जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ आंबेगाव (पुणे) येथे निषेध मोर्चा !

जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ आंबेगाव (पुणे) येथे निषेध मोर्चा !

आंबेगाव (जिल्‍हा पुणे) – जैन समाजाचे तपस्‍वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमारनंदीजी महाराज यांच्‍या कर्नाटकातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्‍यांची हत्‍या केली होती, तसेच त्‍यांच्‍या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ‘बोअरवेल’मध्‍ये फेकले. भारतीय संस्‍कृतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ सकल जैन संघाच्‍या वतीने २० जुलै या दिवशी घोडेगाव, तालुका आंबेगाव येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. जैन साधूंची हत्‍या करणार्‍यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्‍हावी, तसेच सर्व जैन साधु-संतांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली.

काही वर्षांपूर्वी कवठा (ता. शिरूर) येथेही जैन साधूवर आक्रमण झाले होते. वास्‍तविक जैन समाज अहिंसेचा पुरस्‍कार करणारा असतांनाही भारतामध्‍ये वारंवार जैन साधूंवर आक्रमण होत आहेत. जैन समाजाची धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रेही सुरक्षित नाहीत. जैन धर्मियांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, आमची मागणी शासनदरबारी मांडावी. जैन साधूंची हत्‍या करणार्‍यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्‍हावी.