अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ‘चॅटजीपीटी’शी स्पर्धा करण्यासाठी स्थापन केले ‘एक्सएआय’ आस्थापन !

पुढील ५ वर्षांत मानवी बुद्धीमत्तेला मागे टाकणार कृत्रिम बुद्धीमत्ता ! – मस्क

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’ या जगप्रसिद्ध आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन् ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी १२ जुलै या दिवशी विश्‍वाचे वास्तविक स्वरूप समजून घेण्याच्या उद्देशाने ‘एक्सएआय’ नावाचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) आस्थापन चालू केल्याची घोषणा केली. त्यांनी ट्विटरवरील ‘स्पेस चॅट’द्वारे याची घोषणा केली. या आस्थापनाकडे गेल्या काही मासांपासून चर्चेत असलेल्या ‘चॅटजीपीटी’चा स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. यासंदर्भात मस्क म्हणाले की, पुढील ५ वर्षांत ‘एआय’ मानवी बुद्धीमत्तेला मागे टाकेल !

१. एक्सएआय आस्थापनामध्ये ‘डीप माईंड’, चॅटजीपीटीचे निर्माता आस्थापन ‘ओपन एआय’, गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला अशा जगप्रसिद्ध आस्थापनांमध्ये काम केलेले अभियंता आहेत. मस्क या संघाचे नेतृत्व करणार आहेत.

२. मस्क हे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासामध्ये सावधगिरी आणि नियमन यांचे समर्थक राहिले आहेत. या तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित प्रगतीमुळे मानवी सभ्यता नष्ट होऊ शकते, याविषयी त्यांनी याआधीही अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे.

३. मस्क म्हणाले की, त्यांचे आस्थापन कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी एक वेगळा दृष्टीकोन अवलंबेल.

४. ‘ओपन एआय’चे चॅटजीपीटी आणि गूगलचे ‘बार्ड’ या प्रणाली अशा आहेत, ज्यांना आपण कोणताही प्रश्‍न विचारला, तरी त्याला ते अचूकतेच्या जवळ नेणारी उत्तरे देतात. इमेल लिहिण्यापासून एखाद्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसरित कसा करायचा ते एखाद्याला त्याच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त कोणती भेटवस्तू द्यावी, येथपर्यंत ती उत्तरे देऊ शकतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहायचा असेल, तर त्यालाही चॅटजीपीटी सहज उत्तर देते.