पुणे जिल्‍ह्यातील १६ अनधिकृत शाळा बंद करण्‍याची नोटीस !

पुणे – जिल्‍ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी ४ शाळांच्‍या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्‍ट केली असून शाळा बंद करण्‍याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्‍यांना ‘शाळा बंद’ करण्‍याचे पत्र पाठवले आहे. शासन मान्‍यता आहे; परंतु वेगळ्‍या जागेवर शाळा स्‍थलांतरित केली आहे, अशा शाळांवरही कारवाई करण्‍यात आली आहे. यामध्‍ये भूगाव येथील ६ शाळांचा समावेश असून मुळशी तालुक्‍यामध्‍ये अनधिकृत शाळांचे प्रमाण अधिक असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

शिक्षण विभागाने प्रमाणपत्रांची पडताळणी मोहीम चालू केल्‍यानंतर पडताळणीच्‍या वेळी वरील प्रकार निदर्शनास आला. जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने चालू केलेल्‍या २१७ शाळा असून त्‍यातील २०५ शाळांनाच मान्‍यता मिळाली आहे. १२ शाळा अनधिकृतपणे चालू आहेत. संलग्‍नता अद्ययावत् नसलेल्‍या ४२ शाळा आहेत, तर ४ शाळांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्‍याचेही समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुणे येथे अनधिकृत शाळा चालू असणे, हे संतापजनक आणि लज्‍जास्‍पद !