अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधकांचा सभात्याग !

  • विधीमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३

  • उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यासह ३ आमदारांच्या विरोधात अपात्र ठरवण्याचे पत्र सादर !

डॉ. नीलम गोर्‍हेसह आमदार मनीषा कायंदे

मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला. काही दिवसांपूर्वी डॉ. गोर्‍हे यांनी शिवसेनेच (शिंदे गटात) प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्ट करण्यात आल्याचे सूत्र विरोधकांनी उपस्थित केले; मात्र ‘त्यावर नंतर बोलण्यास दिले जाईल’, असे म्हणत डॉ. नीलम गोर्‍हे यांनी चर्चेची अनुमती नाकारली. ‘अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही’, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

या वेळी विरोधकांना अविश्वास प्रस्तावावर भूमिका मांडू न दिल्याच्या कारणावरून विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर शोकप्रस्ताव मांडून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाचे कामकाज चालू होताच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यासह २ आमदारांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. कामकाजाच्या आधी या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यासह विधान परिषदेच्या ३ सदस्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी केली. त्या संदर्भातील पत्र आम्ही सभापतींकडे सादर केले, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून डॉ. नीलम गोर्‍हेसह आमदार मनीषा कायंदे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी पत्रातून केली आहे. विरोधक गोंधळ घालत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. नीलम गोर्‍हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल, तर त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल; मात्र त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नाही. या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन मंत्र्यांचा परिचय करून दिला.