खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करा !

कल्‍याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे, २४ जुलै (वार्ता.) – कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्‍या कल्‍याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांना त्‍यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील आठवड्यात कल्‍याण पूर्वेतील मलंग रस्‍त्‍यावर व्‍दारली गावाजवळ खड्डा चुकवत असतांना पडल्‍यावर सिमेंटचा मिक्‍सर अंगावरून गेल्‍याने सूरज गवारी या तरुणाचा मृत्‍यू झाला होता. याची गंभीर नोंद घेत रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांना उत्तरदायी असलेले ठेकेदार आणि अधिकारी यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी कल्‍याण पूर्व येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

अधिकारी आणि ठेकेदार यांच्‍या बेजबाबदार अन् निष्‍काळजीपणा यांमुळे प्रतिवर्षी कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात रस्‍त्‍यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांंमध्‍ये पडून अनेकांचे जीव जातात. अशा प्रकरणात ठेकेदार आणि अधिकारी यांच्‍यावर कारवाई होत नाही. त्‍यामुळे खड्डे हा प्रकार कायमचा संपवण्‍यासाठी खड्डे अपघात मृत्‍यूप्रकरणी संबंधित कामाचा ठेकेदार आणि अधिकारी यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी केल्‍याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.


खड्ड्यांत पडून अनुचित प्रकार घडल्‍यास अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई !

ठाणे महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांची चेतावणी

ठाणे महानगरपालिकाही आता खड्ड्यांच्‍या संदर्भात खबरदारी घेत आहे. त्‍यानुसार शहरातील प्रत्‍येक प्रभाग समितीमधील रस्‍त्‍यांवर बारकाईने लक्ष देण्‍याच्‍या सूचना महानगरपालिकेचे आयुक्‍त अभिजित बांगर यांनी दिल्‍या आहेत. खड्डे पडल्‍याचे दिसताच ते तत्‍काळ बुजवण्‍यात यावेत. खड्ड्यांत पडून एखादा अनुचित प्रकार घडला, तर त्‍या ठिकाणच्‍या अधिकार्‍यांवर त्‍याचे उत्तरदायित्‍व निश्‍चित करून निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी चेतावणी आयुक्‍तांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांनी २४ जुलै या दिवशी शहरातील रस्‍त्‍यांवर पडलेल्‍या खड्ड्यांचा आढाव घेतला. प्रत्‍येक प्रभाग समिती निहाय अधिकार्‍यांनी रस्‍त्‍यांची पहाणी करावी, नागरिकांच्‍या तक्रारींची वाट न पहाता, तात्‍काळ खड्डे बुजवण्‍यात यावेत असेही आयुक्‍तांनी सांगितले आहे.