…तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना भारताच्‍या सीमा मोकळ्‍या आहेत !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत सांगितले, ‘आम्‍ही वन्‍दे मातरम्’ म्‍हणणार नाही. या देशात राहूनही आम्‍ही या पवित्र मंगल भूमीला वंदन करणार नाही.’ आपल्‍या राष्‍ट्रीय गीताला त्‍यांनी एका धर्माचे सांगत ते नाकारले आणि स्‍वतःचेच जुने म्‍हणणे पुढे नेले. यावर विधानसभेत संताप व्‍यक्‍तही झाला; पण या पवित्र मंगल अशा गीताचा इतिहास नक्‍की आहे तरी काय ? हे थोडक्‍यात जाणून घेऊ.

कु. अन्नदा मराठे

१. ‘वन्‍दे मातरम्’चा इतिहास

‘वन्‍दे मातरम्’ हे राष्‍ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वर्ष १८७० मध्‍ये लिहिले. ५ कडवी असलेल्‍या या गीताची काही कडवी संस्‍कृत, तर काही बंगाली भाषेमध्‍ये आहेत. बंकिमचंद्र यांच्‍या ‘आनंदमठ’ नावाच्‍या कादंबरीमध्‍ये हे गीत प्रसिद्ध झाले. त्‍यानंतर भारताच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यामध्‍ये हे शब्‍द लोकांना एकत्र आणणारे ठरले. वर्ष १९०५ मध्‍ये बंगालची फाळणी झाली. त्‍या वेळी संपूर्ण बंगालला एकत्र आणणारे शब्‍द ‘वन्‍दे मातरम्’ होते. त्‍यानंतर बंगालच्‍या गव्‍हर्नरने त्‍यावर बंदी घालण्‍याचा प्रस्‍ताव आणला; पण त्‍यामुळे या गीताला संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली आणि ते राष्‍ट्रीय गीत बनले. पुढे एका वृत्तपत्राचे नावही ‘वन्‍दे मातरम्’ ठेवण्‍यात आले. प्रत्‍येक क्रांतीकारकाच्‍या तोंडी त्‍यानंतर फक्‍त ‘वन्‍दे मातरम्’ हेच शब्‍द असायचे. अनेक क्रांतीकारकांनी फासावर जातांना शेवटचे शब्‍द हेच उच्‍चारले. मादाम कामा यांनी सिद्ध केलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजाच्‍या मध्‍यभागी हेच शब्‍द लिहिलेले होते. अशा या ‘वन्‍दे मातरम्’ गीताला ब्रिटीशही घाबरत होते.

२. ‘वन्‍दे मातरम्’च्‍या माध्‍यमातून देशाला (देव मानून) वंदन !

या गीतामध्‍ये ‘ज्‍या भूमीवर आपण रहातो, तिला ‘आई’ म्‍हणून वंदन केलेले आहे. तिची विविध विशेषणे लावून स्‍तुती केली आहे. तिला ‘सुजलाम्, सुफलाम्’ म्‍हटलेले आहे.’ वंदन करणे म्‍हणजे एखाद्या प्रती स्‍वतः कृतज्ञता व्‍यक्‍त करणे, ही भारतीय संस्‍कृती आहे. ‘कृतज्ञता’ हा भारतियांचा मूळ स्‍वभाव आहे. तोच या गीतामधून प्रकट झाला आहे.

अशा या मंगलमय गीताला भर सभागृहामध्‍ये विरोध करणे, हा दंडनीय अपराध म्‍हणावा लागेल. ज्‍या भूमीवर आपण रहातो, ज्‍या भूमीमधून मिळालेले अन्‍न आपण खातो, तिला वंदन करण्‍यात लाज कसली बाळगायची ? तिला वंदन न करण्‍यासारखा कृतघ्‍नपणा कोणताही नव्‍हे. या गीताला हिंदु धर्माशी जोडून त्‍याला धार्मिक रंग देण्‍याचा प्रकार अबू आझमी यांनी केला; पण हे गीत भारतीय संस्‍कृतीचे प्रतीक आहे. यात हिंदूंच्‍या कुठल्‍या देवाची आराधना केलेली नाही, तर देशाला वंदन केलेले आहे; कारण हिंदू देशालाही देवच मानतात.

३. अबू आझमींकडून ‘वन्‍दे मातरम्’विषयी चुकीचे विचार मांडले जाणे हे लाजिरवाणे !

आपली मातृभूमी ही भारतियांना सदैव प्रिय राहिलेली आहे. ती आपली परंपराच आहे. रामायणामध्‍ये प्रभु श्रीराम म्‍हणतात, ‘जननी जन्‍मभूमिश्‍च.’ यातून त्‍यांनी ‘मला आई आणि मातृभूमी ही स्‍वर्गापेक्षाही प्रिय आहे’, असे सांगितले. हीच परंपरा लक्षात घेऊन स्‍वातंत्र्यवीर सावरकर म्‍हणतात, ‘नभु नक्षत्रे बहुत एक परी प्‍यारा मज भरतभूमीचा तारा.’ देश आणि मातृभूमी यांच्‍या प्रेमाची ही परंपरा आपल्‍याला लाभली असतांना महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेमध्‍ये अबू आझमींकडून असे विचार मांडले जाणे, हे लाजिरवाणे आहे. ‘वन्‍दे मातरम्’सारख्‍या गीताला एका धर्माशी जोडून अबू आझमी यांनी नक्‍की काय साधले ? ‘जर देशातील मूळ समाज हा हिंदु आहे आणि येथील प्रत्‍येक गोष्‍ट हिंदूंची साक्ष देते, तर ‘वन्‍दे मातरम्’ हे गीतही हिंदूंशी साधर्म्‍य दाखवणार’, हे वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही. भारतीय स्‍वातंत्र्यलढ्याच्‍या वेळी हे राष्‍ट्रीय गीत गातांना कुणीही त्‍याला धर्माशी जोडले नव्‍हते. मुस्‍लिम लीगच्‍या आग्रहामुळेच संपूर्ण ‘वन्‍दे मातरम्’ न स्‍वीकारता त्‍यातील केवळ दोन कडवीच स्‍वीकारण्‍यात आली. आता तीही म्‍हणायला जर अबू आझमींना अडचण येत असेल, तर त्‍यांना भारताच्‍या सीमा मोकळ्‍या आहेत; कारण ‘इस देश मे रहना होगा तो वन्‍दे मातरम् कहना होगा ।’ (२२.७.२०२३)

– कु. अन्‍नदा विनायक मराठे, उसगाव, जिल्‍हा रत्नागिरी.

संपादकीय भूमिका

विदेशात कोणत्‍याही देशाच्‍या राष्‍ट्रीय गीताचा अवमान करण्‍याचे धाडस कुणी केल्‍याचे ऐकले आहे का ?