कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे उच्‍च शिक्षण घेणारे आणि प्रामाणिक अन् तत्त्वनिष्‍ठ राहून कार्यालयीन कामकाज करतांना शाश्‍वत सुखाचा शोध घेणारे सनातनचे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास 

पू. शिवाजी वटकर

‘बालपणापासून शिक्षण घेतांना, कौटुंबिक जीवन जगतांना, तसेच नोकरी आणि साधना करतांना माझ्‍या जीवनाचा प्रवास कसा झाला ? परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी वेगवेगळ्‍या टप्‍प्‍यांवर माझ्‍याकडून साधना आणि सेवा कशी करून घेतली किंवा त्‍यांनी मला कसे घडवले आणि हळूहळू वरच्‍या आध्‍यात्मिक पातळीला कसे नेले ?’, याचे अनुभूतीकथन, म्‍हणजे माझा साधनाप्रवास आहे’, असे मला वाटते.

वर्ष १९८९ मध्‍ये वयाच्‍या ४३ व्‍या वर्षी मी ईश्‍वराच्‍या कृपेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आलो. ज्‍या दिवशी मला तेे प्रत्‍यक्ष भेटले, तो माझ्‍यासाठी सुवर्णदिन होता. त्‍या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्‍या साधनेचा ‘श्री गणेशा’ झाला. मला साधनेत अडचण आल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगायचे,

‘‘९९ टक्‍के प्रतिकूल प्रारब्‍ध असतांना १ टक्‍का चांगले क्रियमाण वापरून, म्‍हणजे साधना करून त्‍यावर मात करू शकतो.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍याकडून व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करून घेऊन माझ्‍या जीवनाचे सार्थक केले. त्‍यांनी मला संतपदाला पोचवले. वर्ष २०१९ मधील गुरुपौर्णिमेच्‍या शुभदिनी त्‍यांच्‍या कृपेने मला सनातन संस्‍थेचे ‘१०२ वे समष्‍टी संत’ म्‍हणून घोषित केले गेले. 

यातून ‘ईश्‍वरी कृपेने काही जणांना शिकायला मिळो’, एवढीच ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.

भाव आणि सेवावृत्ती यांमुळे अनेक संतांचे मन जिंकणारे अन् निष्‍ठापूर्वक सेवा करणारे पू. शिवाजी वटकर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पू. शिवाजी वटकर यांच्‍या साधनाप्रवासाचा ‘भाग १’ वाचतांना माझे मन इतके भारावून गेले की, ‘कधी एकदा त्‍यांंच्‍या साधनाप्रवासाचे १५ भाग वाचेन’, असे मला झाले आहे.  लहानपणापासून अतिशय चांगले जीवन जगूनही ते सात्त्विक होते. मोठेपणी नोकरीत उच्‍चपदावर असूनही त्‍यांच्‍यात अहंभाव नव्‍हता. ते ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’मध्‍ये ‘उपमहाप्रबंधक’ (‘डेप्‍युटी जनरल मॅनेजर’) या पदावर नोकरीत असतांना सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून एखादा जुना साधक साधना करतो, तशी वाहनचालकाची सेवा करणे, घरोघर जाऊन अध्‍यात्‍मप्रसार करणे, धर्मकार्यासाठी अर्पण गोळा करणे इत्‍यादी सर्व सेवा करू लागले. त्‍यांच्‍या इतक्‍या सेवा मलाही साधनेच्‍या आरंभी करता आल्‍या नाहीत. स्‍वत: उत्‍कृष्ट साधना करून त्‍यांनी सर्व साधकांपुढे आदर्श ठेवला. त्‍यांनी लिहिलेल्‍या त्‍यांच्‍या साधनाप्रवासात कोणती घटना कधी घडली, त्‍याचा मास आणि वर्ष एवढेच नव्‍हे, तर अनेक वेळा दिनांकही त्‍यांनी लिहून ठेवला आहे. हेही त्‍यांच्‍या लिखाणाचे एक वैशिष्‍ट्य आहे.

प.पू. भक्‍तराज महाराज (इंदूर), प.पू. काणे महाराज (नारायणगाव, जिल्‍हा पुणे) आणि प.पू. जोशीबाबा (मुंबई) हे पू. वटकर यांच्‍या घरी जात असत आणि काही वेळा हक्‍काने रहातही असत. ‘पू. वटकर यांचा भाव आणि सेवावृत्ती यांमुळे त्‍यांनी संतांचे मन जिंकले होते’, हे यावरून लक्षात येते. ‘ते सर्व संतांची सर्व सेवा यथायोग्‍य करतील’, असा मलाही त्‍यांच्‍याविषयी विश्‍वास वाटत असे.

वर्ष १९९५ मध्‍ये प.पू. भक्‍तराज महाराज पुष्‍कळ आजारी असतांना मी त्‍यांच्‍याकडे सेवेसाठी इंदूरला ७ – ८ मास (महिने) राहिलो होतो. पुढे वर्ष १९९८ पासून मी गोव्‍याला रहायला आलो. मी मुंबई येथे सेवाकेंद्रात रहात नसतांना पू. वटकर ‘माझा आश्रम’, या भावाने सेवाकेंद्रात जात असत आणि ‘काय हवे, काय नको’ इत्‍यादी आत्‍मीयतेने पहात असत. त्‍यामुळे मुंबई सेवाकेंद्रातील साधकांना त्‍यांचा आधार वाटत असे.

सेवानिवृत्तीनंतर त्‍यांनी सनातनच्‍या उच्‍चपदावरील अनेक सेवा अत्‍यंत साधेपणाने केल्‍या. त्‍यांचे वागणे सर्व साधकांशी अत्‍यंत जवळिकीचे असते. त्‍यांची वैशिष्‍ट्ये व्‍यक्‍त करायला माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत. सनातन संस्‍थेचे कार्य जलदगतीने वाढण्‍यात त्‍यांचा मोठा सहभाग आहे.

त्‍यांनी निष्‍ठापूर्वक केलेल्‍या साधनेमुळे त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगतीही जलदगतीने होऊन ते संत झाले आहेत. ‘अनेक साधकांनीही त्‍यांच्‍या पावलांवर पाऊल टाकून त्‍यांच्‍याप्रमाणे जीवनाचे सार्थक करावे’, हीच माझी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बालपण

१ अ. जन्‍म आणि जन्‍मस्‍थळ : आश्विन शुक्‍ल चतुर्दशी (९.१०.१९४६) या दिवशी माझा जन्‍म उपळे (जि. धाराशिव), महाराष्‍ट्र येथे झाला.

१ आ. कुटुंबातील धार्मिक वातावरण आणि शिवाची उपासना यांमुळे भगवान शिवाविषयी भाव निर्माण होऊन अध्‍यात्‍माची गोडी लागणे : आमच्‍या घरी ‘एकादशीचा उपवास, खंडोबाचा भंडारा आणि जोगवा मागणे’, अशी कर्मकांडे केली जात. घरी प्रतिदिन शिवपिंडीवर अभिषेक केला जाऊन शिवाची उपासना केली जात असे. आमच्‍याकडे आमचे गुरु यायचे आणि ते ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र कानात द्यायचे. या सगळ्‍याचा परिणाम माझ्‍या अंतर्मनावर होऊन माझ्‍या मनात भगवान शिवाविषयी भाव निर्माण झाला होता. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला ‘संत गोरा कुंभार’, ‘संत सावता माळी’ आणि ‘संत चोखामेळा’ यांच्‍यासारखीच अध्‍यात्‍माची गोडी लागली.

१ इ. कुटुंबातील लोकांनी केलेले चांगले संस्‍कार : माझे बालपण श्रीमंतीत गेले, तरी घरच्‍यांनी मला लहानपणापासूनच काटकसर करण्‍याची सवय लावली होती. माझ्‍यावर ‘स्‍वयंशिस्‍त, प्रामाणिकपणा, कष्‍ट करणे आणि निर्व्‍यसनी रहाणे’, असे चांगले संस्‍कार घरच्‍यांनी केले. ‘ईश्‍वराने बालपणापासून माझ्‍यात चिकाटी, शिस्‍त आदी गुण आणि कृतज्ञताभाव अंगी बाणवले’, असे मला वाटते.

१ ई. मला लहानपणापासून संतांची चरित्रे, कादंबर्‍या, ललित वाङ्‍मय इत्‍यादी वाचण्‍याची आवड होती. 

२. शिक्षण – कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे उच्‍च शिक्षण घेता येणे

२ अ. प्राथमिक शिक्षण

२ अ १. कुटुंबीय अशिक्षित असतांना देवाने शिकण्‍याची प्रेरणा देणे : माझे कुटुंबीय अशिक्षित होते. ‘त्‍यांना मी कोणत्‍या वर्गात शिकत आहे ?’, हेही ठाऊक नसायचे. शाळेतील मुख्‍याध्‍यापक आणि इतर शिक्षक घरी येऊन त्‍यांना शाळेतील माझ्‍या प्रगतीविषयी सांगत की, ‘‘शिवाजीसारखा हुशार विद्यार्थी गावात नाही.’’ यातून देव मला अभ्‍यास वाढवण्‍याची प्रेरणा देत असे.

२ अ २. १० वीच्‍या परीक्षेमध्‍ये बोर्डात ७ वा क्रमांक येणे : देवाच्‍या कृपेने माझा १० वीत, म्‍हणजेच मराठवाड्यातील ‘हायर सेकंडरी सर्टिफिकेट’ परीक्षेमध्‍ये बोर्डात ७ वा क्रमांक आला. त्‍यानंतर मी सोलापूर येथील ‘दयानंद महाविद्यालया’मध्‍ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

२ आ. महाविद्यालयीन शिक्षण

२ आ १. महाविद्यालयीन परीक्षेत चांगले गुण मिळणे : महाविद्यालयातील शिक्षण इंग्रजी माध्‍यमातून होते. मी कोणत्‍याही विषयाची शिकवणी लावली नव्‍हती, तरीही ११ वी आणि १२ वीच्‍या परीक्षांमध्‍ये महाविद्यालयात सर्व विषयांत माझा पहिला ते तिसरा क्रमांक यायचा. मला विशेष कोणाचे वैयक्‍तिक मार्गदर्शन नसतांना ‘शिवाजी विद्यापिठा’मध्‍ये माझा १२ वी सायन्‍समध्‍ये तिसरा क्रमांक आला आणि ७६ टक्‍के गुण मिळाले.

२ इ. आभियांत्रिकी पदवी मिळणे : वर्ष १९६६-१९७० ही ४ वर्षे मी पुणे येथे अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) महाविद्यालयाच्‍या वसतीगृहात राहून शिक्षण घेतले. वर्ष १९७० मध्‍ये मी पुणे विद्यापिठातून बी.ई. (मेकॅनिकल) पदवी प्राप्‍त केली. अभियांत्रिकीच्‍या पदवी परीक्षेत मी पुणे विद्यापिठात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झालोे.

२ ई. वर्ष १९७७ मध्‍ये नोकरी करत मी मुंबई विद्यापिठातून ‘डिप्‍लोमा इन् ऑपरेशन्‍स मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतलेे.

अतिशय प्रतिकूल परिस्‍थिती असतांनाही देवाच्‍या कृपेने माझे शिक्षण चांगल्‍या प्रकारे झाले.

३. विविध ठिकाणी केलेली नोकरी 

३ अ. वर्ष १९७०-१९७५ या काळात ‘टेल्‍को’ या आस्‍थापनात नोकरी करणे

३ अ १. आई-वडिलांचा सांभाळ करण्‍यासाठी नोकरीसाठी विदेशात न जाता भारतात रहाणे : वर्ष १९७० मध्‍ये अभियांत्रिकीची पदवी मिळाल्‍यावर माझ्‍या समवेतचे बरेच जण उच्‍च शिक्षण आणि नोकरी यांसाठी विदेशात गेले; मात्र मी ‘नोकरी करून आई-वडिलांचा सांभाळ करायचा’, असे ठरवले. मी ‘टेल्‍को (आताचे टाटा मोटर्स, पुणे)’ येथे २ वर्षांसाठी ‘ग्रॅज्‍युएट ट्रेनी इंजिनीयर’ म्‍हणून नोकरी करू लागलो.

३ अ २. ‘टेल्‍को’मध्‍ये नोकरी करतांना अनेक गुण अंगी बाणले जाणे : ‘टेल्‍को’मधील प्रशिक्षणाची २ वर्षे अत्‍यंत कडक शिस्‍त आणि प्रायोगिक अनुभव अन् शिक्षण घेण्‍याची होती. या प्रायोगिक प्रशिक्षणाचा मला नंतरच्‍या जीवनात पुष्‍कळ उपयोग झाला. या कालावधीत देवाने स्‍वच्‍छता, स्‍वयंशिस्‍त, वेळेचे बंधन पाळणे, व्‍यवस्‍थितपणा, नियमांचे पालन करणे, स्‍वतःकडे न्‍यूनपणा घेणे, काम परिपूर्ण आणि समय मर्यादेत करणे इत्‍यादी साधनेला आवश्‍यक असे गुण माझ्‍या अंगी बाणवले.

२ वर्षांचे प्रशिक्षण संपल्‍यावर मी ‘टेल्‍को’मधील ‘क्‍वालिटी कंट्रोल (उत्‍पादनांचे गुणवत्ता नियंत्रण)’, ‘रिपेअर्स अँड मेन्‍टेनन्‍स’ (देखभाल आणि दुरुस्‍ती) इत्‍यादी विभागांत नोकरी केली.

३ आ. वर्ष १९७५-१९८० ‘माझगाव डॉक लिमिटेड’, मुंबई, येथे केलेली नोकरी

३ आ १. नियोजन करायला शिकता येणे : मुंबईतील ‘माझगाव डॉक लिमिटेड’, येथे जहाज बांधणीचे काम केले जाते. तेथे माझ्‍याकडे जहाज बांधणीच्‍या आरंभापासून ते जहाज विकत घेणार्‍या आस्‍थापनाशी करार करून ते जहाज त्‍यांच्‍या ताब्‍यात देईपर्यंत आणि नंतर ‘गॅरंटी’च्‍या कालावधीपर्यंतच्‍या सर्व कामांच्‍या नियोजनाचे दायित्‍व होते. यातून देवाने मला नियोजनकौशल्‍य शिकवले. त्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला साधना आणि सेवा करतांना साहाय्‍य झाले.

३ आ २. जीपला ट्रकची धडक बसल्‍यावर देवानेच अपघातातून वाचवणे : एकदा मला जहाज बांधणीच्‍या कामासाठी हिमाचल प्रदेश येथे जावे लागले. एके दिवशी तेथील एक अधिकारी आम्‍हाला फिरायला घेऊन गेले असता आमच्‍या जीपला अकस्‍मात् समोरून ट्रकची धडक बसली. तेव्‍हा सुदैवाने आमची जीप मार्गाच्‍या कडेला अडकून राहिल्‍यामुळेे आम्‍ही वाचलो. देवानेच आम्‍हाला या अपघातातून वाचवले.

(क्रमशः)

-(पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/701518.html

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक