|
खालापूर (रायगड) – मोरबे धरणाच्या परिसरात वरील बाजूस इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी या गावात रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली. या दुर्घटनेत ३० ते ४० घरे नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला आणि लहान मुले यांच्यासह पाळीव प्राण्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून काही जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणच्या रुग्णालयांत उपचार चालू आहेत. सध्या १०३ जणांना वाचवण्यात आले असून ७० ते ८० जण अद्यापही बेपत्ता आहेत.
Irshalwadi Landslide : “ढिगाऱ्याखालून १०३ जणांना बाहेर काढलं, १२ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती https://t.co/UXgsBKc6DZ
— Pune News 24 – Maharashtra (@PuneNews_24) July 20, 2023
मध्यरात्रीपासूनच बचावकार्य चालू आहे. गावातील काही लोक रात्री १०.३० वाजता मासेमारी करून घरी परतत होते. रात्री ११ वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तितक्यात काही घरे मातीखाली गेली. पोलीस, रुग्णवाहिका प्रशासन, आमदार, मंत्री, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन्.डी.आर्.एफ्.), अग्निशमन दल यांचे पथक घटनास्थळी पोचले. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्ता अत्यंत निसरडा आहे, तसेच मुसळधार पाऊस आणि धुके यांमुळे घटनास्थळापर्यंत पोचणे अत्यंत कठीण आहे.
इरशाळवाडी येथे दुर्घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांकडून ग्रामस्थांना धीर !
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दुर्घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. मुख्यमंत्र्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांसमवेत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हेही उपस्थित होते. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य घोषित करण्यात आले आहे.
वन विभागाने आमची घरे पाडल्यामुळे पायथ्याजवळ घरे बांधावी लागली ! – ग्रामस्थांचा आरोप
इरशाळवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले की, आम्ही गडाच्या पायथ्याच्याही खाली गावाजवळ आमची घरे बांधली होती; पण वन विभागाने ती घरे पाडली. त्यामुळे आम्हाला पुन्हा पायथ्याच्या ठिकाणी घरे बांधावी लागली. तसे झाले नसते, तर आमची घरे वाचली असती. पाऊस पुष्कळ पडत होता; पण असा प्रकार घडू शकतो, अशा दृष्टीने आम्हाला स्थलांतराचे कोणतेही आदेश सरकारकडून मिळाले नव्हते.
या प्रकारावर मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले की, ज्यांनी ही घरे पाडली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हायला हवा.
गावकर्यांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते ! – सरपंच रितू ठोंबरे
इरशाळवाडीच्या सरपंच रितू ठोंबरे म्हणाल्या, ‘‘मुसळधार पाऊस आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव, अशी धोकादायक परिस्थिती लक्षात घेता ग्रामस्थांना येथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते. ‘नवीन जागेसाठीचा प्रस्ताव देऊया’, अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यांना करण्यात आली होती. हा सगळा भाग अतिशय उंचावर आहे आणि मुख्य गावापासूनही लांब आहे. त्यामुळे सर्वांना गावाजवळ वास्तव्यासाठी येण्याची विनंती यापूर्वीच केली होती.’’