‘फास्‍ट टॅग’ असूनही टोलसाठी अमित ठाकरे यांची गाडी थांबवल्‍यामुळे मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून टोलनाक्‍याची तोडफोड !

सिन्‍नर नोंदे फाट्यावरील  टोलनाक्‍याची तोडफोड

मुंबई – गाडीला ‘फास्‍ट टॅग’ असूनही टोलसाठी अमित ठाकरे यांची गाडी थांबवल्‍यामुळे मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्‍नर नोंदे फाट्यावरील  टोलनाक्‍याची तोडफोड केली. यावर माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना ‘साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्‍यामुळे आणखी एकाची भर पडली’, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. २२ जुलैच्‍या रात्री समृद्धी महामार्गावरील नाशिक-सिन्‍नरजवळील टोलनाक्‍यावर ही घडना घडली.

शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या मंदिरात दर्शन घेऊन अमित ठाकरे नाशिक येथे परतत असतांना त्‍यांना येथील टोलनाक्‍यावर अडवण्‍यात आले. याविषयी सांगतांना अमित ठाकरे म्‍हणाले, ‘‘आमच्‍या गाडीला फास्‍ट टॅग असतांनाही गाडी अडवण्‍याचा रॉड खाली आला. टोलनाक्‍यावर काहीतरी तांत्रिक अडचण असल्‍यामुळे तसे झाले. टोलनाक्‍यावरील कर्मचारी उद्धटपणे बोलत होते. व्‍यवस्‍थापकाला संपर्क केला असता त्‍याची भाषाही उद्धट होती. मला १० मिनिटे थांबवून त्‍यानंतर आमची गाडी सोडण्‍यात आली. नाशिकला हॉटेलमध्‍ये पोचल्‍यावर तो टोलनाका कुणीतरी फोडल्‍याचे मला समजले.’’

या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कारवाई करण्‍यात आलेली नाही. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्‍याविषयी टोलनाक्‍याच्‍या अधिकार्‍यांनी दिलगिरी व्‍यक्‍त केली.

राहाता (अहिल्‍यानगर) येथे अमित ठाकरे यांनी वेळ न दिल्‍याने कार्यकर्त्‍यांची राजीनामा देण्‍याची सिद्धता !

अहिल्‍यानगर – ४ दिवस सिद्धता करून वाट पाहिल्‍यानंतर अमित ठाकरे केवळ २० सेकंद थांबले; म्‍हणून त्‍यांच्‍या संतप्‍त कार्यकर्त्‍यांनी उद़्‍घाटनासाठी सिद्ध केलेल्‍या फलकावरील ‘जिलेटीन’ कागद फाडून ठाकरे यांच्‍या कृतीचा निषेध व्‍यक्‍त केला, तसेच पदाचे राजीनामेही देणार असल्‍याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.