राज्‍यभर पाऊस चालूच !

  • नद्या-नाल्‍यांना पूर     

  • शहरात नागरिकांचे हाल   

  • शेतपिकांची हानी

मुंबई – राज्‍यात पश्‍चिम महाराष्‍ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्‍ट्र आणि मराठवाडा आदी सर्वच ठिकाणी २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. राज्‍यात सर्वच ठिकाणच्‍या नदी-नाल्‍यांना पूर आला असून त्‍यांच्‍या आसपासचे अनेक मार्ग बंद पडल्‍याने अनेक खेडेगावांचा संपर्क तुटला आहे. बहुतेक ठिकाणच्‍या शाळांना राज्‍य सरकारने सुटी घोषित केली आहे. शहरी भागांत पावसामुळे रेल्‍वे आणि रस्‍ते वाहतुकीचाही खोळंबा झाल्‍याने नागरिकांना प्रचंड मनस्‍ताप सहन करावा लागला.

रायगड, रत्नागिरी, पुणे हे जिल्‍हे, तसेच महाबळेश्‍वर, लोणावळा आणि घाटमाथ्‍यावर पावसाचा जोर अधिक होता. तर या ५ भागांना अतीवृष्‍टीची चेतावणी देण्‍यात आली होती.

१. मुंबई उपनगरांमध्‍ये पावसाची संततधार असल्‍याने आधीच खड्डे असलेले बहुतांश रस्‍ते जलमय झाले. रेल्‍वेवाहतूक विस्‍कळीत झाली होती. दोन्‍हींमुळे नागरिकांच्‍या प्रवासाचा खोळंबा झाला. मुंबईसह कोकणात पावसाने थांबण्‍याचे नाव घेतले नाही. मुंबईतील उपनगरांना जोडणार्‍या मुक्‍त मार्ग, पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्ग येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. शहरातील रस्‍त्‍यांवरही पाणी साचल्‍याने एरव्‍ही धावत असलेल्‍या मुंबईकरांची गती संथ झाली. नवी मुंबईमध्‍ये पावसामुळे ६ ठिकाणी झाडे कोसळली.

२. ठाणे आणि पालघर जिल्‍ह्यांत २० जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्‍यात आला. मुंबईसह ठाणे, कल्‍याण, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्‍हासनगर या परिसरांत पावसाने धुमाकूळ घातला. वालधुनी आणि उल्‍हास या नद्यांना पूर आला.

३. पनवेलजवळील पुनर्वसित वरचे ओवळे गावात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्‍यामुळे भूस्‍खलन झाले. त्‍यामुळे येथील डोंगरावरील माती वसाहतींमध्‍ये घुसली आहे. इमारतीमध्‍ये चिखल गेला आहे. गाड्याही चिखलात अडकल्‍या आहेत.  नागोठणे येथील बाजारपेठ पाण्‍यात बुडाली होती.

४. महाबळेश्‍वरमधून पोलादपूरला जाणार्‍या आंबेनळी आणि कोयनानगरपासून चिपळूणला जाणार्‍या कुंभार्ली घाटात १९ जुलैला दरड कोसळली. यामुळे वाहतूक ठप्‍प झाली होती.

५. सातपुड्यात मुसळधार पाऊस झाल्‍याने नदीकाठावरील शेकडो घरांत पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला. निंभोरा परिसरात केळी उत्‍पादकांच्‍या बागांची सर्वाधिक हानी झाली.

६. नांदेड शहरालगत असलेल्‍या आसना नदीत दोन मुलांचा बुडून मृत्‍यू झाला.

७. अमरावती येथील काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडल्‍याने शेतीची पुष्‍कळ हानी झाली.

८. घाटमाथ्‍यावर मुसळधार, तर पुणे जिल्‍ह्याच्‍या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. मावळ, मुळशी, वेल्‍हे, मंचर, जुन्‍नर, भीमाशंकर या भागांत जोराचा पाऊस पडला. साहाय्‍यासाठी एन्.डी.आर्.एफ्.चे पथक सांगली जिल्‍ह्यात आले आहे.