देवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्याचे प्रकरण
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील शिवकालीन आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाल्याची माहिती मोजणी अहवालातून समोर आली. १८ जुलै या दिवशी मोजणी अहवाल जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आला; मात्र ‘अलंकार कधी गहाळ झाले ?’, याचा खुलासा अहवालात नाही. त्यामुळे या प्रकरणी अलंकारांची पुन्हा पडताळणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. (‘श्री तुळजाभवानीदेवीच्या अलंकारांमध्येच अपहार होत असेल, तर मंदिराच्या कारभारात किती गलथानपणा असेल ?’, याचा अंदाज यावरून येतो. त्यामुळे मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्याच कह्यात द्यायला हवीत ! – संपादक)
देवीच्या नित्योपचारांतील ७ डब्यांतील शिवकालीन अलंकार गायब आहेत. यात देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचू यांचा समावेश आहे. वर्ष १९६३ मध्ये नोंदवलेल्या काही शिवकालीन अलंकारांच्या नोंदी नव्या नोंदीत आढळल्याच नाहीत, तर काही अलंकारांच्या वजनामध्ये तफावत आढळून आली असून १९.२५० कॅरेट हिर्याची नोंदच वहीत नाही.
दागिने गायब झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ! – उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्रमुंबई, २० जुलै (वार्ता.) – श्री तुळजाभवानीमातेचे शिवकालीन अलंकार गायब होणे, हे अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. अलंकार चोरीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केली आहे. याविषयीचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले. डॉ. गोर्हे यांना हे प्रकरण समजताच त्यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी अतीउच्च दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी केली आहे |