शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !

  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अहवाल

  • महाराष्ट्राचा दर्जा घसरला

पुणे – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वर्ष २०२१-२२चा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ हा अहवाल घोषित केला आहे. यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी घसरली आहे. याआधी महाराष्ट्र दुसर्‍या श्रेणीत होता; पण वर्ष २०२१-२२च्या अहवालात महाराष्ट्र यावर्षी सातव्या श्रेणीत गेला आहे. (शिक्षणाचा दर्जा खालावत आहे, हे शिक्षण विभागाच्या लक्षात का आले नाही ? शिक्षण विभागाकडून शिक्षणाच्या दर्जाचे वेळोवेळी अवलोकन केले जात नाही का ? – संपादक) विशेष म्हणजे देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

१. ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ या अहवालात शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यात येते. त्यानुसार एकूण ७३ निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. फलनिष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापन या २ गटांत हे निकष विभागण्यात आले, तसेच त्यानंतर त्यांची ६ क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली. अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण, समानता, उपलब्धता आदींचा यात समावेश होता.

२. या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्‍चित करण्यात आली. या मूल्यमापनामध्ये महाराष्ट्र राज्याला ५८३.२ गुण मिळाले. यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे.

संपादकीय भूमिका

मॅकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचे फलीत ! भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्‍वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !