काळाचे भेद आणि अधिक मासात टाळावयाची कर्मे

अधिक मासाविषयी शास्‍त्रोक्‍त माहिती

‘गेल्‍या दोन भागांमध्‍ये आपण अधिक अथवा क्षयमास ज्‍याला मलमास संज्ञा आहे, त्‍याविषयी आणि अधिक मासामध्‍ये कोणती कर्मे करावीत ? अन् कोणती करू नयेत ? याविषयीची माहिती वाचली. आजच्‍या लेखात काळाचे भेद पाहूया.

(भाग ३)

६. सौर आणि चंद्र या दोन्‍ही संवत्‍सरातील ११ दिवसांची तफावत दूर करण्‍यासाठी अधिक मास

वर्ष, अयन, ऋतु, मास, पक्ष आणि दिवस असे काळाचे ६ प्रकार आहेत. चांद्र, सौर, सावन, नाक्षत्र आणि बार्हस्‍पत्‍य असे वर्षाचे ६ प्रकार आहेत. चांद्रमास, म्‍हणजे शुक्‍ल प्रतिपदेपासून अमावास्‍येपर्यंत जे दिवस त्‍यांचा एक मास होतो आणि अशा प्रकारे चैत्र ते फाल्‍गुनपर्यंत १२ मासांचे ३५४ दिवसांचे एक चांद्र वर्ष होते. अधिक मास असला, तर १३ मासांचे चांद्रवर्ष होते. ६० संवत्‍सर हे चांद्रमासानुसारच होतात. सूर्य मेषापासून मीन राशीपर्यंत १२ राशी भोगतो, तेव्‍हा ३६५ दिवसांचे सौर वर्ष होते.

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

३६० दिवसांच्‍या वर्षाला ‘सावन वर्ष’ संज्ञा आहे. ३० दिवसांचा ‘सावन मास’ असतो. १२ नक्षत्र मासांच्‍या वर्षाला ‘नाक्षत्र मास’ अशी संज्ञा आहे आणि ते ३२४ दिवसांचे असते. चंद्राने अश्‍विनीपासून रेवतीपर्यंत २७ नक्षत्रे भोगली की, नक्षत्र मास होतो. मेषादिक एकेक राशी बृहस्‍पतीने ग्रहाने भोगली असता ‘बार्हस्‍पत्‍य वर्ष’ होते. हे ३६१ दिवसांचे असते. सौर आणि चंद्र या दोन्‍ही संवत्‍सरातील ११ दिवसांची तफावत ही सुयोग्‍य गणिताने संतुलित व्‍हावी अन् आकाशातील ग्रहांची स्‍थिती पंचांग गणित हे परस्‍परांना पूरक व्‍हावे, यांसाठी परिपूर्ण कालगणना निर्माण होण्‍यासाठी (मलमास) अधिक मास आहे.

७. अधिक मासातील वर्ज्‍य कर्मे

अ. उपाख्‍य, उत्‍सर्जन (श्रावणी), अष्‍टकाश्राद्धे करू नयेत.

आ. चौल, मुंज, विवाह, संकल्‍पपूर्वक तीर्थयात्रा, वास्‍तूकर्म, गृहप्रवेश, देवप्रतिष्‍ठा, विहीर, तलाव, बाग आणि उद्याने यांचे उत्‍सर्ग (शुद्धीकरणपूर्वक लोकार्पण) करू नये.

इ. नूतन वस्‍त्रे आणि अलंकार धारण करू नये, तुलादान, महादाने देऊ नयेत.

ई. पूर्वी न पाहिलेले देव, तीर्थ आणि तीर्थक्षेत्र यांचे दर्शन करू नये,

उ. संन्‍यास ग्रहण, काम्‍यवृषोत्‍सर्ग, देवाला दवणा पोवती वाहणे, देवांची कुस पालटणे, सर्पबली, श्रवणाकर्म हे सर्व अधिक मासामध्‍ये वर्ज्‍य करावे.

ऊ. तसेच यज्ञकर्म आणि अग्‍निस्‍थापना (अग्‍निहोत्र स्‍वीकार) करू नये.

ए. या मासात राज्‍याभिषेकही वर्ज्‍य आहे.

उद्या आपण या लेखमालेच्‍या शेवटच्‍या भागात ‘अधिक मासात काय करावे ? आणि कोणते आचरण करावे ?’, यांविषयी पाहूया.

(क्रमशः उद्याच्‍या दैनिकात)

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्‍हा सिंधुदुर्ग (१६.७.२०२३)