अधिक मासात करावयाची उपासना आणि पाळावयाची बंधने !

अधिक मासाविषयी शास्‍त्रोक्‍त माहिती

गेल्‍या ३ भागांत आपण मलमास (अधिक मास) म्‍हणजे काय ? काळ आणि संवत्‍सर यांचे प्रकार जाणून घेतले. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये ? ते जाणून घेतले. आज या लेखमालेचा शेवटचा भाग पाहूया.

(भाग ४)

८. अधिक मासात प्रतिदिन करावयाची उपासना

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

‘चैत्र मासापासून आश्‍विन मासापर्यंत ७ मासांपैकी एक आणि क्‍वचित् फाल्‍गुन मास अधिक मास होतो. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या ४ पैकी एखादा मास क्षयमास होतो. गोलोकामध्‍ये वास्‍तव्‍य करणारे पुरुषोत्तम मुरलीधर गोपाळकृष्‍ण हे या मासाचे ‘उपास्‍यदैवत’ आहे. या काळात श्रीविष्‍णूची नियमपूर्वक केलेली उपासना अत्‍यंत फलदायी आहे. श्रीविष्‍णु किंवा गोपाळकृष्‍ण यांची पूजा करून प्रतिदिन ‘विष्‍णुसहस्रनाम’ किंवा श्रीविष्‍णूचे एखादे स्‍तोत्र म्‍हणावे. नियमाने देवाला तुलसीपत्र अर्पण करावे, देवासमोर तुपाचा अखंड दीप लावावा किंवा प्रतिदिन तुपाचे निरांजन लावावे. परान्‍न वर्ज्‍य करावे. (गुरु, मित्र आणि सासुरवाडी इथे चालते.) नक्‍तभोजन (सूर्यास्‍तानंतर नक्षत्रे दिसण्‍यापूर्वीच्‍या काळात जेवणे) आणि एकभुक्‍त (एक वेळ भोजन) रहावे. ‘भागवत’ ग्रंथाचे पारायण करावे किंवा भागवत कथा ऐकावी. १०८, १ सहस्रपासून १ लाख संख्‍येपैकी आपणास शक्‍य असेल, तेवढे तुलसी अर्चन करावे. ३० आणि ३, म्‍हणजे ३३ संख्‍या इतक्‍या दांपत्‍यांना भोजन द्यावे. ‘पुरुषोत्तम याग’ अथवा ‘विष्‍णुयाग’ करावा. सकाळी अथवा सायंकाळी ‘अधिक मास माहात्‍म्‍य’ वाचावे. सच्‍छिद्र पक्‍वान्‍न, म्‍हणजे अनारसे वगैरेंचे दान जावयाला अथवा सत्‍पात्री ब्राह्मण यांना द्यावे. काही मंडळी नियमाने देवाला प्रदक्षिणा घालतात. या काळात महाविष्‍णुंची सेवा करावी आणि धर्म, अर्थ, काम अन् मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ साध्‍य करावेत.

९. सुवेरसुतक अथवा मासिक धर्म काळात पाळावयाची बंधने

कोणतीही जात, वर्ण आणि पंथ यांचे पुरुष अथवा स्‍त्री हे व्रत करू शकतात. आपण व्रताला नियमाने आरंभ केला आणि मध्‍येच सुवेरसुतक अथवा मासिक धर्म यांची अडचण आली, तरी घाबरू नये. अशौच संपल्‍यावर आणि मासिक धर्म स्नान झाल्‍यावर ५ व्‍या  दिवसापासून जेवढे दिवस आपल्‍या कर्मात खंड पडला, ते पुढे पूर्ण करावे. (उदा. एखाद्या स्‍त्रीने प्रतिदिन देवाला एक तुळशीपत्र आणि १ निरांजन लावण्‍याचे मनाशी ठरवले अन् मध्‍येच ती रजस्‍वला झाली, तर स्नान झाल्‍यावर ५ व्‍या दिवशी प्रतिदिनचे १ आणि आधीची खंड पडलेली ४ तुळशीपत्रे अन् ४ तुपाच्‍या वाती लावाव्‍यात.)

१०. प्रार्थना

‘भगवान महाविष्‍णु आपले कल्‍याण करो, सर्वांचे रक्षण करो, आपल्‍या हातून पुष्‍कळ धर्मकृत्‍य, भरपूर दानधर्म घडो आणि आपल्‍याला संत, सज्‍जन अन् देव यांचे आशीर्वाद लाभोत, ही सदिच्‍छा !’

(समाप्‍त)

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (१७.७.२०२३)