हावडा (बंगाल) येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याची घटना उघड !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील हावडा येथे एका महिलेने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याचा आणि छेडछाड करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ८ जुलैला पंचाला गावात घडल्याचे तिने म्हटले आहे. या दिवशी राज्यात पंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले होते. तेव्हा बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. महिलेच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एस्.के., रणबीर पांजा संजू, सुकमल पांजा आदींची नावे आहेत.

१. या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी माझ्यावर काठ्यांनी आक्रमण केले आणि मला मतदान केंद्रपासून दूर फेकून दिले. त्यांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून मला विवस्त्र केले. सर्वांसमोर माझी छेड काढली आणि मला अयोग्य रितीने स्पर्श केला.

२. या घटनेविषयी भाजपचे माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना काही लाज आहे का ? तुमच्या सचिवालयापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला तुमच्या बंगालकडे लक्ष द्यायला हवे.’

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी मणीपूरमधील २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती.

संपादकीय भूमिका

  • मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?
  • बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथे हिंसाचाराने मर्यादा ओलांडली असल्याने तेथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य आहे !