चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !

१. प्रत्येक तिबेटी कुटुंबातील किमान एक सदस्य सैन्यात भरती करण्याचे चीनचे धोरण

‘तिबेटी सैनिक आता चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पी.एल्.ए.)च्या वतीने चीन समवेतच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेश सीमांवर (वास्तविक नियंत्रण रेषेवर) उभे राहिलेले दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार उच्च सीमेवर भारतीय सैनिकांशी लढतांना चिनी सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्ष २०२० मध्ये भारताशी झालेल्या संघर्षात त्यांनी भारतीय सैनिकांची आक्रमकता आणि पर्वतांमध्ये लढण्याची क्षमता पाहिली होती. या कारणास्तव चीनने त्यांच्या अधीन असलेल्या तिबेटमधील नागरिकांना सैनिक म्हणून भरती करण्यास प्रारंभ केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरावर सैनिकांच्या दीर्घकालीन तैनातीसाठी त्यांनी प्रत्येक तिबेटी कुटुंबातील किमान १ सदस्य चिनी सैन्यात भरती करण्याचे धोरण आखले आहे.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

भारतीय सैन्याच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’चे (विकास बटालियनचे) सैनिक चिनी सैनिकांहून कितीतरी पटीने सरस असल्याचे चीनने पाहिले आहे. विशेषत: कैलास पर्वतरांगेतील उंच शिखरे काबीज (पादाक्रांत) करतांना भारतीय तिबेटी सैन्याने त्यांच्या सैन्याहून चांगली कामगिरी केली आहे. हे लक्षात घेऊन तिबेटी सैनिकांची भरती करण्यासाठी चीनने त्यांच्या या वरिष्ठ सैनिकी अधिकार्‍यांना कामाला लावले. एका आघाडीच्या मासिकात देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनने तिबेटमध्ये रहाणार्‍या सर्व कुटुंबांना एक आदेश दिला आहे. या आदेशानुसार प्रत्येक घरातील एका व्यक्तीला त्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये भरती होण्यास सांगण्यात आले आहे. असे करून ते तिबेटी कुटुंबांना चीनशी एकनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करू शकतील, असे चीनला वाटते.

२. तिबेटींना भारताविरुद्ध शस्त्राप्रमाणे वापरण्याचे चीनचे डावपेच

तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्‍या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती. या मोहिमेत तिबेटी युवकांनी बनलेल्या या ‘सिक्रेट फोर्स’ने (गुप्तदलाने) एका रात्री धडाडी दाखवत पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍याजवळील सर्व उंच शिखरांवर स्वामित्व मिळवले होते. भारताकडून झालेल्या या जबरदस्त मोहिमेमुळे चिनी थक्क झाले होते. त्यानंतर या उंच शिखरांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला; मात्र तिबेटी सैनिकांच्या शौर्यामुळे चिनी सैनिक पुढे सरकण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत.

आता मात्र डावपेचांमध्ये परिवर्तन करत चिनी सैन्याने तिबेटी जनतेला पुढे करण्याचे ठरवले आहे. भारताविरुद्ध तिबेटींना शस्त्राप्रमाणे वापरण्याचा चीनचा डाव आहे. यासाठी चीन तिबेटमधील तरुणांची त्याच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. या तिबेटी तरुणांना सैनिकी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश येतील भारत-चीन सीमेवर तैनात केले जाणार आहे.

३. चीनकडून तिबेटी नागरिकांच्या प्रामाणिकपणाची अनेक पातळ्यांवर चाचणी

समोर आलेल्या माहितीनुसार चिनी सैन्यात भरती करण्यापूर्वी तिबेटी नागरिकांना अनेक पातळ्यांवरील चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या चाचण्या तिबेटींचा चीनविषयीचा प्रामाणिकपणा तपासून घेण्यासाठी करण्यात येणार आहेत. या चाचण्यांतर्गत तिबेटींना चीनची ‘मंडारिन’ भाषा शिकावी लागेल. तिबेट हा चीनचाच एक अविभाज्य अंग आहे, हे तिबेटींना मान्य करावे लागेल. याखेरीज ‘चिनी कम्युनिस्ट पार्टी’ला त्यांच्या धोरणांमध्ये सर्वोच्च स्थान द्यावे लागणार आहे. चीनने यावर्षी फेब्रुवारी मासापासून तिबेटींना चिनी सैन्यात भरती करणे चालू केले होते. भारतीय सैन्याला तोंड देणे, तिबेटवरील पकड घट्ट करणे आणि दलाई लामांच्या तिबेटवरील प्रभावाला न्यून करणे, हा चीनचा डाव आहे. आतापर्यंत अनुमाने ३-४ सहस्र तिबेटी सैनिक चिनी सैन्यात भरती झाले असावेत. त्यांना भरती करतांना हे युवक चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यांचा दलाई लामांशी कुठलाही संबंध नाही, हे पहिले जाते.

४. चीनने तिबेटी तरुणांना सैन्यामध्ये भरती करण्यामागील कारणे  

चीनने तिबेटींचा त्याच्या सैन्यात समावेश करण्याचा निर्णय अनेक कारणांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. यामध्ये सर्वांत पहिले कारण हिमालयातील अतिशय थंड आणि प्रतिकूल हवामान हे आहे. चिनी सैनिकांना हे हवामान आणि परिस्थिती यांना तोंड देणे अवघड जात आहे. त्याउलट तिबेटी या परिसरातील निवासी असल्यामुळे या हवामानातच ते वाढलेले असतात. त्यामुळे त्यांना हिमालयात वावरण्यासाठी वेगळ्या सिद्धतेची आवश्यकता नसते. दुसरे महत्त्वाचे कारण, म्हणजे चीनवर सध्या वाढत असलेला आंतरराष्ट्रीय दबाव अल्प करणे हे आहे. तिबेटींचा समावेश चिनी सैन्यात करून भारताविरोधात एक खास अभियान चालवण्याची चीनची योजना आहे. या योजनेत तिबेटी सैनिक मारले गेले, तर चीन सहजपणे जगाला सांगू शकेल, ‘आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तिबेटी हुतात्मा झाले आहेत.’

५. तिबेटींना चिनी सैन्यात घेतल्याचा भारतावर विशेष परिणाम नाही !

भारताशी पारंपरिक युद्ध करण्याची चीनची इच्छा नाही. त्यामुळे तिबेटींना चिनी सैन्यात घेतल्याने भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे भारताने चीनकडून भारतावर लादल्या गेलेल्या ‘मल्टी डोमेन वॉर’च्या (अनेक क्षेत्रातील युद्धाच्या) विरोधात लढण्याची सिद्धता करणे आवश्यक आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.