१. लहानपणी केलेली साधना आणि सेवा
१ अ. लहानपणी सेवा केल्याने साधनेचे बीज मनात पेरले जाणे : ‘वर्ष १९९६ मध्ये मी माझ्या आई-वडिलांमुळे (सौ. अंजली बाळासाहेब विभूते, वय ६० वर्षे आणि श्री. बाळासाहेब विभूते, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) साधना चालू केली. लहानपणापासून बाबा आम्हाला दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, स्टेन्सिल पेंटिंग (प्रसाराच्या दृष्टीने रस्त्याच्या शेजारी असणारी मोठी झाडे, दगड किंवा भिंती यांवर पत्र्याच्या साच्यावरील ‘सनातन संस्था’, हे नाव चुन्याने रंगवणे), स्क्रिन पेंटिंग (पिवळ्या कापडी फलकांवर ‘सनातन संस्था आणि गुरुकृपायोगचा लोगो’ रंगवणे), नामदिंडी, भजन, भंडारा सेवा, स्वसंरक्षण शिबिरे, प्रथमोपचार, सभा, प्रसार सेवा, सर्व संप्रदाय सभा, ग्रंथप्रदर्शन कक्ष, धर्मसभा, कापडी फलकांवर अक्षरे उमटली नसतील, तर ब्रशने रंगवणे आणि नंतर इस्त्री करून खोक्यात घालून वेगवेगळ्या जिल्ह्यांना पाठवणे, दैनिक छपाई सेवा, कंदिल वितरण सेवा, अशा अनेक सेवा देवाच्या कृपेमुळे मिळाल्या. बाबांनी आमच्याकडून सेवा करवून घेतल्या. तसेच सामूहिक नामजप, भावसत्संग या सर्व माध्यमांतून वडिलांनी आमच्या मनात साधनेचे बीज पेरले.
१ आ. सनातन आश्रम आणि गुरुपौर्णिमा यांच्या सेवेत सहभागी होणे : सुटीच्या कालावधीत मला सनातन आश्रम अन् सेवाकेंद्रे यांमध्ये, उदा. देवरुख, रत्नागिरी, तपोधाम, चिपळूण, देवद (पनवेल), नेसाई, कोल्हापूर, कुडाळ, रामनाथी, मिरज, अशा ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. देवाच्या कृपेने माझे बालपण सनातनमय झाल्याने जीवनातील अनेक कठीण प्रसंगांमध्ये मला साधनेचे संस्कार उपयोगी पडले. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी संस्थेचे कापडी फलक बांधण्यासाठी झाडावर चढल्यावर अंगावर मोठ्या प्रमाणात लाल डोंगळे (कोकणात काळ्या डोंगळ्याप्रमाणे लाल रंगाचे डोंगळे असतात.) चढले; पण मला त्यांतील एकही चावला नाही.
२. आत्मविश्वास वाढून न्यूनगंड दूर होणे
माझ्यात व्यासपिठावर जाण्याचे आणि बोलण्याचे धैर्य नव्हते; परंतु गुरुपौर्णिमेला असणार्या सर्व नाटकांमध्ये माझा सक्रीय सहभाग असायचा. माझ्यासारख्या न्यूनगंड असणार्या जिवाला गुरूंनी फुलासारखे जपले.
३. महाविद्यालयात ‘शिक्षक दिन ५ सप्टेंबर या दिवशी साजरा न करता गुरुपौर्णिमेला साजरा करावा’, या विषयावर भाषण करणे
सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षक दिवस’ म्हणून साजरा करतात. त्यानिमित्त आमच्या महाविद्यालयात भाषण आयोजित केले होते. मी त्यात भाग घेतला; परंतु मी गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विषयी) लेख पाठ करून विषय मांडला. हा विषय इतर सर्व भाषणांपेक्षा वेगळा होता. ‘शिक्षक दिन ५ सप्टेंबर या दिवशी साजरा न करता गुरुपौर्णिमेला साजरा करावा’, असा मी विषय मांडणार असल्याने ‘मला विरोध होईल का ?’, याचा विचार न करता ‘माझ्या गुरुदेवांचे विचार मला सर्वांसमोर मांडण्याची मिळालेली संधी मी सोडणार नाही’, असा विचार करून मी तो विषय मांडला. माझे भाषण सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना भावले; कारण माझ्या गुरुदेवांच्या वाणीतील चैतन्य मला समाजासमोर मांडायला मिळाले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
४. प्रसारातील सेवेमुळे व्यावहारिक जीवन यशस्वीपणे जगता येणे
माझे शिक्षण कला शाखेतील मानसशास्त्र विषयातून झाले; मात्र मी नोकरी बँकेत केली. तसेच ‘समाजात कसे बोलावे ? नेतृत्व कसे करावे ?’, हे सर्व मी प्रसारातील सेवेमुळे शिकलो. मी जे काही व्यवहारी जीवन जगलो, त्यातही गुरुदेवांच्या कृपेमुळे सुट्टीमध्ये आम्ही रत्नागिरी सेवाकेंद्रात येत होतो. तेव्हा २०० दैनिक ‘सनातन प्रभात’ घेऊन रत्नागिरीमध्ये घरोघरी जाऊन वितरण करायचो. तेव्हा ते सर्व वितरण करूनच परत येत होतो. तेव्हा माझ्या मनात ‘माझ्या गुरुदेवांचे कार्य मला समाजात घरोघरी पोचवायचे आहे’, असा विचार असायचा. मनात ‘मी वितरण करतो’, असा अहंकार निर्माण झाला की, माझे वितरण अल्प होत असे आणि ‘गुरुदेवांमुळे वितरण होते’, असे वाटले की, सर्व वितरण होत असे.
५. ग्रंथप्रदर्शन कक्षावर उभे असतांना प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण येणे आणि प.पू. भक्तराज महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा तेथे त्याच वेळी येणे
गणपतिपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथील मंदिरात ‘ग्रंथप्रदर्शन कक्ष’ लावला होता. मी प.पू. भक्तराज महाराजांंच्या भजनांचा ग्रंथ पहात होतो. तेव्हा मला महाराजांची आठवण फार येत होती आणि त्या ठिकाणी पू. नंदूदादा (प.पू. भक्तराज महाराजांचे ज्येष्ठ पुत्र) मंदिरात आले. ते कक्षावर आल्यावर माझी भावजागृती झाली. त्यांच्यामध्ये मला प.पू. भक्तराज महाराजांचे दर्शन झाले. ते स्मितहास्य करून माझ्या पाठीवर हात फिरवून देवदर्शनासाठी गेले. त्या वेळी ‘देव किती भरभरून आनंद देतो’, याची मला प्रचीती आली.
६. पूर्णवेळ साधना करण्यासाठी सासू आणि सासरे यांनी साहाय्य करणे
माझ्या साधना प्रवासात माझ्या आई-वडिलांप्रमाणे माझे सासू-सासरे (सौ. विशाखा विश्वनाथ पवार (वय ५४ वर्षे) आणि श्री. विश्वनाथ पवार (वय ६४ वर्षे)) यांचीही मला मोलाची साथ आहे; कारण ‘मी सनातनचा साधक आहे’, या एका आधारावर त्यांनी त्यांची मुलगी मला दिली. ‘गुरुमाऊलींच्या आश्रमातील साधकच माझ्या मुलीचा सांभाळ व्यवस्थित करील आणि तिची साधनाही होईल’, असा त्यांचा भाव होता. त्यांनी मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी सहकार्य केले.
७. चांगल्या वेतनाची नोकरी आणि पदोन्नती होत असतांनाही शाश्वत आनंद मिळण्यासाठी पूर्णवेळ साधना चालू करणे
मला नोकरीमध्ये पदोन्नती मिळत होती. तेव्हा ‘मी चांगल्या वेतनाची नोकरी करू कि पूर्णवेळ साधना करू ?’, अशी माझ्या मनाची द्विधा अवस्था होती. आरंभी ‘नोकरी करून पैसे कमावणे’, हाच विचार माझ्या मनात होता. त्यानंतर मी ‘क्षणिक सुखासाठी धावपळ करण्यापेक्षा जे शाश्वत देते, तेच करायचे. मी अनेक जन्म वाया घालवले. आता हा जन्म मी भगवंताची सेवा करण्यासाठी देणार’, असे ठरवले. त्यानुसार आम्ही संबंधित साधकांना विचारून घेतले आणि मी पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केला. ४.४.२०२१ या दिवशी आम्ही दोघेही (श्री. अभिजित विभूते आणि त्यांची पत्नी सौ. जान्हवी विभूते) पूर्णवेळ झालो.
८. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व अन् त्यासाठी केलेले प्रयत्न
मी पूर्णवेळ साधना चालू केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया माझ्या पत्नीसह चालू केली. तेथे व्यष्टी साधनेच्या आढाव्यात माझ्या मनाचे शुद्धीकरण होऊन मला अनुभूती येत होत्या. ‘चित्तावर झालेले जन्मोजन्मीचे संस्कार जे आपला कायम घात करतात, ते आपण का सोडत नाही ?’, याची मला जाणीव झाल्यावर खंत वाटायची. नुसतीच खंत साधनेत उपयोगी नसते, तर कृती महत्त्वाची असते; म्हणून जे लहान-सहान प्रयत्न करत होतो, त्यामधून मला आनंद मिळायचा. आपले स्वभावदोष आणि अहंकार म्हणजे चित्तावरील रोग असतात. ते आढाव्यात मनमोकळेपणाने सांगितले नाहीत, तर आपल्या साधनेची हानी होते. आढाव्यात सांगितलेले प्रयत्न लगेच आणि सातत्याने केले, तरच त्यांचा लाभ होतो. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःच्या साधनेचा आढावा देतांना ‘मी कुठे अल्प पडतो ?’, असा आढावा दिल्यावर साहाय्य मिळते. आढावासेवक आमचा केवळ आढावा घेत नाहीत, तर प्रयत्न कृतीत उतरेपर्यंत पाठपुरावा घेत असल्यामुळे माझ्यासारख्या ‘ढ’ विद्यार्थ्याला सुप्रियाताईने (सौ. सुप्रिया माथूर यांनी, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) पुष्कळ तळमळीने प्रयत्न केले. आम्हाला सुप्रियाताईसारखी आध्यात्मिक शिक्षिका घडवत असल्याबद्दल कृतज्ञ आहे.
९. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधनेत साहाय्य करणे
गुरुदेव, या साधनाप्रवासात माझ्या मनात ‘काही प्रसंगांमुळे आश्रम सोडून जावे’, असे विचार आले. तेव्हा मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेतले. त्यांच्या माध्यमातून मला सकारात्मक ऊर्जा मिळून माझे सर्व नकारात्मक विचार नष्ट झाले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही माझ्या आध्यात्मिक आई आहात.’’ तसेच मी प.पू. दास महाराजांच्या सेवेत असल्याने त्यांच्या खोलीतील चैतन्य आणि त्यांच्या सेवेमधून मिळणारे चैतन्य यांचा माझ्या मनावर सकारात्मक परिणाम होऊन मला नकारात्मक विचारांवर संतांच्या साहाय्याने विजय मिळवता आला.’
– श्री. अभिजित विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |