प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावरील स्थगिती ३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणी आता ३ ऑगस्टला उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला जिल्हा न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर मुसलमान पक्षाने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वेक्षणाच्या वेळी खोदकाम होण्याच्या शक्यतेने त्याला विरोध करण्यात आला; मात्र पुरातत्व विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ‘खोदकाम न करता सर्वेक्षण करण्यात येईल’, असे स्पष्ट केले. त्यावर मुसलमान पक्षाने ‘प्रथम ज्ञानवापीवरील अधिकाराविषयी निर्णय झाला पाहिजे. त्यानंतर सर्वेक्षण व्हावे’, असे नवीन सूत्र उपस्थित केले. अधिकाराविषयीचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यानंतर न्यायालयाने ३ ऑगस्टला निर्णय घेण्याविषयी सांगत सर्वेक्षणावरील स्थगितीचा कालावधी वाढवला.