पांडुरंगाच्या पंढरपुरातून तुळशीची पाने येणार : नाव नोंदणीचे आवाहन !
अहिल्यानगर – अधिकमासनिमित्त शहराच्या इतिहासात प्रथमच ५ आणि ६ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘लक्ष तुळशी अर्चन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. पांडुरंगाच्या पंढरपुरातून तुळशीची पाने मागवण्यात आली आहेत. श्री महाविष्णुयाग आणि लक्ष तुळशी अर्चन महासोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणारे भाविक, तसेच अधिक मासनिमित्त अन्नदान सेवा करू इच्छिणारे भाविक यांनी अधिक माहितीसाठी अन् नाव नोंदणीसाठी घनपाठी वेदमूर्ती श्री. सागर कुलकर्णीगुरुजी (८९९९६ ८४३८६) किंवा सौ. स्मिताताई कुलकर्णी (८६०५९ १४७५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक भाविकाला भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर स्वतःच्या हाताने तुळशीची पाने अर्पण करता येणार आहेत. सावेडीतील रासनेनगर येथील ओंकार कॉलनीत असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरामध्ये श्री महाविष्णुयाग आणि ‘लक्ष तुळशी अर्चन’ महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महासोहळ्याची महासांगता महाप्रसादाने करण्यात येणार आहे.
५ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता श्री गणेश पुजनाने श्री महाविष्णुयागाचा विधीवत् शुभारंभ करण्यात येईल. त्यानंतर पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, प्रधान देवता स्थापन होईल. सकाळी १०.३० वाजता विधीवत् अग्निस्थापना करून यागास प्रारंभ होईल. दुपारी १.३० पर्यंत याग चालेल. ६ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता भगवान श्री विष्णूंच्या प्रतिमेस महाअभिषेक करण्यास येईल. महाअभिषेक होताच लक्ष तुळशी अर्चन महासोहळा चालू होईल. सकाळी १० वाजता श्री महाविष्णुयाग आणि लक्ष तुळशी अर्चन महासोहळ्याची सांगता करण्यात येईल. हा महासोहळा संपन्न होताच सकाळी १०.३० वाजता श्रीक्षेत्र आळंदी येथील वेदमूर्ती श्री. अशोकशास्त्री कुलकर्णीगुरुजी यांचे ‘अधिकमास माहात्म्य’ या विषयावर प्रवचन सुरू होईल. दुपारी १२.३० वाजता प्रवचनाचा समारोप करण्यात येईल.