मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेच्‍या संदर्भात समिती स्‍थापन !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – अमरावती जिल्‍ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्‍तावित मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेसंदर्भात साहित्‍य संस्‍कृती मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ६ सदस्‍यांची समिती स्‍थापन केली आहे. उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय घोषित केला आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, यासाठी विविध संघटनांनी मागणी केली होती त्‍या पार्श्‍वभूमीवर उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेची घोषणा केली आहे. इतर राज्‍यातील भाषांसाठी स्‍थापन केलेल्‍या विद्यापिठांच्‍या कामगिरीचा अभ्‍यास करून मराठी भाषा विद्यापिठासाठी आवश्‍यक गोष्‍टी आणि येणार्‍या अडचणींवर उपाययोजना, तसेच विद्यापिठात शिकवले जाणारे अभ्‍यासक्रम हे राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांशी सुसंगत करणे या संदर्भात तज्ञ व्‍यक्‍ती अन् संस्‍था यांच्‍याशी चर्चा करून अहवाल सादर करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.