पुणे येथे नदीपात्रात राडारोडा टाकल्‍याच्‍या प्रकरणी तिघांवर गुन्‍हा नोंद !

पुणे – पिंपळे गुरव येथे २२ जुलै या दिवशी पवना नदीच्‍या पात्रात राडारोडा टाकल्‍याच्‍या प्रकरणी तिघांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पिंपरीचिंचवड महापालिकेच्‍या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील आरोग्‍य निरीक्षक अमोल गोरखे यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. नागनाथ मंजुळकर, शिवाप्‍पा पुजारी, हनुमंत पवार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिन्‍ही आरोपींना कह्यात घेतले आहे. सांगवी पोलीस अन्‍वेषण करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी त्‍यांच्‍या जवळील २ ‘टेम्‍पो’ आणि १ ‘ट्रॅक्‍टर’ यांच्‍या साहाय्‍याने पिंपळे गुरव येथे पवना नदी पात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकला. नदीचे पाणी प्रदूषित करण्‍याची कृती केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.