‘१२ ते १७.१२.२०२२ या कालावधीत गुरुकृपेने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे नागपूर येथे आमच्या घरी वास्तव्याला होते. तेव्हा त्यांच्या सत्संगात त्यांच्यामधील अनेक गुणांचे आम्हाला दर्शन घडले आणि अनुभूतीही आल्या.
१. गुरुकार्याची तळमळ
सद़्गुरु पिंगळेकाका आमच्याकडे आले, त्या दिवशी ते फार थकलेले दिसत होते. त्यांच्या पायांवर सूज होती, तरीही त्यांचा चेहरा आनंदी दिसत होता. त्यांना त्यांच्या नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी जायचे होते. तेथे जाऊन परत आल्यावर त्यांनी नागपूर येथे धर्मप्रेमींचा सत्संग घेण्याची आणि संपर्काला जाण्याची सिद्धता दर्शवली.
२. सद़्गुरु पिंगळेकाकांच्या ९० वर्षांच्या मावशींना सद़्गुरु काकांमधील संतत्वाची जाणीव होणे
सद़्गुरु काका नातेवाइकांकडे वैयक्तिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा सद़्गुरु काकांच्या ९० वर्षे वयाच्या फडणवीसमावशी आल्या होत्या. त्या सद़्गुरु काकांच्या पाया पडल्या. तेव्हा त्या ‘हा तर फार मोठा संत झाला आहे’, असे सर्वांना आनंदाने सांगत होत्या. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात धनरूपाने साहाय्य करण्याची सिद्धताही दर्शवली. सद़्गुरु काकांमधील चैतन्यानेच हे शक्य झाले.
३. प्रेमभाव
सद़्गुरु काका आमच्याकडे आले, त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनी मला खाऊ देऊन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्याच्या दुसर्या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता. याविषयी मी सद़्गुरु काकांना सांगितल्यावर त्यांनी माझ्या वडिलांनाही प्रेमाने खाऊ दिला.
४. पत्नीच्या दुखण्याकडे साक्षीभावाने पहाणे
सद़्गुरु पिंगळेकाकांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या गुडघ्यावर एकाच ठिकाणी ३ वेळा लागले. त्याविषयी सांगत असतांना ‘ते काकूंचे प्रारब्ध आहे आणि ते सद़्गुरु काकांनी स्वीकारले आहे’, असे मला वाटले. तेव्हा ‘त्या पत्नी आहेत’, असा सद़्गुरु काकांचा भावनात्मक विचार जाणवला नाही.
५. ऐकण्याची वृत्ती
आम्ही रामटेक या गावाकडे जातांना एका साधिकेने सद़्गुरु काकांना रामटेकविषयी माहिती सांगितली. तेव्हा सद़्गुरु काकांना बहुतांश विषय ठाऊक असूनही त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले.
६. धर्मप्रेमींशी जवळीक साधणे
रामटेक येथे एका प्राध्यापक धर्मप्रेमींनी जैन मंदिरात आमच्यासाठी महाप्रसादाची सोय केली होती. तेव्हा सद़्गुरु काकांना जेवणाची अनेक पथ्ये असूनही त्यांनी आमच्या जवळचा डबा न घेता ‘आपण सर्व जण मंदिरातच प्रसाद घेऊया’, असे आम्हाला सुचवले. यातून त्यांचा मंदिरातील प्रसादाप्रती भाव आणि धर्मप्रेमींप्रतीचा आदर दिसून येतो.
७. कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयात गेल्यावर गुरुकार्य प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करणे
७ अ. जिज्ञासा : आम्हाला रामटेक येथे कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयात जाण्याची संधी मिळाली. तेथे सर्व सूत्रे सद़्गुरु काका लक्षपूर्वक ऐकत होतेे. हे विश्वविद्यालय पहातांना ‘तेथील पुरातन ग्रंथ अधिक काळ टिकून रहावेत’, यासाठी कसे जतन केले आहेत ? ग्रंथालयाची रचना कशी विशिष्ट प्रकारची आहे ?’, याविषयी सद़्गुरु काकांनी समजून घेतले.
७ आ. इतरांचा विचार करणे : आम्ही रामटेक महाविद्यालयातील योगाभ्यासाच्या दालनात गेलो असता ‘तेथे योगाभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये’, यासाठी सद़्गुरु काकांनी आम्हाला काही वेळातच तेथून निघण्याचे सुचवले.
७ इ. प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांना हिंदु संस्कृतीचे जतन करण्याविषयी मार्गदर्शन करणे : सद़्गुरु काकांनी कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयातील प्राध्यापकांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ‘सर्वांनी हिंदु संस्कृती जतन करण्यासाठी आणि परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांच्या साहाय्याने पुढे जायला हवे’, याविषयी मार्गदर्शन केले. तेथील प्रत्येक प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा कल बघून सद़्गुरु काका त्यांना आवश्यक ते सांगत होते.
७ ई. ‘वेदांग ज्योतिष’च्या प्राध्यापकांना संशोधन करण्यास प्रेरित करणे : सद़्गुरु काकांनी विश्वविद्यालयातील ‘वेदांग ज्योतिष’ या विषयाच्या प्राध्यापकांना सांगितले, ‘‘न्यूटनच्या सिद्धांताने केवळ गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पेटलेली मशाल उलटी केली असता त्यातील तेजाकर्षणामुळे त्यातील अग्नी सूर्याच्या दिशेने, म्हणजेच ऊर्ध्व दिशेनेच जातो, हे तेजाकर्षण होय.’’ तेजाकर्षणाचा विषय समजण्यास क्लिष्ट असूनही सद़्गुरु काकांनी अत्यंत सुलभतेने सांगितल्याने तो सर्वांना समजला. तेथील ‘वेदांग ज्योतिष’चे प्राध्यापक म्हणाले, ‘‘हा एक संशोधनाचा विषय आहे. या दृष्टीने मी निश्चितच पुढील अभ्यास करीन.’’
८. कर्तेपणा स्वतःकडे न घेणे
प्रवासात असतांना आम्ही सद़्गुरु काकांना त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती सांगत होतो. तेव्हा सद़्गुरु काका म्हणाले, ‘‘पू. पात्रीकरकाकांची (सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांची)) तुमच्या सर्वांवर केवढी कृपा आहे ! त्यांनी माझा सत्संग मिळण्यासाठी तुम्हा सर्वांची निवड केली.’’
९. साधकांकडून साधना करून घेणे
प्रवासात असतांना सद़्गुरु काका साधकांना ‘काय शिकायला मिळाले ? काय चुका लक्षात आल्या ?’, असे अधूनमधून विचारत होते. ‘आम्ही शिकलेल्या सूत्रांपैकी कुठला भाग समाजात कुठे सांगायचा ?’, हेही त्यांनी आम्हाला सांगितले.
१०. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयात आम्ही पंचकर्म चिकित्सालय विभागात गेलो. तिथे काशाचे यंत्र होते. त्यावर पाय ठेवून तेलाने मर्दन करण्याची एक प्रकारची चिकित्सापद्धत होती. तेथील प्राध्यापकांनी सद़्गुरु काकांना ‘काशाच्या यंत्रावर पाय ठेवून मर्दन करून बघणार का ?’, असे विचारल्यावर सद़्गुरु काकांनी लगेचच होकार दर्शवला. सद़्गुरु काका म्हणाले, ‘‘कालपासून माझ्या पायांवर सूज आहे. ती न्यून करण्यासाठी भगवंत मला वेगवेगळी माध्यमे उपलब्ध करून देतो.’’ तेव्हा सद़्गुरु काकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव त्यांच्या शब्दांतून सातत्याने व्यक्त होत होता.
११. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यामधील चैतन्यामुळे आलेल्या अनुभूती
११ अ. सद़्गुरु पिंगळेकाकांच्या सहवासात महाविद्यालयातील प्राचार्यांची भावजागृती होणे, साधकांना हलकेपणा जाणवणे आणि वातावरण चैतन्यमय अन् भावमय होणे : मला सद़्गुरु काकांच्या समवेत प.पू. गोळवलकर गुरुजी महाविद्यालय (रामटेक) येथील प्राचार्य श्री. राजेश सिंगरु यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. तेव्हा सद़्गुरु काकांच्या सत्संगाने श्री. राजेश सिंगरु यांची भावजागृती झाल्याचे मला जाणवत होते. अन्य साधकांनाही हलकेपणा जाणवला. तेथील वातावरण चैतन्यमय आणि भावमय झाले होते.
११ आ. सद़्गुरु पिंगळेकाका घरी आल्यावर तेथे एक सुंदर फुलपाखरू येणे : सद़्गुरु काका घरी आल्यानंतर तिसर्या दिवशी आमच्याकडे एक सुंदर फुलपाखरू आले. तेव्हा सद़्गुरु काका म्हणाले, ‘‘फुलपाखरू म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो.’’ ‘ते फुलपाखरू सद़्गुरु काकांचा सत्संग मिळवायला आले आहे’, असे आम्हाला जाणवले.
१२. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यात जाणवलेला पालट
१२ अ. नखांचा रंग गुलाबी होणे : सद़्गुरु काकांच्या नखांचा रंग गुलाबी झाला आहे. हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरुदेवांनी सर्वप्रथम याविषयी सांगितले, ‘‘आता तुम्ही प्रीतीच्या टप्प्याला गेल्यामुळे तुमच्या नखांचा रंग गुलाबी झाला आहे.’’
१३. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेवांनी आम्हाला सद़्गुरु काकांचा अमूल्य सहवास दिला. त्यांच्या केवळ अस्तित्वानेही संपूर्ण घर चैतन्यमय झाले. आमची अत्यल्प सेवा मोठ्या मनाने गुरुचरणी रुजू करून घेतली’, त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (२.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |