धरणाला कोणताही धोका नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर

कळवंडे (तालुका चिपळूण) धरणाच्या घसरलेल्या अश्मपटलचे (पिचींगचे) काम युद्धपातळीवर

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाचा भराव पुन्हा खचला आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता गणेश सलगर म्हणाले की, लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) आज, २७ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजता घसरल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठेकेदार आणि यांत्रिकी विभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत धरणाला कोणताही धोका नाही.

या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ द.ल.घ.मी. इतका आहे. वर्ष १९८३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ द.ल.घ.मी. आहे. सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

२८ जून २०२३ या दिवशी उर्ध्व बाजूकडील माती भरावाकडील अश्मपटल घसरले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. २७ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजता पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगतच अश्मपटल घसल्याचे निदर्शनास आले. अश्मपटल घसरलेला भाग हा पाणी पातळीच्या वरील भागातील असल्याने संबंधित ठेकेदार आणि यांत्रिकी विभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी त्यांना तातडीने सूचना देऊन घसरलेल्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.