‘२०.१.२०२२ या दिवशी गुरुकृपेने माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला काहीच बोलता येत नव्हते. मला पुष्कळ गोष्टी सांगायच्या होत्या; पण मला काहीच सांगता येईना. त्या दिवशी मला जाणवलेली सूत्रे मी गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.
१. साधनेत येण्यापूर्वी
साधनेत येण्यापूर्वी मी रामाचा नामजप करत होते. मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रथम भेटले. तेव्हा माझा आपोआप ‘श्री गुरुदेव दत्त !’ हा नामजप चालू झाला. त्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार, म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधना करू लागले.
२. टंकलेखनाची सेवा करणे
आम्ही पूर्वी सांगलीत रहात असतांना पू. आई (पू. (सौ.) शैलजा परांजपे) घरी संगणकावर टंकलेखनाची सेवा करत असत. तेव्हा मीही दुपारच्या वेळेत टंकलेखनाची सेवा करत असे.
३. पू. आई (पू. (सौ.) शैलजा परांजपे), श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !
३ अ. पू. आईंनी प्रार्थना करण्यास शिकवणे : पू. आई मला नेहमी वेगवेगळ्या प्रार्थना सांगत असत. तसेच त्या मला गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासही सांगत असत. अंघोळीच्या वेळी बालदीत पाणी काढल्यावर पू. आई मला पुढील प्रार्थना करण्यास सांगायच्या, ‘हे गंगामाते, मला या पाण्यातून तुझ्यामधील चैतन्य, ऊर्जा आणि शक्ती मिळू दे. माझे मन तुझ्यासारखे स्वच्छ आणि निर्मळ होऊ दे. या पाण्यातून माझ्या शरिरावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊ देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’’ तसेच अंघोळ झाल्यानंतर मला कृतज्ञता व्यक्त करायला सांगायच्या, ‘‘हे गंगामाते, तुझ्या कृपेमुळेच मला हे चैतन्यमय पाणी अंगावर घ्यावयास मिळाले, त्याबद्दल तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’’
३ आ. पू. आई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘राग येणे’ या स्वभावदोषावर स्वयंसूचना घेण्यास सांगणे : साधनेत येण्यापूर्वी माझा राग अनावर व्हायचा आणि तो पुष्कळ वेळ टिकून असायचा. साधनेत आल्यानंतर मला ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे राग अनावर होतो’, हे लक्षात आले. यामध्ये मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. आई यांचे मार्गदर्शन मिळाले. त्या दोघी मला ‘माझ्यातील स्वभावदोषांवर स्वयंसूचना कशी घ्यायची ?’, याविषयी सांगत असत.
३ इ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कृतीला भाव जोडण्यास सांगणे : प्रत्येक प्रसंगामध्ये ‘भगवंत कसा बघायचा ? भाव कसा ठेवायला हवा ?’, याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘तू साडी नेसतांना देवीलाच साडी नेसवत आहेस’, असा भाव ठेव.’’ मी नामजपाला बसल्यावर माझ्या मनात अनेक विचार यायचे आणि नामजपात मन एकाग्र होत नसे. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला सांगायच्या, ‘‘तू ‘गुरूंच्या चरणांवर डोके ठेवले आहेस’, असा भाव ठेवून नामजप कर.’’ तेव्हापासून नामजप करतांना माझे मन एकाग्र होऊ लागले.
३ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मायेतील विचार करण्यापेक्षा भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यास सांगणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आमच्याकडे आल्या होत्या. त्या वेळी मायेतील एका प्रसंगाने माझ्या डोळ्यांत पाणी आले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘भगवंतासाठी डोळ्यांत पाणी येऊ दे.’’ ईश्वराने मला याचा अर्थ सांगितला की, ‘भावजागृती होऊन डोळ्यांत पाणी येऊ दे. मायेतील विचारांमुळे नको.’
– सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ढवळी, फोंडा. (८.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |