अंतराळशास्‍त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्‍या पत्नी, ज्‍येष्‍ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्‍यात निधन !

डॉ. मंगला नारळीकर

पुणे –  ज्‍येष्‍ठ गणितज्ञ, शास्‍त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९ वर्षे) यांचे येथील रहात्‍या घरी निधन झाले. अंतराळशास्‍त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्‍या त्‍या पत्नी होत्‍या. गेले काही मास डॉ. मंगला यांना कर्करोगाचा त्रास पुन्‍हा चालू झाला होता. जयंत नारळीकर यांना त्‍यांच्‍या कारकीर्दीत पत्नी आणि सहकारी म्‍हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली होती. त्‍यांना तत्‍कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले होते.

त्‍यांनी प्रगत गणितावर काम केले आहे. लहान मुलांना सोप्‍या भाषेत गणित समजावून सांगण्‍यात त्‍यांचा हातखंडा होता. डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्‍तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्‍यांसाठीचे गणिताच्‍या सोप्‍या वाटा, ‘नभात हसरे तारे’, ‘पाहिलेले देश’, ‘भेटलेली माणसं’ हे प्रवासवर्णन यांसारखी त्‍यांची पुस्‍तके विशेष गाजली. वर्ष १९६७ ते १९६९ मध्‍ये केंब्रिज विद्यापिठात पदवीपूर्व अभ्‍यासक्रमाच्‍या शाळेत त्‍यांनी गणिताचे अध्‍यापन केले.