साधनेला विरोध करणार्यांना कसे तोंड द्यायचे, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्या लेखाद्वारे सर्वांनाच होणार आहे. आम्हालाही तसे मार्गदर्शन करता येणार नाही. आपल्या लेखाबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपल्यासारख्या आई अनेक झाल्यास भारताचे सात्त्विक हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२१.७.२०२३) |
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर आश्रमात होणार्या शिबिराच्या कालावधीत म्रिण्मयीच्या वडिलांचे घरी येणे रहित होणे
‘म्रिण्मयीचे बाबा (श्री. प्रदीप केळशीकर) नोकरीसाठी देहली येथे रहातात. ते २ किंवा ३ मासांनी घरी येतात. सनातनच्या देवद आश्रमातून म्रिण्मयीला युवा साधकांसाठी असलेल्या साधना शिबिरात सहभागी होण्यासाठी निरोप आला. तेव्हा शिबिराच्याच कालावधीत तिचे बाबा घरी येणार होते. मला वाटले, ‘तिच्या बाबांना हे आवडणार नाही आणि त्यामुळे घरी पुष्कळ वाद होतील.’ मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘भगवंता, तुम्हाला अपेक्षित असे होऊ दे. म्रिण्मयीला शिबिरात सहभागी होता येऊ दे.’ गुरुदेवांच्या कृपेने तिच्या बाबांचे घरी येणे रहित झाले आणि म्रिण्मयी शिबिराला जाऊ शकली.
२. शिबिरासाठी आश्रमात गेल्यावर आणि आश्रमजीवन अनुभवल्यावर म्रिण्मयीला ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटणे; पण ‘तिला ते जमेल का ?’, अशी साधिकेच्या मनात शंका असणे
या शिबिराला गेल्यामुळे म्रिण्मयीला आश्रमजीवन अनुभवता आले. संतांचा सत्संग मिळून त्यांची अपार प्रीती अनुभवता आली. सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरण आणि संतांमधील चैतन्य यांमुळेे तिच्या अंतर्मनातील साधनेचे फूल उमलू लागले. तिला ‘आपणही पूर्णवेळ साधना आणि सेवा करावी’, असे वाटू लागले; पण आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा अन् साधना करण्याविषयी माझी स्वतःची विचार प्रक्रिया सुस्पष्ट नव्हती. ती मला सोडून कुठेही राहिली नव्हती. त्यामुळे ‘तिला आश्रमातील जीवन आत्मसात करता येईल कि नाही ?’, याविषयी माझा आत्मविश्वास अल्प होता.
३. सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनी म्रिण्मयीला पूर्णवेळ साधना करू देण्यासाठी साधिकेला प्रेरणा देणे
एकदा सदगुरु अनुराधा वाडेकर मला म्हणाल्या, ‘‘धनश्रीताई, तुम्ही मनाने निश्चय करून पुढाकार घेतला, तर म्रिण्मयी पूर्णवेळ साधना करू शकेल.’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील सर्व विकल्प दूर झाले आणि म्रिण्मयीच्या पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाविषयी ‘तिच्या बाबांना, माझ्या सासरी आणि माहेरी काय सांगायचे ?’, हेही मला ठरवता आले.
४. ‘गोव्यातील सनातनच्या आश्रमात राहून महाविद्यालयाचे शिक्षण घेणार आहे’, असे म्रिण्मयीने तिच्या वडिलांना समजावून सांगणे
मी यजमानांना म्हणाले, ‘‘म्रिण्मयी बाहेरगावी राहून शिक्षण घेऊ इच्छित आहे. ती गोव्याला सनातनच्या आश्रमात राहून महाविद्यालयाचे शिक्षण घेईल. तिला स्वतःचे दायित्व घेऊन एकटी राहून शिकायचे आहे. अनेक मुले परदेशी राहून शिकून नोकरी करतात. त्यामुळे त्यांना जगाचा अनुभव येऊन ती स्वावलंबी होतात. हा अनुभव आपण आपल्या मुलीलाही द्यायला हवा. त्यासाठी ती गोव्यातील सनातनच्या आश्रमात राहून शिकेल.’’ यजमान म्हणाले, ‘‘तिला बाहेर राहून शिकायचे असेल, तर आपण तिला परदेशी चांगल्या विद्यापिठात प्रवेश घेऊन देऊ या. ती परदेशात शिकेल. गोव्यामध्ये ती काय शिकणार ?’’ तेव्हा म्रिण्मयी त्यांना म्हणाली, ‘‘सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरण, आनंदी आणि तणावमुक्त जीवन, शिस्तबद्धता इत्यादी गोष्टी मला पृथ्वीवर कुठेही शिकायला मिळणार नाहीत; म्हणून मी अन्य कुठेही न जाता सनातनच्या आश्रमातच राहून शिकणार आहे.’’
५. माहेर आणि सासर येथील नातेवाइकांनी केलेला विरोध आणि गुरुकृपेने सुचलेली समर्पक उत्तरे !
५ अ. माहेरच्या नातेवाइकांनी केलेला विरोध आणि गुरुकृपेने त्यांना देता आलेली समर्पक उत्तरे !
५ अ १. म्रिण्मयीच्या निर्णयावर माहेरच्या नातेवाइकांनी यजमानांना दूषणे दिल्यावर गुरुकृपेने यजमानांचे करता आलेले प्रबोधन ! : माझ्या माहेरच्या नातेवाइकांनी म्रिण्मयीच्या या निर्णयाला पुष्कळ विरोध केला. ‘यजमानांनी माझ्याशी भांडावे आणि म्रिण्मयीचा हा निर्णय पालटायला मला भाग पाडावे’, यासाठी सर्व जण माझ्या यजमानांनाही पुष्कळ बोलले, त्यांना दूषणेही दिली. मी यजमानांना सांगितले, ‘‘तुम्ही त्यांचे ऐकून भांडण करू नका. देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, विचार करा, ‘आज समाजामध्ये विद्यार्थी आणि युवा वर्ग यांची स्थिती कशी झाली आहे ? विविध व्यसने, कुसंगती, ‘ड्रग्ज’, स्वातंत्र्याचा अपवापर’, असे सर्व बोकाळले आहे. आज मुली आई-वडिलांना न जुमानता कुणाच्याही संगतीत रहातात. पळून जाऊन विवाह करतात. यापेक्षा आपली मुलगी देश आणि धर्म यांसाठी सेवा करणार आहे अन् त्या समवेत शिक्षणही घेणार आहे.’’
५ अ २. माहेरच्या नातेवाइकांच्या विरोधाला स्थिर राहून ‘म्रिण्मयीचा निर्णय योग्य कसा आहे ?’, ते सांगता येणे : माहेरच्या लोकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. ते मला म्हणाले, ‘‘आम्ही तुझ्या मुलीच्या भवितव्यासाठीच सांगत आहोत. ती अशी आश्रमात राहिल्यावर ‘तिच्याशी विवाह कोण करणार ?’, ‘तिला नोकरी कोण देणार ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘म्रिण्मयी आता शिक्षण घेत आहे. आताच आपण तिची नोकरी आणि लग्न यांचा विचार करायला नको. ‘पुढे तिचे चांगलेच होईल. जगातील कुठलेही विद्यापीठ तिला सनातन आश्रमासारखे शिक्षण देऊ शकणार नाही. तिने घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व तुम्हा सर्वांना पुष्कळ कालावधीनंतर कळेल’, असा मला आत्मविश्वास आहे.’’
५ आ. सासरच्या नातेवाइकांनी केलेला उपहास !
५ आ १. सासरच्या नातेवाइकांनी उपहासात्मक बोलल्यावर ‘त्यांना कसे उत्तर द्यायचे ?’, ते म्रिण्मयीशी बोलून आधीच ठरवणे : माझ्या सासरची मंडळी पुष्कळ शिकलेली आहेत. ती विदेशात रहाणारी आणि घरीही इंग्रजीतून बोलणारी आहेत. म्रिण्मयीच्या आश्रमात रहाण्याच्या निर्णयावर त्यांनी काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही; परंतु उपहास अधिक केला. ते कुत्सित भावाने तिला विचारायचे, ‘‘म्रिण्मयी, तू प्रतिदिन आश्रमात काय करतेस ? तुमची दिनचर्या कशी असते ? महाविद्यालयात कशी जातेस ?’’ तिला ‘या सर्व प्रश्नांना आत्मविश्वासपूर्वक उत्तरे कशी द्यायची ?’, हे कळत नव्हते; म्हणून या नातेवाइकांना भेटण्यापूर्वी आम्ही (मी आणि म्रिण्मयी) ‘अशा प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची?’, हे आधीच ठरवत असू.
५ आ २. सासरच्या लोकांचे उंची रहाणीमान पाहून मुलांचे मन अस्थिर होणे; पण गुरुकृपेने त्यांना साधनेचे महत्त्व लक्षात आणून देता येणे : माझ्या सासरच्या नातेवाइकांची मुले विदेशात शिकतात. त्यांच्या मोठ्या वेतनाच्या नोकर्या आणि उंची रहाणीमान यामुळे माझ्या दोन्ही मुलांच्या मनात अस्थिरता निर्माण होते. गुरुकृपेने मला त्यांना सांगता आले, ‘‘करोडो रुपये देऊनही अध्यात्मातील एक छोटीशी अनुभूतीही मला प्राप्त होऊ शकत नाही. आपण भाग्यवान आहोत. आपल्या जीवनात जो काही आनंद, समाधान आणि शांती आहे, ती केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच आहे. आपल्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेव आले असल्यामुळे आनंद आणि सकारात्मकता आहे, तर नातेवाइकांच्या जीवनात केवळ सुख आहे. पुढे भविष्यकाळात हेच नातेवाईक मनाची शांती मिळवण्यासाठी आपल्याकडे येतील.’’ हा विचार ऐकून मुलांचा आत्मविश्वास टिकून राहिला.
६. म्रिण्मयीला आश्रमात राहिल्यावर ‘अध्यात्म जगण्यात खरे जीवन आहे’, हे समजणे आणि तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी श्रद्धा दृढ होणे
म्रिण्मयीला आश्रमात राहून साधना करतांना अनेक अनुभूती आल्या. ‘अध्यात्म जगण्यात खरे जीवन आहे’, हे तिला कळले. तिची श्रद्धा, भाव आणि भक्ती श्री गुरुचरणी दृढ झाली. ती म्हणते, ‘‘आई, मी आश्रमाविना जगू शकणार नाही, आश्रम हेच माझे घर आहे आणि श्री गुरू हेच माझे आई-वडील आहेत.’’ कधी कधी ती घरी येते, तेव्हा आश्रमाच्या आठवणीने तिला रडू येते.
७. सासूबाईंनी म्रिण्मयीच्या काळजीपोटी तिची पत्रिका एका चांगल्या ज्योतिषाला दाखवणे, तेव्हा त्यांनी ‘तुमच्या घराण्यात या मुलीने जन्म घेतला, हे तुमचे भाग्य समजा’, असे सांगणे
म्रिण्मयीने आश्रमात राहून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या सासूबाईंनी ‘म्रिण्मयीच्या जीवनात पुढे काय आहे ? तिचे कसे होईल ?’, हे समजावे’, यासाठी तिची पत्रिका एका चांगल्या ज्योतिषाला दाखवली. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘इतिहास घडवणार्यांची जशी पत्रिका असते, तशी तुमच्या नातीची पत्रिका आहे. तुम्ही भाग्यवान आहात की, अशा मुलीने तुमच्या घरात जन्म घेतला. तुमची नात पुष्कळ सात्त्विक आहे. तुमच्या घराण्याचा उद्धार करणारी आहे. तुम्ही तिची काळजी करू नका. तिचा निर्णय तुम्ही आनंदाने स्वीकारला, तर तुमचेही भले होईल.’’
८. गुरुकृपेने म्रिण्मयीला साधना करण्यास विरोध करणार्यांना आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देता येणे
ज्यांनी म्रिण्मयीच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला विरोध केला, त्यांना मी स्पष्टपणे सांगितले, ‘‘तिचा निर्णय योग्य आहे. तुम्हाला तिची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही.’’ ज्यांनी निंदा केली, त्यांच्याकडे मी लक्ष दिले नाही. जिथे बुद्धीने उत्तरे द्यायची, तिथे गुरुकृपेने बुद्धीचातुर्याने उत्तरे देता आली. जिथे परखडपणे उत्तरे देण्याची आवश्यकता होती, तिथे तशी उत्तरे दिली गेली. त्यामुळे समोर येऊन भांडणे करून कुणी विरोध केला नाही.
९. कृतज्ञता आणि प्रार्थना
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कृपेमुळेच म्रिण्मयी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊ शकली. यासाठी शब्दांतून कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपूर्णच आहे.
हे भगवंता, हे गुरुदेवा, ‘मला सर्वस्वाचा त्याग करून सातत्याने सत्सेवेत रहाता येऊ दे. मला अखंड कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना.’
– सौ. धनश्री केळशीकर, मुंबई (२९.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |