‘राजा कालस्य कारणम् ।’, हे आपण ऐकले आहे. याचा अर्थ राजाच काळाला कारणीभूत आहे. चांगले राज्य निर्माण होण्यासाठी आदर्श राजा असणे आवश्यक आहे. राज्यात प्रकोप घडल्यास त्याला राजाच कारणीभूत असतो; परंतु राजाची निवड करणारे कोण ? सध्या मात्र बहुमत आणि निवडणुकीच्या आधारावर राजाची निवड करण्याची पद्धत आहे. प्रजेतील एकाला राजा म्हणून निवडण्यात येते; परंतु आज समाजात नैतिकता आणि सात्त्विकता यांचे प्रमाण इतके खालावले आहे की, प्रजेमध्ये खरे-खोटे, योग्य-अयोग्य, काय करावे ? आणि काय करू नये ? या सामान्यज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे आजची प्रजा अयोग्य कृती, अयोग्य विचार आणि अयोग्य निर्णय घेत आहे. योग्य असलेल्याचे विवेचन करण्याची क्षमता प्रजा गमावून बसली आहे. ‘समाज आणि राष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचा काय लाभ आहे ?’, असा विचार करणार्या प्रजेचे राज्य आपण सध्या पहात आहोत.
‘यथा राजा, तथा प्रजा’ हे आपण ऐकले आहे. त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम आदर्श राजा प्रभु श्रीरामाने स्वसुखापेक्षा प्रजेचे सुख, शांती, समाधान हेच केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला. त्यामुळे प्रजाही प्रामाणिक, सात्त्विक आणि निःस्वार्थी असल्याने राजाला देवाप्रमाणे मानून राजाचे आज्ञापालन करायचे. राजा आणि प्रजा एकरूप झाले होते. प्रजेला दुःख झाले, तर राजाला दुःख होत असे. राजाच्या दुःखात प्रजा सहभागी होत असे. आदर्श राजा, आदर्श प्रजा, आदर्श राज्यकारभार म्हणजेच रामराज्य ! प्रजा अथवा राजा अधर्मी झालेल्या राज्याला काय म्हणणार ? राज्य अराजकाच्या टोकाला गेल्यावर हाताच्या बोटावर मोजता येतील, असे सात्त्विक लोक भगवंताला शरण जातात आणि त्याच्यावर भार सोपवतात. त्याच्या आगमनाची वाट पहात भगवंताच्या वचनाचे स्मरण करतात. हीच स्थिती सध्या आहे. त्यामुळे भगवंताला आपण शरण जाणे, हा एकमेव मार्ग उरला आहे.
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक (५.७.२०२३)