नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने समितीसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्‍था यांच्‍यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्‍ये सहभागी झाले होते. या मोर्चात सनातनच्‍या साधकांना समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद, जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

२१ जुलै २०२३ या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703398.html


४. मोर्चाच्‍या कालावधीत जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

हिंदु जनसंघर्ष मोर्चा

४ अ. पू. अशोक पात्रीकर मोर्चाच्‍या स्‍थळाजवळील देवळातील श्री भगवतीदेवीचे पूजन करत असतांना आलेल्‍या अनुभूती

१. ‘मोर्चाच्‍या आरंभी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) आणि मान्‍यवर यांच्‍या शुभहस्‍ते मोर्चाच्‍या स्‍थळाजवळील देवळातील श्री भगवतीदेवीचे पूजन झाले.

पू. पात्रीकरकाका देवीची पूजा करत असतांना मंदिरात पुष्‍कळ थंडावा जाणवला आणि आमचा भाव जागृत झाला.

२. ‘आई भगवती स्‍मितहास्‍य करत असून सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे आम्‍हाला वाटत होते.’

– श्रीमती सुषमा पराते आणि श्रीमती चित्रा खटी

४ आ. ‘मोर्चा चालू झाल्‍यावर आकाशात निळी, काळी आणि पिवळी फुलपाखरे उडत होती. जणू ‘फुलपाखरांच्‍या माध्‍यमातून देवताच आल्‍या आहेत’, असे आम्‍हाला वाटले.’ – श्रीमती सुषमा बत्रा, सौ. प्रांजली विजय ब्रह्मे आणि सौ. नमिता देवकुमार काकडे

४ इ. ‘मोठ्याने बोलल्‍यावर मला खोकल्‍याची उबळ येते; पण मोर्चात घोषणा देतांना मला एकदाही खोकला आला नाही.’ – सौ. स्‍मिता मिलिंद दाणी (वय ६० वर्षे)

४ ई. घरी राहून ‘ऑनलाईन’ मोर्चा पहातांना आलेल्‍या अनुभूती

१. ‘आम्‍हाला घरी राहून ‘ऑनलाईन’ मोर्चा पहायला मिळाला. मोर्चाला आरंभ होताच आमच्‍या डोळ्‍यांतून अखंड भावाश्रू येत होते.

२. घरी राहून आम्‍हाला तिथले चैतन्‍य अनुभवायला मिळत होते.

३. आम्‍ही मोर्चात मानसरित्‍या सहभागी झालो होतो. आपसूकच हात वर करून आमच्‍याकडून उत्‍साहाने घोषणा दिल्‍या जात होत्‍या. काही वेळाने आम्‍ही भानावर आलो. त्‍या वेळी ‘आम्‍ही घरी आहोत’, हे आमच्‍या लक्षात आले.’

– श्रीमती छाया चिंचोळकर (वय ६८ वर्षे) आणि सौ. शोभा माहुलकर (वय ६४ वर्षे)

४ उ. ‘श्री. सुनील घनवट (राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड) मंचावर बोलत असतांना ‘तिथे साक्षात् छत्रपती शिवाजी महाराज यांचे विराट रूप आहे’, असे मला जाणवत होते.

४ ऊ. समारोपाच्‍या वेळी ‘वन्‍दे मातरम्’ ऐकत असतांना आम्‍ही देहभान विसरून गेलो होतो.’

– श्रीमती सुषमा बत्रा आणि सौ. नमिता काकडे

५. समाजातील हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

विश्‍व हिंदु परिषदेच्‍या सौ. निकिता पराळे यांनी घेतलेला सहभाग आणि काढलेले गौरवोद़्‍गार ! : ‘विश्‍व हिंदु परिषदेच्‍या सौ. निकिता पराळे यांनी प्रबोधन करून १० – १५ महिलांना मोर्चात सहभागी करून घेतले. त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘आम्‍ही पुष्‍कळ मोर्चे पाहिले; पण असा मोर्चा कधीच पाहिला नाही. घोषणा देतांना माझ्‍या अंगावर काटा येत होता, तसेच माझ्‍या डोळ्‍यांत अश्रू येत होते.’’ – श्रीमती कल्‍पना अर्वेनला (वय ६० वर्षे)

५ अ. आतापर्यंत विरोध करणारे हिंदू मोर्चात सहभागी होणे आणि त्‍यांनी प्रचाराची सेवाही करणे : ‘आतापर्यंत काही हिंदू धर्मकार्यापासून दूर रहात होते, तसेच कधी कधी प्रत्‍यक्ष विरोधही करत होते. त्‍यांतील बरेच जण स्‍वतः मोर्चात पूर्णवेळ सहभागी झाले. मोर्चाच्‍या आदल्‍या दिवसापासून त्‍यांनी ‘सोशल मिडिया’च्‍या माध्‍यमातून स्‍वतः मोर्चाचा प्रचार चालू केला आणि त्‍यांच्‍या परिचितांनाही निमंत्रण दिले.’ – सौ. प्रांजली विजय ब्रह्मे आणि सौ. नमिता देवकुमार काकडे

५ आ. सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातून प्रचार केल्‍यावर अनेकांनी विषय समजून घेणे आणि मोर्चात सहभागी होणे : सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातून मोर्चाचा प्रचार चालू झाल्‍यावर संपूर्ण महाराष्‍ट्रातून अनेक भ्रमणभाष येऊ लागले. प्रत्‍येक जण हा विषय स्‍वतःचा समजून पूर्वसिद्धता आणि मोर्चा यांमध्‍ये आपला सहभाग दर्शवत होते. त्‍यांनी सांगितले, ‘‘समितीने अतिशय महत्त्वाचा विषय पुढे आणला. आम्‍हीही याचा प्रचार करू आणि सहभागी होऊ.’’ त्‍यांनी प्रत्‍यक्षात तशी कृतीही केली.

५ इ. नागपूर जिल्‍ह्यातील अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन समविचारी लोकांना मोर्चाला येण्‍यास प्रेरित केले आणि मोर्चा व्‍यापक होण्‍यासाठी सक्रीय सहभाग घेतला.

– श्री. अतुल अर्वेनला

५ ई. रिक्‍शावाल्‍यांना मोर्चाचा विषय सांगितल्‍यावर त्‍यांनी रिक्‍शावर विनामूल्‍य पत्रके लावून घेणे आणि इतरांनाही त्‍यासाठी उद्युक्‍त करणे : ‘रिक्‍शांवर पत्रके लावण्‍याची सेवा आम्‍हाला मिळाली. तेव्‍हा ‘रिक्‍शांवर पत्रके लावण्‍याचे किती पैसे देणार ?’, असे रिक्षाचालक विचारत होते. पत्रकांचे महत्त्व आणि मोर्चाचा विषय सांगितल्‍यावर ते सर्व जण रिक्‍शावर पत्रके लावून घेण्‍यास तयार झाले. ते इतरांनाही त्‍यांच्‍या रिक्‍शांवर पत्रके लावून घेण्‍यास सांगत होते.’ – श्रीमती सुषमा बत्रा, श्रीमती सुषमा पराते, सौ. पारुल देशपांडे (वय ६६ वर्षे), सौ. स्‍मिता मिलिंद दाणी, सौ. जयश्री देशपांडे, सौ. नमिता काकडे आणि सौ. जयश्री क्षीरसागर (वय ७४ वर्षे)

५ उ. टेकडी गणपति मंदिराच्‍या कार्यकारिणीतील दोघांनी ‘बाहेरगावाहून येणारे साधक आणि धर्माभिमानी यांच्‍यासाठी पुरी-भाजीची १ सहस्र २०० पाकिटे देऊ’, असे सांगणे : मोर्चात बाहेरगावाहून येणारे १ सहस्र २०० साधक आणि धर्माभिमानी यांच्‍या जेवणाची व्‍यवस्‍था अल्‍प कालावधीत करायची होती. गुरुकृपेने टेकडी गणपति मंदिराच्‍या नवीन कार्यकारिणीतील दोघे श्री. विनय शास्‍त्री यांच्‍या परिचयाचे होते. त्‍यामुळे श्री. शास्‍त्री यांनी गोव्‍याहून त्‍यांच्‍याशी भ्रमणभाषवर संपर्क करून त्‍यांना विषय सांगितला आणि साहाय्‍य मागितले. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले, ‘‘तुमचा विषय चांगला आहे. आम्‍ही साहाय्‍य करू.’’ नागपूर येथील समिती समन्‍वयक श्री. अतुल अर्वेनला त्‍यांना प्रत्‍यक्ष भेटले. तेव्‍हा मंदिर विश्‍वस्‍तांनी ‘पुरी-भाजीची १ सहस्र २०० पाकिटे देऊ’, असे सांगितले.

५ ऊ. टेकडी मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांनी ‘फ्‍लेक्‍स’ लावायला आणि ‘सेल्‍फी पॉईंट’ ठेवायला अनुमती देणे : ‘टेकडी मंदिरात प्रतिदिन सहस्रो भक्‍तगण येतात. त्‍यांत महिला अधिक असतात. अशा महत्त्वाच्‍या ठिकाणी ‘फ्‍लेक्‍स’ लावायला आणि ‘सेल्‍फी पॉईंट’ (टीप) ठेवायला मंदिर विश्‍वस्‍तांनी अनुमती देऊन जागा उपलब्‍ध करून दिली.’ – सौ. नम्रता विनय शास्‍त्री

टीप – भ्रमणभाषवरून छायाचित्रे काढण्‍याची जागा

५ ए. हितचिंतकांची पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या सहस्रो बाटल्‍या अर्पण स्‍वरूपात देणे : ‘गुरुकृपेने अज्ञात हितचिंतकांनी मोर्चासाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या सहस्रो बाटल्‍या पाठवल्‍या, तसेच २ हितचिंतकांनी २ सहस्र पाण्‍याच्‍या बाटल्‍या अर्पण स्‍वरूपात दिल्‍या.’ – सौ. नम्रता शास्‍त्री, सौ. उषा किटकरू आणि श्रीमती कल्‍पना अर्वेनला

५ ऐ. एका माजी आमदारांनी ३ मोठी ‘होर्डिंग्‍ज’ प्रायोजित करून त्‍यासाठी जागाही देणे : ‘मोर्चाचा प्रचार व्‍हावा; म्‍हणून मोठे ‘होर्डिंग’ लागावे’, अशी माझी पुष्‍कळ इच्‍छा होती. माझ्‍याकडून त्‍या दृष्‍टीने प्रयत्नही होत होते; पण प्रायोजक मिळत नव्‍हते. एका परिचितांना त्‍याविषयी सांगितल्‍यावर त्‍यांनी नगरसेवकांच्‍या नावाची सूची पाठवली. त्‍यानुसार साधकांनी संपर्क केले असता एका माजी आमदारांनी ३ मोठी ‘होर्डिंग्‍ज’ प्रायोजित करून त्‍यासाठी जागाही दिली. हे केवळ गुरुकृपेनेच झाले.’ – सौ. उषा किटकरू

५ ओ. ‘समितीचे कार्य आणि मोर्चा यांविषयी सांगितल्‍यावर एका दुकानदाराने साहित्‍य अल्‍प दरात उपलब्‍ध करून दिले, तसेच गाद्या, उशा, चादरी, अभ्रे, पटल, आसंद्या इत्‍यादी सगळे नवीन कोरे साहित्‍य दिले.’ – सौ. नमिता काकडे

६. कृतज्ञता

आम्‍हा सर्व साधकांना ‘प्रत्‍येक हिंदू या मोर्चात सहभागी झाला पाहिजे’, हा एकच ध्‍यास लागला होता. त्‍याच तळमळीने आम्‍ही लोकांना संपर्क करण्‍याची सेवा करत होतो.  ‘प्रत्‍येक सेवा प.पू. गुरुमाऊलींनीच दिलेली आहे’, या भावाने आमच्‍याकडून सेवा होत होती. त्‍यामुळे समोरची व्‍यक्‍ती उत्‍स्‍फूर्तपणे सर्व ऐकून घेत होती. लोक म्‍हणाले, ‘‘हा कायदा झालाच पाहिजे. तुमची संस्‍था पुष्‍कळ चांगले कार्य करत आहे. आमचा या कार्याला पूर्ण पाठिंबा आहे. आम्‍ही मोर्चात नक्‍कीच सहभागी होणार.’’ सेवा करून आमचे शरीर थकले, तरीही मन थकले नव्‍हते. मन त्‍या स्‍थितीतही सेवेसाठी शरिराला कार्यरत ठेवत होते. आम्‍हाला पुष्‍कळ आनंद आणि गुरुकृपेचे संरक्षककवच अनुभवायला मिळाले. विकल्‍प आणि पूर्वग्रह यांच्‍या पलीकडे जाऊन आम्‍हाला प्रेमभाव अनुभवता आला आणि संघटितपणे सेवा करता आली. ‘आमची पात्रता नसतांनाही गुरुदेवांनी आम्‍हाला इतकी मोठी सेवेची संधी दिली. रात्रंदिवस एकच ध्‍यास मनात ठेवून त्‍यानुसार आमच्‍याकडून प्रयत्न करून घेतले’, त्‍याबद्दल आम्‍ही गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

(समाप्‍त)

– सर्व साधक, नागपूर (२९.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक