अक्षयकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात अयोग्य पद्धतीने दाखवणारा ‘ओ.एम्.जी. -२’ चित्रटाचा ‘टीझर’ प्रदर्शित !

देवतांचा अवमान न करण्याची धर्माभिमानी हिंदूंची सामाजिक माध्यमांवरून तंबी !

मुंबई – अभिनेते अक्षयकुमार यांना भगवन शिवाच्या रूपात आणि आधुनिक कपड्यांमध्ये रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवणारा ‘ओ.एम्.जी.-२’ या चित्रपटाचा ‘टीझर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ‘टीझर’ (टीझर म्हणजे चित्रपटातील काही अंश दाखवून केलेले विज्ञापन) प्रदर्शित झाल्यानंतर धर्माभिमानी हिंदूंनी ‘या चित्रपटातून हिंदूंच्या देवतांच्या अवमान करण्यात येऊ नये’, अशी तंबी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे.

या ‘टीझर’मध्ये कपाळाला भस्म, मस्तकावर जटा, गळ्यात रूद्राक्षाची माळ, नीळा कंठ या भगवान शिवाच्या रूपात अभिनेते अक्षयकुमार रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये भगवान शिव मानवाच्या रूपात पृथ्वीवर अवतरित झाल्याचे चित्रपटाच्या ‘टीझर’मधून दिसून येत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटामध्ये भगवान श्रीकृष्ण मानवीरूपात पृथ्वीवर अवतरित झाल्याचे दाखवण्यात आले होते. यामध्ये भगवंताचे मानवीकरण दाखवतांना अयोग्य संवाद असल्याने या चित्रपटाला धर्माभिमानी हिंदूंकडून विरोध करण्यात आला होता. ‘ओ.एम्.जी. -२’ हा चित्रपट ‘ओ माय गॉड’चा पुढचा भाग आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये प्रभु श्रीराम, माता सीता, हनुमंत या सर्व देवतांची वेशभूषा आणि त्यांच्या तोंडी असलेला संवाद आधुनिक पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे हिंदूंनी याविषयी असंतोष व्यक्त केला होता. यामुळे अनेकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. मागील काही वर्षे सातत्याने हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

संपादकीय भूमिका

अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अयोग्य पद्धतीने दाखवण्याचे धैर्य चित्रपट निर्मात्यांमध्ये आहे का ?