कॅनडाने तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे ! – भारत

एस. जयशंकर

जकार्ता (इंडोनेशिया) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्‍यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्‍चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले. तसेच हिंसात्मक कारवाया करण्यासाठी चिथाववणार्‍या शक्तींशी सामना करण्याच्या सूत्रालाही अधोरेखित केले. जयशंकर यांनी या भेटीविषयी ट्वीट करून माहिती दिली. गेल्या काही कालावधीपासून कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांकडून भारतविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जयशंकर यांनी वरील विधान केले.

जकार्ता येथील दौर्‍यात जयशंकर यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय विदेश आयोग कार्यालयाचे निर्देशक वांग यी यांचीही भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी प्रलंबित सूत्रांवर चर्चा केली.