‘सोव्हेरिन गोल्ड बाँड’ची चौथ्या टप्प्यातील योजना (sovereign gold bond scheme 2021-23) नुकतीच बंद झाली; पण सर्वसामान्यांना सोन्यातील गुंतवणुकीच्या या पर्यायाविषयी आजही तितकीशी माहिती नाही. या योजनेची पुढची आवृत्ती येईल, तेव्हा ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल.
एक काळ होता, जेव्हा सोन्याचा गुंतवणुकीसाठी विचार करायचा झाला, तरी त्यासाठीचे पर्याय ‘फिजिकल गोल्ड’, म्हणजेच दागिने किंवा फार फार तर २४ कॅरेट शुद्धतेत उपलब्ध असलेले सोन्याचे नाणे किंवा ‘गोल्ड बार’ येथपर्यंतच मर्यादित होते. आता मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात् ‘सोव्हेरिन गोल्ड बाँड’ हा यामधील सर्वांत लोकप्रिय असा पर्याय आहे. सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणार्या गुंतवणूकदारांत सर्वाधिक पसंती असणार्या या पर्यायामध्ये नक्की असे काय असते ? ते आपण जाणून घेऊया.
‘सोव्हेरिन गोल्ड बाँड’चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गुंतवणुकीस थेट सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांची मिळणारी हमी ! यासमवेत सोन्याच्या किमतीत होऊ शकणार्या वाढीमुळे मिळणार्या परताव्या व्यतिरिक्त मिळणारे व्याज. ‘सोव्हेरिन गोल्ड बाँड’ (एस्.जी.बी.) हा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा एक पर्याय. याचा प्रारंभ सर्वप्रथम वर्ष २०१५ मध्ये झाला. तसे डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचे ‘गोल्ड ई.टी.एफ्.’, ‘गोल्ड म्युच्युअल फंड’, बँक किंवा विविध वित्तसंस्था यांच्याकडून खरेदी केले जाऊ शकणारे ‘डिजिटल गोल्ड’चे पर्याय आहेतच. मग ‘एस्.जी.बी.’मध्ये वेगळे असे काय आहे ? हे पाहूया आणि या योजेनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
१. सार्वभौम सुवर्ण रोख्यामध्ये गुंतवणूक केल्यास मिळू शकणारे लाभ
अ. सार्वभौम सुवर्ण रोखे, या योजनेतील परिपक्वता कालावधी (मॅच्युरिटी) ८ वर्षे आहे आणि या कालावधीनंतर मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो.
आ. या रोख्यांचा सर्वांत मोठा लाभ, म्हणजे सोन्यावरील वाढीव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी २.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळते. ज्यामुळे सोन्याच्या चढ-उताराच्या वेळी ते गुंतवणूकदारांना संरक्षण देते.
इ. परिपक्वता कालावधीवर (मॅच्युरिटीवर) त्याची पूर्तता केल्यावर त्या वेळच्या ९९९ (९९ कॅरेट) शुद्धतेच्या आधारावर सोन्याच्या दराने परतावा मिळतो.
ई. या रोख्यांचा परिपक्वता कालावधी ८ वर्षांचा असला, तरी ५ वर्षांनंतर गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडू शकतो.
उ. या रोख्यांचा वापर कर्ज घेण्यासाठी तारण म्हणूनही होऊ शकतो.
ऊ. गुंतवणूकदारांना या रोख्यांवर ‘इश्यू किंमती’च्या (प्रारंभीच्या विक्री किंमतीच्या) आधारावर प्रतिवर्ष २.५ टक्के व्याज अर्धवार्षिक पद्धतीने दिले जाते.
ए. ‘एस्.जी.बी.’ हे वस्तू सेवा कराच्या (‘जी.एस्.टी.’च्या) अंतर्गत येत नाही, तर भौतिक, म्हणजेच ‘फिजिकल’ सोन्यावर मात्र ३ टक्के वस्तू सेवा कर लागू होतो.
ऐ. सुवर्ण रोख्यामध्ये (‘गोल्ड बाँड’मध्ये) हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध असतो.
ओ. ‘गोल्ड बाँड’वर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
औ. शुद्धतेच्या संदर्भात समस्या नाही.
क. मुदतपूर्तीनंतर मिळणार्या परताव्यावर कर नाही.
ख. सोने घरी बाळगण्याच्या संदर्भातील सुरक्षिततेची चिंता नाही.
२. सुवर्ण रोख्यांवर कर (टॅक्स) ?
परिपक्वता कालावधी, म्हणजेच मॅच्युरिटीनंतर मिळणारा परतावा करमुक्त असला, तरी प्रत्येक ६ मासांनी मिळणारे व्याज मात्र करपात्र आहे. व्याज सहामाही आधारावर गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते. हे व्याज ‘आयकर कायदा, १९६१’ अंतर्गत करपात्र आहे. एका आर्थिक वर्षात ‘गोल्ड बाँड्स’मधून मिळालेले व्याज करदात्याच्या ‘इतर स्रोतांकडून मिळणार्या उत्पन्नात’ गणले जाते. करदाता आयकराच्या कोणत्या टप्प्यामध्ये (‘स्लॅब’मध्ये) येतो, या आधारावर हा कर आकारला जातो. तथापि आधी सांगितल्याप्रमाणे मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा मात्र करमुक्त असतो. मुदतपूर्व पैसे काढण्यावर ‘कॅपिटल गेन टॅक्स’ (भांडवल लाभाचा कर) भरावा लागतो, तर ‘बाँड’ हस्तांतरणावर दीर्घकालीन भांडवली लाभावर ‘इंडेक्सेशन’ (दीर्घकालीन मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेला परतावा) लाभ मिळतो.
३. रोख्यांची किंमत कशी ठरते ?
‘सोव्हेरिन गोल्ड बाँड्स’ची किंमत ‘सबस्क्रिप्शन’ (सदस्यता) कालावधीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या ३ कामकाजाच्या दिवसांमध्ये ९९९ शुद्धतेच्या (९९ कॅरेटच्या) सोन्याच्या सरासरी किमतीच्या आधारावर निर्धारित केली जाते. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (आयबीजेए) ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या किमती प्रकाशित करते. या दृष्टीकोनातून रोख्यांची किंमत निश्चित केली जाऊ शकते, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळते.
४. सार्वभौम सुवर्ण रोख्यामध्ये किती गुंतवणूक करता येते ?
सार्वभौम सुवर्ण रोख्यामध्ये किमान १ ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. व्यक्तींना अधिकाधिक ४ किलोपर्यंतच्या सुवर्ण रोख्यांमध्ये आणि ट्रस्टसारख्या संस्थांना एका आर्थिक वर्षामध्ये २० किलोपर्यंतची गुंतवणूक करण्याची अनुमती आहे. भारतातील कोणताही वैयक्तिक रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापिठे आणि धर्मादाय संस्था हे सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.
५. सुवर्ण रोखे खरेदी कुठे आणि कशी करावी ?
प्रत्येक नव्या ‘एस्.जी.बी.’ योजनेसाठी बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता), ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (SHCIL), नियुक्त टपाल कार्यालय येथे ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ पद्धतीने सुवर्ण रोखे खरेदी केले जाऊ शकतात. तसेच पुढे दुय्यम बाजार (सेकंडरी मार्केट) म्हणजे ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ (बी.एस्.ई.) आणि ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ (एन्.एस्.ई.) यांसारख्या समभाग विक्रीच्या बाजारात (स्टॉक एक्सचेंजमध्ये) सूचीबद्ध झाल्यावर हेच सुवर्ण रोखे तत्कालीन मूल्यानुसार आपल्या ‘ट्रेडिंग खात्या’वरून (समभाग विक्रीच्या बाजारात खरेदी-विक्री करण्यास अनुमती देणारे व्यापारी खाते) खरेदी केले जाऊ शकतात.’
– श्री. अभिषेक मुरकटे, वरळी, मुंबई. (२०.५.२०२३)