणे आणि देवाच्‍या कृपेने मन आपोआपच स्‍थिर होणे : अकस्‍मात् माझ्‍या रक्‍तातील साखर वाढू लागली. तेथील आधुनिक वैद्य मला म्‍हणाले, ‘‘कोरोनाच्‍या काही रुग्‍णांना मधुमेह होतो.’’ माझ्‍या घरात माझी आई, बहीण, मामा आणि मावशी यांना मधुमेह आहे. मला वाटले, ‘बहुतेक मलाही मधुमेह झाला.’ तेव्‍हा काही क्षण माझे मन अस्‍वस्‍थ झाले; पण नंतर देवाच्‍या कृपेने माझे मन आपोआपच स्‍थिर झाले.

३ अ ४. ‘या कक्षात चांगल्‍या स्‍थितीतील रुग्‍णालाही संसर्ग होऊ शकतो’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितल्‍यावर व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न वाढणे : दुसर्‍या दिवशी एक आधुनिक वैद्य मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ठणठणीत असतांना तुम्‍हाला या भयंकर कक्षामध्‍ये का ठेवले आहे ? तुम्‍हाला येथे ठेवले, तर कोरोनाच्‍या समवेत अन्‍य विषाणूंचा संसर्ग होईल.’’ त्‍यांनी असे म्‍हटल्‍यावर माझ्‍या मनात एकच विचार आला, ‘कुठल्‍याही विषाणूचा संसर्ग रोखणे कुणाच्‍याही हातात नाही. तो केवळ गुरुदेवच रोखू शकतात’; मात्र आधुनिक वैद्यांच्‍या या बोलण्‍यामुळे गुरुकृपेने माझे भावजागृतीचे प्रयत्न वाढले. मला आजूबाजूला सतत सद़्‍गुरूंचे अस्‍तित्‍व अनुभवता आले. नंतर मी सतत प.पू. बाबांची (प.पू. भक्‍तराज महाराज यांची) भजने लावली. मी सारणी लिखाण आणि स्‍वयंसूचना सत्रे नियमित केली. त्‍यामुळे मला वेगळाच आनंद मिळाला. त्‍यानंतर दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला तेथून हालवले आणि पाचव्‍या माळ्‍यावरील सर्वसामान्‍य कक्षामध्‍ये ठेवलेे.

३ अ ५. ‘देव वर्तमानकाळात रहाण्‍यासाठी मनाची सिद्धता करून घेत आहे आणि स्‍वतःकडून चुका होऊनही तो तेवढ्याच प्रेमाने सांभाळत आहे’, असे अनुभवणे : अशा प्रकारे प्रत्‍येक २ दिवसांनी मला नवीन कक्षामध्‍ये ठेवण्‍यात आले. ‘देव माझ्‍यात अंतर्गत पालट होण्‍यासाठी आणि मला सतत वर्तमानकाळात रहाण्‍यासाठी सर्व घडवत आहे’, असे मला वाटले. ‘माझ्‍याकडून अनेक चुका झाल्‍या असल्‍या, तरीही गुरुमाऊली माझ्‍यावर प्रेम करण्‍यात तसूभरही न्‍यूनता ठेवत नव्‍हती’, हे मी क्षणोक्षणी अनुभवले.

३ आ. नवीन कक्षात एक वेडसर रुग्‍ण असणे, सद़्‍गुरु पिंगळेकाकांचे ‘कधीही अयोग्‍य गृहीत धरू नका’, हे वाक्‍य आठवणे आणि ‘तो रुग्‍ण म्‍हणजे एखादी दिव्‍य विभूती असावी’, असे वाटून मन सकारात्‍मक होणे : नवीन कक्षामध्‍ये माझ्‍या समोरील पलंगावर एक वेडसर रुग्‍ण होता. त्‍याचे केस वाढले होते आणि तो सतत बडबड अन् आरडाओरडा करत होता. सद़्‍गुरु पिंगळेकाका नेहमी सांगतात, ‘‘कधीही अयोग्‍य गृहीत धरू नका.’’ त्‍यामुळे आणि श्री गुरुकृपेने मला त्‍या रुग्‍णाविषयी कुठल्‍याही प्रतिक्रिया आल्‍या नाहीत. मी त्‍याच्‍या बाह्य रूपाकडे पहात होतो; पण ‘ती एखादी दिव्‍य विभूती असली, तर…?’, या विचाराने माझे मन त्‍या रुग्‍णाविषयी थोडेसे सकारात्‍मक झाले.

३ इ. दुसर्‍या दिवशी तो वेडसर रुग्‍ण हट्ट करून घरी जाणे, त्‍याच्‍या जागी आलेल्‍या दुसर्‍या रुग्‍णाचा त्‍याच दिवशी रात्री मृत्‍यू होणे आणि तेव्‍हा ‘तो रुग्‍ण वेडसर नसून सूक्ष्मातील जाणणारा असावा’, असे वाटणे : दुसर्‍या दिवशी तो वेडसर रुग्‍ण आधुनिक वैद्यांना म्‍हणाला, ‘‘मला आत्ताच घरी सोडा. मी मेलो, तरी चालेल; पण मी आता येथे रहाणार नाही.’’ तो कोविडमधून बरा झालेला आणि ‘डायलिसीस’ (टीप) चालू असलेला रुग्‍ण होता. आधुनिक वैद्य त्‍याला म्‍हणाले, ‘‘डायलिसीस’ची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यावर जा’’; पण तो ऐकायलाच सिद्ध नव्‍हता. शेवटी त्‍याच्‍या हट्टापायी आधुनिक वैद्यांनी त्‍याला घरी सोडले.

टीप – डायलिसीस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्‍यून झाल्‍याने रक्‍तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्‍याची प्रक्रिया.

त्‍यानंतर एका घंट्यातच एक नवीन रुग्‍ण त्‍याच पलंगावर आला. ‘रात्री काय झाले ?’, ते कळले नाही; पण त्‍या नवीन आलेल्‍या रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. आधुनिक वैद्यांनी शेवटपर्यंत त्‍याच्‍यावर उपचार करण्‍याचा कसोशीने प्रयत्न केला; पण ते त्‍या रुग्‍णाचे प्राण वाचवू शकले नाहीत. तेव्‍हा ‘त्‍या जागेवर अनिष्‍ट शक्‍तींचे मोठे आक्रमण होणार आहे’, याची त्‍या आधीच्‍या वेडसर वाटणार्‍या रुग्‍णाला कल्‍पना आली असावी’, असे मला वाटले. ‘तो रुग्‍ण वेडसर नसून सूक्ष्मातील जाणणारा होता’, असे मला वाटले.

३ ई. नवीन रुग्‍णाचे निधन झाल्‍यावर त्‍याचा मृतदेह कक्षातच असणे, ‘त्‍या मृत रुग्‍णापासून त्रास होईल’, अशी काळजी वाटणे आणि तेव्‍हा ‘गुरु समर्थ आहेत’, हा भाव न्‍यून पडला’, याची खंत वाटणे : त्‍या नवीन रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यावर त्‍याचा मृतदेह तेथेच सोडून सर्व जण निघून गेले. जेवणाची वेळ झाल्‍यावर अन्‍य रुग्‍ण सहजतेने जेवले; मात्र मला ते सहन न झाल्‍याने मी दुसर्‍या ठिकाणी जाऊन जेवलो. रात्रीही मला गोळी घेऊन झोपावे लागले. याविषयी सद़्‍गुरु पिंगळेकाका मला म्‍हणाले, ‘‘येणार्‍या आपत्‍काळात मृतदेह ओलांडत ओलांडत पुढे जावे लागेल.’’ नंतर माझी भीती न्‍यून झाली; पण मला ‘त्‍या मृत रुग्‍णापासून मला त्रास होईल’, अशी काळजी वाटली. तेव्‍हा मला ‘मी काहीही करू शकत नाही; मात्र श्री गुरु समर्थ आहेत’, असा भाव ठेवण्‍यात मी न्‍यून पडलो’, याची खंत वाटली.

४. रुग्‍णालयातून देहली सेवाकेंद्रात येऊन अलगीकरणात रहातांना जाणवलेली सूत्रे

४ अ. अलगीकरणात रहातांना मनात निरर्थक विचार येणे, अंतर्मुखता न्‍यून होऊ लागणे आणि सद़्‍गुरु पिंगळेकाकांशी मनमोकळेपणाने बोलल्‍यावर आनंद मिळणे : मला रुग्‍णालयातून सोडल्‍यावर मी देहली सेवाकेंद्रात आलो आणि अलगीकरणाच्‍या खोलीत १५ दिवस राहिलोे. माझी प्रकृती समष्‍टी असल्‍याने मला एकटे रहाणे फार कठीण गेले. मी नामजप करायचो, तसेच स्‍वतःवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढायचो; पण तेव्‍हा माझ्‍या मनात अनेक निरर्थक विचार यायचे. रुग्‍णालयात निर्माण झालेली माझ्‍या मनाची अंतर्मुखता हळूहळू न्‍यून होऊ लागली. तेव्‍हा सद़्‍गुरु पिंगळेकाका मला सतत सांगायचे, ‘‘तुझ्‍यात कायापालट झाला पाहिजे. तुला देवाचे भक्‍त बनायचे आहे.’’ ते सतत मला माझ्‍या ध्‍येयाची जाणीव करून द्यायचे. त्‍यांच्‍याच संकल्‍पामुळे माझे मन पुन्‍हा अंतर्मुख होऊ लागले. तेव्‍हा सद़्‍गुरूंचे महत्त्व खर्‍या अर्थाने माझ्‍या लक्षात आले. ‘मनात काहीही लपवून ठेवायचे नाही’, असे वाटून मी मनातील प्रत्‍येक विचार सद़्‍गुरु पिंगळेकाकांना सांगायचो. त्‍यातून मला वेगळाच आनंद मिळू लागला. मला त्‍यांचा आधार वाटायचा.

४ आ. अलगीकरणाच्‍या १५ दिवसांत ‘सेवाकेंद्र अन् साधक यांच्‍याविना जगणे अशक्‍य आहे’, याची जाणीव होणे : या १५ दिवसांत मला सेवाकेंद्र आणि साधक यांचे महत्त्व खर्‍या अर्थाने समजले. तेव्‍हा ‘मी साधकांना प्रतिक्रिया देऊन कसे दुखावतो ?’, हे आठवून मला वाईट वाटले. ‘साधक नसतील, तर जगणे कठीण आहे’, हेही माझ्‍या लक्षात आले.

५. आजारपणात शिकायला मिळालेली सूत्रे

अ. मनाप्रमाणे न वागता प्रत्‍येक कृती विचारूनच केली पाहिजे.

आ. कोरोनानेच ‘मला काही कळत नाही’, याची जाणीव करून दिली.

इ. संकटच माणसाला अंतर्मुख बनवते.

ई. जन्‍म-मृत्‍यू केवळ श्री गुरूंच्‍या हातात आहेत.

उ. मी साधकांविना राहू शकत नाही.

ऊ. मी (साधक) कितीही चुकलो, तरी गुरुदेव माझा (साधकाचा) हात सोडणार नाहीत.

माझे श्री गुरु अनेक वर्षे मला जे सांगत आहेत, ते मी ऐकत नाही. ‘मी ते ऐकावे’, यासाठी मला कोरोनानामक संकटाचे साहाय्‍य झाले; म्‍हणून मला त्‍या संकटाप्रतीही कृतज्ञता व्‍यक्‍त करावीशी वाटली.

‘श्री गुरुमाऊली, ‘माझ्‍याकडून स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठीचे प्रयत्न करून घ्‍या अन् मला माझ्‍या जीवनाचे लक्ष्य लवकर प्राप्‍त होऊ द्या’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना !’

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था, देहली सेवाकेंद्र. (३१.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक