परिपूर्ण आणि तळमळीने सेवा करणार्‍या उंचगाव येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव !

वैद्या (कु.) सुजाता जाधव

१. ‘एका वाक्‍यात सांगायचे, तर वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव म्‍हणजे साधी, सरळ, कुणाच्‍याही अध्‍यात-मध्‍यात नसणारी, तत्त्वनिष्‍ठ आणि सुसंस्‍कारी मुलगी ! 

२. सुश्री सुजाता यांचे घर म्‍हणजे प्रसारातील साधकांसाठी हक्‍काचे घर असणे 

वर्ष २००१ ते २००७ या कालावधीत सुजाताचे उंचगाव (कोल्‍हापूर) येथील घर आम्‍हा प्रसारातील साधकांसाठी नेहमीच हक्‍काचे घर होते. सत्‍संग आणि सामूहिक सेवा यांसाठी तिच्‍या घराचे दार २४ घंटे उघडे असायचे. ‘सामूहिक सेवा, म्‍हणजे आकाशकंदील बनवणे, त्‍यांना लागणारे साहित्‍य ठेवणे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सादर करायच्‍या नाटिकांचा सराव करणे’, यांसाठीही आम्‍ही तिच्‍या घरी जायचो. मी आणि माझी मोठी बहीण सौ. नंदिनी हर्षे (पूर्वाश्रमीच्‍या कु. मीनाक्षी चव्‍हाण) विज्ञापनांची सेवा करण्‍यासाठी काही वेळा तिच्‍याकडे हक्‍काने राहिलो आहोत. तेव्‍हा बर्‍याच वेळा आमचा सकाळचा अल्‍पाहार आणि जेवणही तिच्‍याकडेच असायचे. रात्री उशिरापर्यंत जागरण करून सेवा करायची असल्‍यास आम्‍ही तिथेच राहून सकाळी वैयक्‍तिक आवरून एकत्र सेवेला जात असू. ती तिचे आयुर्वेदाचे (बी.ए.एम्.एस्.चे) शिक्षण सांभाळून सर्व सेवांमध्‍ये सहभागी व्‍हायची.

सौ. श्रद्धा निंबाळकर

३. लहानपणापासून चांगले संस्‍कार असल्‍याने धार्मिक सण शास्‍त्रोक्‍त पद्धतीने साजरे करणे

लहानपणापासूनच तिच्‍यावर चांगले संस्‍कार झालेले असल्‍याने ती स्‍तोत्रपठण, पूजा-अर्चा इत्‍यादी नियमित करत असे. ती लहान असतांनाच तिच्‍या वडिलांचे निधन झाले. घरी कुणीही कर्ता पुरुष नसूनही ती ‘तुलसी विवाह, लक्ष्मीपूजन, गणेशोत्‍सव’ इत्‍यादी सण आणि उत्‍सव पुढाकार घेऊन शास्‍त्रोक्‍त पद्धतीने साजरे करत असे. त्‍यामुळे तिच्‍या आईला तिचा भाऊ किंवा वडील यांची उणीव भासत नसे; उलट आईला तिचा आधार वाटत असे.

४. सेवेची तळमळ

४ अ. अचूक आणि परिपूर्ण सेवा करणे : तिने केलेली सेवा अचूक असायची. ‘तिला कोणतीही सेवा दिली, तरी ती परिपूर्ण आणि चुकांविरहित असणार’, याची आम्‍हाला निश्‍चिती होती. तिचे हस्‍ताक्षर सुवाच्‍च होते.

४ आ. दायित्‍व घेऊन सेवा करणे : महाविद्यालय सांभाळून जो वेळ उरेल, तो ती सेवेलाच द्यायची. गुरुपौर्णिमेच्‍या काळात ‘कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, आयोजन, ग्रंथप्रदर्शन लावणे, सत्‍संग घेणे, विज्ञापने मिळवणे’, अशा वेगवेगळ्‍या सेवा तिने दायित्‍व घेऊन केल्‍या आहेत.

५. ती घरी आलेल्‍या सर्वांचे आदरतिथ्‍य पुष्‍कळ चांगले करत असे.

६. रुग्‍णाईत असूनही अत्‍यंत शांत आणि स्‍थिर असणे

सध्‍या ती कर्करोगामुळे रुग्‍णाईत असल्‍याने रायगाव (कराड) येथे तिच्‍या चुलत भावांकडे रहात आहे. २३.६.२०२३ या दिवशी आम्‍ही तिला  भेटलो. तेव्‍हा ती अत्‍यंत स्‍थिर आणि शांत जाणवली. ‘तिने तिचे प्रारब्‍ध सहजतेने स्‍वीकारले आहे’, असे मला जाणवले. तिला सांगितलेले नामजपादी उपाय ती गांभीर्याने पूर्ण करत होती.

‘हे गुरुदेव, ‘सुजाता हिच्‍या या संघर्षाच्‍या काळात तिला शक्‍ती द्या आणि तिची श्रद्धा, भाव अन् भक्‍ती अखंड वाढू द्या’, हीच तुमच्‍या चरणी प्रार्थना !’

रुग्‍णाईत असलेल्‍या वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांचे छायाचित्र पाहिल्‍यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर आनंद जाणवणे

‘सुश्री (कु.) सुजाता जाधव हिची भेट झाल्‍यावर मी तिचे छायाचित्र काढले होते. ते छायाचित्र माझी बहीण कु. मेघा चव्‍हाण हिने पाहिल्‍यावर तिला जाणवले, ‘सुजाता रुग्‍णाईत असली, तरी त्‍यांच्‍या चेहर्‍यावर आनंद दिसतो.’

– सौ. श्रद्धा सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२३)

परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असणार्‍या सुश्री (कु.) सुजाता जाधव !

‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांमध्‍ये सुश्री (कु.) सुजाता जाधव उत्तम सेवा करत असे. तिला परिपूर्ण सेवेचा ध्‍यास होता. तिला कर्करोग झाल्‍याचे तिने कधीही त्‍याविषयी सहानुभूती मिळवण्‍याच्‍या दृष्‍टीने कुणाला सांगितले नाही. त्‍या आजारपणातही तिने तिला शक्‍य असणार्‍या सेवा आणि इतरांना साहाय्‍य केले.’

– सौ. नंदिनी हर्षे, मुल्‍की, कर्नाटक. (१९.७.२०२३)