चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

नवी देहली – भारताने ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ म्हणून चीनला मागे टाकले आहे. जगभरातील ८५ सार्वभौम संपत्ती संस्था आणि ५७ केंद्रीय बँका यांनी एकमुखाने हे मत मांडले आहे, असा अहवाल गुंतवणूक व्यवस्थापनाशी संबंधित जागतिक आस्थापन ‘इन्व्हेस्को’ने जारी केला आहे. या अहवालात सहभागी झालेल्या या संस्था आणि बँका यांची एकूण मालमत्ता १ सहस्र ७३४ लाख कोटी रुपयांहून अधिकची (२१ ट्रिलियन डॉलर्सची) आहे.

या अहवालानुसार भारताकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असून त्याची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत. या अहवालानुसार भारताच्या जोडीला मेक्सिको, ब्राझिल आणि दक्षिण कोरिया या देशांकडेही गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे.