१. बॅटरी बनवण्यासाठी लागणारे ‘लिथियम’ भूमीतून काढतांना होणारे प्रदूषण आणि होणारी नैसर्गिक हानी
यात २ प्रमुख भाग आहेत ते म्हणजे मोटर आणि बॅटरी. अर्थातच सर्वांना ठाऊक आहे की, ही वाहने बॅटरी चार्ज (भारित) करून वापरायची असतात. सध्याच्या काळात जी बॅटरी प्रामुख्याने वापरली जाते ती ‘लिथियम आयन’ या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या बॅटरीच्या बनावटीसाठी काही खनिजे आवश्यक आहेत. लिथियम, निकेल, मँगनीज आणि कोबाल्ट ही खनिजे वापरून ‘लिथियम आयन’ बॅटरी बनवली जाते. भारतात नुकतेच लिथियमचे भरमसाठ साठे सापडले असले, तरी बॅटरी बनवण्यासाठी लागणारे बहुतांश लिथियम हे दक्षिण अमेरिका खंडातील काही देशांतून येत आहे. ते खाणीतून काढण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते त्यातील यंत्रांना मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. ही यंत्रे हवेत कार्बन मोनॉक्साईड आणि इतर घाणेरडे वायू सोडत असतात. हे लिथियम विविध देशांत वाहून नेणारे जहाजही डिझेलवरच चालते. यामुळे वायूप्रदूषणात अजून भर पडते. लिथियमप्रमाणेच कोबाल्टही खाणीतून काढले जाते. ते प्रामुख्याने काढले जाते आफ्रिका खंडातील काँगोसारख्या देशातून. तिथेही काढण्याची पद्धत सारखीच असल्यामुळे वायूप्रदूषण आणि भूमीची हानी हे दोन्ही केले जाते. याखेरीज काँगो हा गरीब देश असल्यामुळे तिथे या कामासाठी बालकामगार मोठ्या प्रमाणात वापरले जातात, ही समस्या तर सर्वांच्या नजरेआड आहे.
या विविध खनिजांचा पुरवठा पुरेसा करण्यासाठी खाणी खणून भूमीची जी हानी होत आहे, ती भरून काढण्याजोगी नाही. यामुळे काही देशांत भूगर्भातील पाण्याची पातळी अनियमित झाली आहे, तर काही देशांत अजून झालेली नाही. यापलीकडे लिथियमपासून सिद्ध झालेल्या निर्जीव बॅटरीचा पुनर्वापर आणि तिची विल्हेवाट लावण्याची पद्धत या विषयावर कुठेही ठोस उपाय नाही.
२. विद्युत्निर्मितीतून वायू प्रदूषण होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनेही विविध प्रदूषणास हातभार लावणारी
याखेरीज मोटार नियंत्रण करणारे भाग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानासाठी लागणार्या सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी भरमसाठ पाणी लागते. काही काळापूर्वी पाण्याच्या अभावामुळे सर्वांत अधिक सेमीकंडक्टर बनवणार्या तैवान देशामध्ये उत्पादन जवळजवळ बंद करण्यात आले होते. पाणी हे मनुष्यासह इतर प्राण्यांसाठी फार महत्त्वाचे असल्यामुळे तेही चिंतेचे आहे. इथून पुढे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी भारित (चार्ज) करण्यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा. आपल्या देशात पुरवल्या जाणार्या संपूर्ण विद्युत् पुरवठ्यापैकी साधारण ६२ टक्के विद्युत्निर्मिती ही दगडी कोळसा वापरून केली जाते. हा ऊर्जास्रोत मर्यादित असण्यापलीकडे यामध्ये खाणीतून काढण्यापासून ते त्यातून विद्युत् ऊर्जा निर्माण करण्यापर्यंत वायूप्रदूषण त्याच पद्धतीने होते. या सर्वांची सरासरी केली, तर इलेक्ट्रिक वाहनेही विविध प्रदूषण करण्यास हातभार लावत आहेत. हे प्रमाण आपण असे ठरवू शकतो की, पेट्रोल किंवा डिझेल या इंधनांवर चालणारी गाडी १० वर्षांत सरासरी जेवढे कार्बन उत्सर्जन करील, त्यापैकी ४० टक्के उत्सर्जन हे इलेक्ट्रिक वाहन तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हाच करून ती आलेली असते. उरलेले ६० टक्के कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण हे तेव्हाच थांबेल, जेव्हा इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी भारित करण्यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा हा कोणतेही खनिज किंवा इंधन न जाळता जलविद्युत्निर्मिती केंद्र किंवा अणूविद्युत्निर्मिती केंद्र यांसारख्या अल्प प्रदूषण करणार्या किंवा प्रदूषण न करणार्या स्रोतातून केला जाईल. वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध असली, तरी ती ज्या नैसर्गिक संसाधनापासून बनवली जाते, ती मर्यादित आहेत.
३. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणासाठी पोषक नाहीत !
बॅटरी बनवण्यासाठी संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ लिथियमच्या ऐवजी दुसरा पर्यायही शोधत आहेत. तूर्तास इलेक्ट्रिक वाहने देशाला इंधने आयात खर्चापासून सुटका देऊ शकतात, तसेच त्यासाठी इतर देशांवर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतीपासून वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनाच्या मालकांना थोडा दिलासा मिळत आहे; पण या सर्व माहितीअंती मी हेच सांगू इच्छितो की, आता उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणासाठी तुम्ही समजता तेवढी पोषक नाहीत.
– श्री. पंकज खंडू रेपाळे, अभियंता (माहिती आणि तंत्रज्ञान (हार्डवेअर))
(साभार : सामाजिक माध्यम)