सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील प्रकार
सातारा – ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांसाठी केवळ १० रुपयांमध्ये शिवभोजन थाळी चालू करण्यात आली होती; मात्र आता या योजनेला घरघर लागली आहे. सातारा जिल्हा पुरवठा विभागाने सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये थकवले आहेत. या अनुदानासाठी उपाहारगृह व्यवस्थापकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे; मात्र १२ जुलैपासून त्यांना शिवभोजन थाळी बंद करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
२४ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील ३५ केंद्रांच्या माध्यमातून ३ सहस्र ५०० लोक शिवभोजन थाळीचा लाभ घेऊ लागले. सातारा शहरात एस्.टी. उपाहारगृह, जिल्हा रुग्णालय, जीवनज्योत रुग्णालय जवळ बेंद्रे उपाहारगृह आणि जिल्हा परिषद उपाहारगृह यांठिकाणी शिवभोजन थाळी चालू करण्यात आली. यांपैकी एस्.टी. उपाहारगृह आणि जिल्हा रुग्णालयातील शिवभोजन थाळी बंद करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील शिवभोजन केंद्र चांगले चालू असतांना गत वर्षभराचे अनुदान थकवण्यात आले. जिल्हा परिषद शिवभोजन केंद्रसाठी १२५ थाळींना अनुमती देण्यात आली होती. प्रतिदिन १०० हून अधिक गरजू या थाळीचा लाभ घेत होते; मात्र आता उपाहारगृहाबाहेर ‘थाळी बंद’चा फलक पाहून गरजू लोक माघारी फिरत आहेत.