आज दीप अमावास्या आहे. त्या निमित्ताने…
‘दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक ‘गटारी अमावास्या’ असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत. आषाढ अमावास्येच्या दुसर्या दिवसापासून ‘श्रावण’ हा पवित्र मास (यंदाच्या वर्षी अधिक मास चालू होत आहे) चालू होत असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहार वर्ज्य करतात. अनेक जण ‘गटारी अमावास्या’ असे संबोधून कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करतात.
वास्तविक आषाढ मासातील अमावास्येला मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जातो; कारण –
अ. या पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
आ. हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. या काळात प्राण्यांची हत्या केली, तर निसर्गचक्रावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कोळीबांधव मासेमारी करत नाहीत.
इ. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
हिंदु संस्कृती जपणे आवश्यक !
या सणाला घरातील सर्व दिवे धुऊन त्यांची पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ! त्यामुळे या सणाला ‘दीप अमावास्या’च म्हणावे. घरात मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य दाखवावा. दीप अमावास्येच्या माध्यमातून आपण हिंदु संस्कृती जपूया.
(साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ)