|
रत्नागिरी – तालुक्सातील नाचणे ग्रामपंचायतीने सिद्ध केलेला मैला गाळव्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे. जिल्हा पथकाने या प्रकल्पासाठी चांगले योगदान दिले आहे, असे मत पथकप्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या राज्यस्तरीय तपासणी पथकाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. यामध्ये नाचणे ग्रामपंचायतीचा समावेश होता.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पथक प्रमुख यांनी या पथकाचे स्वागत केले. राज्यस्तरीय समितीकडून रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत नाचणे, कुरतडे, खरवते आणि कोतवडे; संगमेश्वर तालुक्यातील सांगवे आणि आरवली; मंडणगड तालुक्यातील पालघर आणि दहागाव; दापोली तालुक्यातील ग्रामपंचायत टाळसुरे, जालगाव आणि गिम्हवणे; गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत खामशेत आणि कौंढर काळसुरे; तसेच चिपळूण तालुक्यातील सावर्डे या १५ ग्रामपंचायतींना भेट देऊन राज्यस्तरावरील मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी करण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबाचे सर्वेक्षण करून शौचालय बांधकाम आणि शौचालय प्रकाराची तपासणी करण्यात आली. कुटुंबस्तरीय कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरण माहिती संकलित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत, तसेच कुटूंबस्तरामधील शौचालय आणि पाण्याची सुविधा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामधील स्वच्छता आणि शौचालय सुविधा पहाणी करण्यात आली.
सार्वजनिक शौचालयातील मैला गाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी १ कोटी २७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून नदीत जाणारा मैला रोखण्याचे काम केले असल्याचे पथकप्रमुख सचिन जाधव यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांनी सविस्तर प्रकल्पाची माहिती दिली.