‘अध्‍यात्‍म कृतीचे शास्‍त्र असून ते जगता आले पाहिजे’, या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या शिकवणीमुळे साधनेत प्रगती करणारे अकोला येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्‍यामसुंदर राजंदेकर !

‘२७.३.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेल्‍या एका चौकटीनुसार ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कुठल्‍या शिकवणीमुळे आध्‍यात्मिक प्रगती झाली ?’ यांविषयीची सूत्रे लिहून द्यायला सांगितली होती. या संदर्भात त्‍यांनीच माझ्‍या लक्षात आणून दिलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. श्याम राजंदेकर

१. सनातनच्‍या सत्‍संगाला गेल्‍यावर कुलदेवीच्‍या नामजपाचे महत्त्व कळणे, तसेच ‘अध्‍यात्‍म हे कृतीचे शास्‍त्र असून साधनेची कृती केल्‍यास अनुभूती येऊन आनंद मिळतो’, हे शिकायला मिळणे

वर्ष १९९७ मध्‍ये अकोला येथे सनातन संस्‍थेचे कार्य चालू झाले. माझे घराणे अत्‍यंत कर्मठ आहे. मी घरात कर्मकांडानुसार साधना करत असल्‍यामुळे मी सनातनच्‍या सत्‍संगांना जायचे मनावर घेतले नव्‍हते. एकदा माझी भाची सौ. माया पिसोळकर (माझी मोठी बहीण पू. कुसुम जलतारे (सनातनच्‍या ९५ व्‍या संत, वय ८३ वर्षे) यांची मोठी मुलगी) यांनी मला ‘तुमच्‍या घराजवळील शाळेत सनातनचा सत्‍संग होत आहे’, असे सांगितले. मी त्‍या सत्‍संगाला गेलो. तिथे रत्नागिरी येथील श्री. मिलींद खेरकाका (पू.(कै.) मंगला खेरआजी (सनातनच्‍या ५४ व्‍या संत) यांचा मुलगा) सत्‍संग घेण्‍यासाठी आले होते. त्‍यांनी त्‍या सत्‍संगात कुलदेवीच्‍या नामजपाचे महत्त्व सांगितले. तेव्‍हा मी त्‍या वेळी करत असलेल्‍या साधनेविषयी त्‍यांना सांगितले आणि अनेक प्रश्‍न विचारले. त्‍यांनी केलेल्‍या शंकानिरसनामुळे माझे काही प्रमाणात समाधान झाले. त्‍यांनी मला विचारले, ‘‘तुम्‍ही आतापर्यंत केलेल्‍या साधनेतून तुम्‍हाला काही अनुभूती आल्‍या का ?’’ मला अनुभूती कधीच आल्‍या नव्‍हत्‍या. तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘अध्‍यात्‍म हे कृतीचे शास्‍त्र आहे. तुम्‍ही जेवढी जलद कृती कराल, तेवढ्या जलद गतीने तुम्‍हाला अनुभूती येऊ शकतील आणि आनंदही मिळेल.’’

२. सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे कृती केल्‍यामुळेे आलेल्‍या अनुभूती

२ अ. कुलदेवीचा नामजप केल्‍यामुळे शक्‍ती मिळून नोकरीच्‍या काळात कुठलाही त्रास न होता अधिक सुरक्षित वाटून आनंदाची अनुभूती येणे : मी रेल्‍वेमध्‍ये फिरतीच्‍या नोकरीवर असल्‍यामुळे माझा एके ठिकाणी बसून कुलदेवीचा नामजप होत नव्‍हता. ही अडचण मी सत्‍संगातील साधकांना सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘कुठेही आणि केव्‍हाही नामजप करू शकता’, असे मला सांगितले. माझ्‍यासाठी ही फार चांगली गोष्‍ट होती. मी रेल्‍वेत गार्ड या पदावर कार्यरत होतो. माझी मालगाडीवर १० ते १२ घंटे नोकरी असे. मला नामजप करण्‍याची सवय लागल्‍यामुळे रात्री-बेरात्री माझा नामजप सतत चालू होता. त्‍यामुळे मला जागरणाचा कधीच त्रास झाला नाही. मी सतत १२ घंटे नामजप करत असल्‍यामुळे मला शक्‍ती मिळून थकवा मुळीच येत नसे, उलट आनंदच मिळत असे. माझ्‍या रेल्‍वेतील नोकरीच्‍या कार्यकाळात माझ्‍या कुठल्‍याही रेल्‍वेचा कधीही अपघात झाला नाही आणि मला पहिल्‍यापेक्षा अधिक सुरक्षित वाटू लागले. ही माझ्‍यासाठी मोठी अनुभूतीच होती.

२ आ. सत्‍संगात सेवेचे महत्त्व कळल्‍यावर सेवा करणे आणि त्‍यातून पुष्‍कळ आनंद मिळणे : सत्‍संगात सेवेचे महत्त्व सांगितले होते. मी रेल्‍वेत कामाला असल्‍यामुळे मला रेल्‍वेतून विनामूल्‍य प्रवास करण्‍याची सवलत होती; म्‍हणून उत्तरदायी साधकांनी मला मुंबईहून जिल्‍ह्यात प्रसारासाठी लागणारे साहित्‍य आणण्‍याची आणि त्‍या संदर्भातील अन्‍य सेवा दिली. मला त्‍या सेवेतून आनंद मिळू लागला; परंतु ‘मी किती मोठे काम करतो !’, असे मला वाटत असे. तेव्‍हा ‘असे वाटणे, हा ‘अहं’ आहे’, हेही मला कळत नव्‍हते.

३. सेवेसाठी प्रवास करतांना अनुभवलेली गुरुकृपा !

३ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रथम दर्शनाने भारावून जाणे : वर्ष १९९८ मध्‍ये मी अन् २ साधक मुंबईहून विदर्भासाठी लागणारे ग्रंथ आणण्‍यासाठी मुंबईला गेलो. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉ. आठवले शीव सेवाकेंद्रात रहात असत. आम्‍ही सकाळी ९ वाजता शीव सेवाकेंद्रात पोचलो. तेथील साधकांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘कल्‍याण रेल्‍वेस्‍थानकावर साधक आम्‍हाला ग्रंथांचे पार्सल (गठ्ठा) आणून देणार आहेत’’; म्‍हणून अल्‍पाहार करून आम्‍ही तिथून निघणार होतो, तेवढ्यात परम पूज्‍य (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) तिथे आले. त्‍यांनी आमची विचारपूस केली. मी त्‍यांना आमचे सर्व नियोजन सांगितले. त्‍यांच्‍या दिव्‍य दर्शनामुळे आम्‍ही भारावून गेलो. ही माझी त्‍यांच्‍याशी झालेली प्रथम भेट होती.

३ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिवसभराच्‍या सेवेचे नियोजन करून देणे : आमची परतीची रेल्‍वे रात्रीची होती. प.पू. गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्‍हाला आमच्‍या दिवसभराच्‍या वेळेचे नियोजन करून दिले. आम्‍ही निघतांना ते आम्‍हाला सोडायला जिने उतरून खालपर्यंत आले. या गोष्‍टीचे मला पुष्‍कळ कुतूहल वाटले आणि त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञताही वाटली.

३ इ. कल्‍याणसारख्‍या गर्दीच्‍या रेल्‍वेस्‍थानकावर ग्रंथांचे पार्सल घेऊन रेल्‍वेच्‍या ‘जनरल’ डब्‍यात सहजपणे चढता येणे अन् बसायला जागाही मिळणे : श्री. दादा लोटलीकर आणि श्री. आप्‍पा लोटलीकर कल्‍याण रेल्‍वेस्‍थानकावर ग्रंथांचे पार्सल घेऊन आले होते. पहिल्‍या २ गाड्यांमध्‍ये आम्‍हाला चढणे शक्‍य झाले नाही. तिसरी आणि अंतिम रेल्‍वे एक ‘एक्‍सप्रेस’ होती. तिचा ‘जनरल’चा (सर्वसामान्‍यांसाठीचा) डबा शेवटी होता; म्‍हणून आम्‍ही साहित्‍य घेऊन मागे गेलो. ‘आम्‍हाला डब्‍यात जागा कशी मिळणार ?’, या विवंचनेत आम्‍ही होतो; पण गाडी आल्‍यावर अकस्‍मात् ‘जनरल’ डब्‍यातून ३० ते ४० लोक भराभर खाली उतरले. त्‍यामुळे आम्‍हाला डब्‍यात साहित्‍य घेऊन बसायला जागाही मिळाली.

३ ई. ‘प्रवासात आलेल्‍या सर्व अडचणी केवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच सुटल्‍या’, याची जाणीव होणे : आम्‍ही अकोल्‍याला घरी पोेचेपर्यंतही काही शारीरिक अडचणी आल्‍या; पण त्‍यातून आम्‍ही सुखरूप घरी पोेचलो. रात्री मी या सर्व प्रसंगांचे चिंतन केले. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘हे सर्व आपण केले नसून देवाने (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनीच) करून घेतले आहे. आम्‍हाला शीव सेवाकेंद्रात भेटून त्‍यांनी आमचे सर्व नियोजन जाणून घेतले आणि आम्‍हाला सोडायला ते जिना उतरून खालीपर्यंत चालत आले. तेव्‍हा त्‍यांच्‍या या कृती माझ्‍या लक्षात आल्‍या नाहीत; परंतु ते सर्वज्ञ असल्‍यामुळेच आम्‍हाला प्रवासात येणार्‍या पुढील अडचणी त्‍यांना आधीच कळल्‍या होत्‍या; म्‍हणूनच आरक्षण नसतांनाही ‘जनरल’ डब्‍यात आम्‍हाला भरपूर जागा मिळाली. त्‍यानंतरही आलेल्‍या सर्व अडचणीही त्‍यांच्‍या कृपेनेच सुटल्‍या.’

३ उ. सेवा करतांना ‘साधकावर देवाचे नियंत्रण असून देवच सर्व करून घेतो’, हे लक्षात येणे : वास्‍तविक माझ्‍यामध्‍ये इतरांप्रमाणेच स्‍वभावदोष आणि अहं असल्‍यामुळे वरील प्रसंगात नोकरीच्‍या अहंकारामुळे मी भांडणे केली असती; परंतु वरील सेवेचे पूर्ण नियोजन हे परम पूज्‍यांनी केले होते. माझ्‍या वागण्‍यावर त्‍यांचेच नियंत्रण होते; म्‍हणून माझे वागणे संयमी राहिले. या प्रसंगातून ‘आपण काहीच करत नसून देवच सर्व करून घेतो’, असे या पहिल्‍याच अनुभूतीतून मला शिकता आले आणि सेवेतील आनंदही मिळाला.

४. स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाविषयी (टीप) जाणवलेली सूत्रे

४ अ. सदगुरु नंदकुमार जाधव यांनी ‘प्रतिदिन स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया करणे’ ही खरी साधना आहे’, असे सांगणे : सद़्‍गुरु नंदकुमार जाधव विदर्भात मार्गदर्शन करण्‍यासाठी येत होते. एक दिवस त्‍यांनी अकोल्‍यातील सर्व साधकांचा सत्‍संग घेतला. त्‍यांनी आम्‍हाला विचारले, ‘‘इतकी वर्षे साधना करूनही आपली प्रगती का होत नाही ?’, यावर कधी विचार केला का ? ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे तरी आपल्‍याला कळले का ?’’ तेव्‍हा मी ठराविक साचेबद्ध उत्तर दिले, ‘‘साधना म्‍हणजे ईश्‍वरप्राप्‍तीसाठी प्रतिदिन करायचे प्रयत्न.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘प्रतिदिन स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’, ही खरी साधना आहे.’ त्‍यांनी ‘निरनिराळे प्रसंग सांगून स्‍वभावदोषांमुळे आपल्‍या साधनेची हानी कशी होते ?’, हे आम्‍हाला समजावून सांगितले.

टीप : स्‍वतःमधील स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍यासाठी प्रतिदिन स्‍वतःकडून झालेल्‍या अयोग्‍य कृती किंवा विचार वहीत लिहून त्‍यापुढे योग्‍य कृती किंवा विचार लिहिणे अन् दिवसभरात १० ते १२ वेळा मनाला ती सूचना देणे

४ आ. सदगुरु नंदकुमार जाधव यांनी स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्‍यावर त्‍यांच्‍या संकल्‍पामुळे अन् गुरुचरणी शरण जाऊन प्रयत्न केल्‍यावर ते न्‍यून होऊन आनंद मिळणे : माझ्‍यामध्‍ये मनाने करणे, मला अधिक कळते, साधकांविषयी पूर्वग्रह इत्‍यादी अनेक स्‍वभावदोष आणि अहं यांचे पैलू होते. माझ्‍याकडून स्‍वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करण्‍याचे प्रयत्न पुष्‍कळ अल्‍प होत होते. सद़्‍गुरु जाधवकाका यांच्‍या संकल्‍पामुळे माझ्‍या प्रयत्नांना गती मिळाली. आता माझे मन पुष्‍कळ निर्मळ झाल्‍यामुळे साधकांविषयी प्रतिक्रिया येणे किंवा विकल्‍प येणे, पूर्वग्रह हे सर्व स्‍वभावदोष उणावले असून खर्‍या अर्थाने मला साधनेतील आनंद मिळायला लागला आहे. प्रयत्नपूर्वक, तळमळीने, सातत्‍याने आणि गुरुचरणी शरण जाऊन प्रयत्न केल्‍यामुळेच दयेचा सागर असलेल्‍या गुरुमाऊलींनी माझ्‍यावर कृपा केली.

५. कृतज्ञता

हें मजचिस्‍तव जाहलें । परि म्‍यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणिलें । तो सुटला गा ॥

– ज्ञानेश्‍वरी, अध्‍याय ४, ओवी ८१

म्‍हणजे ‘हे माझ्‍यामुळे झाले; पण मी केले नाही’, हे ज्‍याने ओळखले, तो जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून सुटला. त्‍याप्रमाणेच हे सर्व घडले. मी काहीच केले नाही. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्‍यपरममङ्‍गलम् ।’,  म्‍हणजे ‘गुरुकृपा शिष्‍याचे परम कल्‍याण करते’, हे माझ्‍या लक्षात आले. अशा थोर गुरुमाऊलींच्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– श्री. श्‍यामसुंदर राजंदेकर (वय ७७ वर्षे), अकोला.