मणीपूरमध्ये पुन्हा गोळीबार !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली. या भागात ख्रिस्ती कुकी बहुसंख्य आहेत. तेथे दुसर्‍या दिवशीही हिंसाचार झाला.

१. हिंसाचारामुळे मणीपूरमधील कुकी-जोमी समुदायाच्या अनुमाने १३ सहस्र लोकांनी पलायन करून शेजारच्या राज्यांत आश्रय घेतला आहे. मिझोरामची राजधानी आयझॉल येथे कुकी समाजाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यात मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही सहभाग घेतला. ५० सहस्रांहून अधिक लोक यात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला.

२. मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आयझॉल येथे कुकी समुदायाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले की, मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी दुसर्‍या राज्याच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये. राज्य सरकारचा अमली पदार्थांच्या विरोधातील हा लढा आहे. मणीपूर सरकार राज्यात रहाणार्‍या कुकी समाजाच्या विरोधात नाही. राज्यात घडणार्‍या सर्व घटनांवर सरकार लक्ष ठेवून आहे. मणीपूरची अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर आम्ही कठोर कारवाई करू.