कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उपाख्य बापूसाहेब परुळेकर (वय ९४ वर्षे) यांचे आज, २७ जुलैच्या सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे नेणारे एक खंबीर वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाल्याची अस्वस्थता मनात दाटून आली आणि मन भूतकाळात गेले.
तत्परता
१८ जुलै २००४ या दिवशी सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात ‘पर्यावरण आणि वन मंत्रालय, नवी देहली’ यांच्या वतीने संपन्न झालेल्या ‘जल-जीवन अमृत’ कार्यशाळेत आम्ही ‘लिखित-दिग्दर्शित’ केलेली ‘कोयना अवजल : कोकणातील पाणी समस्येवरील एक उपाय’ ही ‘टेलिफिल्म’ प्रथम प्रदर्शित झाली होती. त्याच दिवशी महाविद्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून बापूसाहेबांनी आमच्यासाठी ‘कोयना अवजलच्या सीडीसह येऊन भेटावे’ असा निरोप ठेवला होता. तेव्हा आमच्याजवळ ‘मोबाईल’ नव्हते. सावंतवाडीत चालू असलेल्या कार्यशाळेची माहिती घेऊन जिल्ह्याच्या माजी खासदार राहिलेल्या व्यक्तीने भेटीसाठी निरोप ठेवण्यातील तत्परता पत्रकारितेत वावरत असूनही २४ वर्षांच्या आमच्यासाठी नवीन आणि धक्कादायक होती.
अल्पकालीन खासदारकी जिल्ह्यासाठी दुर्दैवी गोष्ट !
गप्पा मारतांना विविध घडामोडी सांगण्यातील त्यांची सहजता आणि प्रसन्न शैली अफलातून होती. त्यांची अल्पकालीन खासदारकी जिल्ह्यासाठी दुर्दैवी गोष्ट होती. प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्याविषयी आमच्या मनात एक विलक्षण कृतज्ञता निर्माण झाली ती कायमची ! अगदी आम्ही लिहिलेल्या भारत सरकारच्या ‘हाफकिन’ संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांच्या जीवनचरित्रातही प्रसंगानुरूप बापूसाहेबांच्या आठवणी नोंदवल्यात. नोव्हेंबर १९७०-७१ च्या रत्नागिरी दौर्यात अटलजींचे दुपारचे भोजन हे बापूसाहेबांकडे झाले होते. आणीबाणीनंतर जनता पक्षाने, रत्नागिरी लोकसभेसाठी परिचित चेहर्याच्या, निगर्वी आणि नम्र स्वभाव असलेल्या बापूसाहेबांना उभे केले होते. तत्पूर्वी वर्ष १९७१ च्या निवडणुकीतही त्यांना जनसंघाने तिकीट दिले होते. तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत बापूसाहेब निवडून आले होते. देशात पहिले बिगर काँग्रेसी सरकार स्थापन होण्यासमवेत जयप्रकाश नारायण यांची लढाईही यशस्वी झाली होती. ऑक्टोबर १९७९ च्या सातव्या लोकसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून बापूसाहेब पुन्हा एकदा निवडून आले होते. वक्तृत्व, अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून स्वत:ची मोहोर उमटवली होती.
नकारात्मक मत नोंदवण्याचा अधिकारासाठी आग्रही भूमिका !
संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार असतो, त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदवण्याचा अधिकार असतो, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाने स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. ही घटना निवडणूक प्रक्रियेमधील महत्त्वाची घटना होती. यासाठी लोकसभेमध्ये स्वत:च्या कार्यकाळात आग्रही भूमिका घेण्याचे आणि तसा अशासकीय ठराव मांडण्याचे काम बापूसाहेबांनी केले होते. जाणकारांमध्ये सतत चर्चा होत रहावी; म्हणून या विषयाला लोकसभेत अभ्यासपूर्ण विवेचनाने त्यांनी चालना दिली होती. अशी नोंद संपादक आणि विचारवंत स्व. निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी यांनी ‘प्रवाह’ सदरात केली होती.
समाजमान्य यशस्वी वकील !
बापूसाहेबांनी वर्ष १९५१ मध्ये स्वतःच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिली चालू केली होती. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात पंडित, नानल, बर्वे, चितळे, जोशी असे मोजके नामांकित वकील होते. बापूसाहेबांनी अत्यंत कष्टाने समाजमान्य यशस्वी वकील अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती. बापूसाहेबांच्या घराण्यात चार-पाच पिढ्यांचा वकिली व्यवसाय आहे. राजकीयदृष्ट्या ते संघ-जनसंघाशी जोडले गेले, तरी त्यांच्या येथे सर्व विषयांवर वाचन, अभ्यास आणि व्यासंग चालू असायचा.
लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये फिरोज गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणार्या कोपर्यात बापूसाहेब तासन्तास बसून अनेक खासदारांसमवेत चर्चा करत असत. लोकसभेत सर्व पक्षाच्या खासदारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजीव गांधीही अनेकदा त्यांचा सल्ला घेत.
१९६० च्या दशकात रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष रािहलेले बापूसाहेब हे वर्ष १९७० च्या दशकात रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनासह आणीबाणी काळात मिसा कायद्यांतर्गत त्यांना १६ महिने कारावास भोगावा लागला होता. रत्नागिरीत जनसंघ-भाजपची पायाभरणी करणार्यांपैकी ते प्रमुख नाव होते. अनेकांच्या राजकीय जीवनातील आदर्श असलेल्या बापूसाहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवण्यात मोठे योगदान होते.
स्व. बापूसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
– श्री. धीरज वाटेकर, चिपळूण