रत्नागिरी – राज्याचे उमेद अभियानाचे महिला बचत गटांचा आवाज ३ चतुर्थांश जग व्यापणार्या जी- २० परिषदेपर्यंत पोचला. स्वत:च्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी डब्ल्यू-२० या परिषदेच्या वतीने जगाच्या व्यासपिठावर पोचवल्या. तळागाळातल्या महिलांचे नेतृत्व हा डब्ल्यू-२० परिषदेचा प्रमुख हेतू होता. या निमित्ताने महिला व्यक्त झाल्या. दिवसभर चाललेली ही परिषद यशस्वी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
एस्.एन्.डी.टी. विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमनची जी- २० परिषदेचा एक भाग असलेल्या डब्ल्यू – २० परिषदेचे आयोजन करण्यासाठी विद्यापिठाने निवड केली होती. या एक दिवसाच्या परिषदेचे उद्घाटन एस्.एन्.डी.टी. विद्यापिठाचे असिस्टंट डीन ऑफ स्टुडंट आणि एन्.एस्.एस्. समन्वयक नितीन प्रभुतेंडुलकर यांनी केले. तळागाळातल्या महिलांचे नेतृत्व हा या परिषदेचा मुख्य विषय होता. या परिषदेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील निवडक १० प्रयोगशील महिला बचत गटांच्या क्लस्टर्सच्या समन्वयिका सहभागी झाल्या. त्यांनी गटांना येणार्या व्यावसायिक अडचणींबद्दल मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील विविध प्रभाग संघांच्या सौ. दीक्षा दिनेश निवळकर (जीवनज्योती, वाटद), सौ. स्वरा वैभव देसाई (एकता, कोतवडे), सौ. नेहा विनोद केळकर (धनज्योती, नाचणे), सौ. पूनम विजय करंजवकर (क्रांती, शिरगाव), सौ. पूजा पांचाळ, सौ. राजश्री पानवलकर (हिरकणी, करबुडे), सौ. समीक्षा सचिन वालम (रत्नकन्या, हरचिरी), सौ. प्राची अभय सावंत (कोकणरत्न, मिरजोळे), सौ. किमया कृष्णा सुर्वे (उद्योगरत्न, गोळप), सौ. विद्या विलास बोंबले, सौ. सुमंगला सुभाष पालकर (उन्नती, हातखंबा) यांचा त्यात समावेश होता.
महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले. कोकणातील दुर्लक्षित राहिलेल्या फणसावर प्रक्रिया, भरड धान्य वर्षात महत्त्व मिळत असलेल्या नाचणीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ, भाजीपाला, नर्सरी, मसाले तयार करणार्या महिलांनी त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. त्याचसमवेत प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, मोठ्या मॉलमध्ये वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था, प्रशिक्षणासाठी ठेवलेली वयाची गैरसोयीची अट, कुटुंब सांभाळून प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्यात येत असलेल्या अडचणी अशी अनेक सूत्रे या महिलांनी मांडले. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ बचत गटापर्यंत पोचत असल्याचेही या महिलांनी सांगितले. त्यानंतर संस्था सदस्य अधिवक्त्या संध्या सुखटणकर यांनी महिलांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. सर्व महिलांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. सौ. ज्योती मुळ्ये यांनी या परिषदेचे सूत्रसंचालन केले.
या वेळी उमेदचे नीलेश धमाले, शिरगाव सरपंच फरिदा काझी, शिरगाव प्रकल्प सदस्य शिल्पा पानवलकर, प्रकाश सोहोनी, प्रसन्न दामले, समन्वयक स्वप्नील सावंत, कॉलेजच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेदचे बहुमूल्य सहकार्य लाभले.