‘वर्ष १९८४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे माझ्या जीवनात येऊन त्यांनी मला प्रत्यक्ष सहवास दिला. त्यांनी मला पुनःपुन्हा साधना सांगून माझ्याकडून ती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मला विविध संधी उपलब्ध करून दिल्या. गुरु आणि देव यांवर दृढ श्रद्धा बसण्यासाठी त्यांनी मला दिव्य अनुभूती दिल्या. माझ्या अनेक गंभीर चुका मातेच्या वात्सल्याने पोटात घालून त्यांनी मला कधीही दूर लोटले नाही. आतापर्यंत प.पू. गुरुदेवांनी मला दिलेल्या अनेक अनुभूती आणि माझ्याकडून करवून घेतलेले साधनेचे प्रयत्न मी कृतज्ञतापूर्वक त्यांच्याच चरणी अर्पण करतो.
भाग १
१. प.पू. डॉक्टरांचा परिचय होणे
१ अ. प.पू. डॉक्टरांनी कुठलेही औषध न देता ३ वर्षांच्या मानसिक तणावातून ४ दिवसांत बाहेर काढणे : गुरुदेवांची प्रथम भेट झाली, त्या आधी २ – ३ वर्षे मी काही चुकीच्या विचारांमध्ये गुंतल्यामुळे मानसिक तणावाखाली होतो. त्याच कालावधीत माझा मित्र श्री. दिलीप गोवेकर, कडावल, ता. कुडाळ याने मला सांगितले, ‘‘डॉक्टर आठवले यांची दैनिक सकाळमध्ये व्याख्यानमाला चालू आहे आणि ते मार्गदर्शन करतात. तू मुंबईला जाशील, तेव्हा त्यांना भेट.’’ त्याप्रमाणे मी ऑक्टोबर १९८४ मध्ये गुरुदेवांच्या मुंबई येथील चिकित्सालयात गेलो. गुरुदेवांनी मला ४ दिवसांत माझ्या चुकीच्या विचारांतून पूर्णतः बाहेर काढले आणि त्याच वेळी ‘स्वयंसूचना कशा द्यायच्या ?’, हेही शिकवले. मी अनेक वर्षे चुकीच्या विचारांत राहून मानसिक तणावाखाली होतो; पण एक रुपयाचेही औषध न देता गुरुदेवांनी मला पुनर्जन्म दिला. चौथ्या दिवशी मी त्यांच्या चिकित्सालयातून निघतांना गुरुदेव म्हणाले, ‘‘हे तुम्ही पुढे इतरांनाही शिकवू शकता.’’
१ आ. ‘मानसिक उपायांपेक्षाही आध्यात्मिक स्तरावरील उपाय हाच अंतिम आणि सर्वाेच्च असतो’, याचे बीज मनात रोवणे : या ४ दिवसांमध्ये मला गुरुदेवांनी ‘स्वयंसूचना कशा द्यायच्या ?’, हे शिकवले. चिकित्सालयाच्या बाहेरच्या खोलीत अध्यात्माविषयीच्या माहितीचे तक्ते लावलेले होते. त्या वेळी गुरुदेव मला म्हणाले, ‘‘ते वाचा. हाच खरा उपाय आहे.’’
१ इ. ‘मन अस्वस्थ आहे’, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतांना तिकडे दुर्लक्ष करून साधना आणि सेवा यांचा संस्कार करणे :
त्यानंतर पुन्हा वर्ष १९८९ मध्ये मी मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुदेवांच्या भेटीसाठी गेलो. त्या वेळी गुरुदेवांनी मला ‘‘तुम्ही येथे किती वेळ आहात ?’’, असे विचारले आणि काही लिखाण पडताळायला सांगितले. त्या वेळी मला ‘सेवा म्हणजे काय ?’, हे काहीच ठाऊक नव्हते. त्यानंतर प.पू. गुरुदेवांनी मला एक आराखडा (नकाशा) दाखवला आणि म्हणाले, ‘‘इथे आपल्याला आश्रम बांधायचा आहे.’’ मी त्यांचे बोलणे ऐकत होतो.
गुरुदेवांनी मला ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाची ‘सायक्लोस्टाइल’ प्रत दिली (त्या काळी झेरॉक्स सुविधा नव्हती; म्हणून हाताने लिहिलेले लिखाणाची ‘सायक्लोस्टाइल’ प्रत काढली जायची.) आणि ती वाचायला सांगितली.
१ ई. प्रत्यक्ष साधनेत नसतांनाही साधक म्हणून ओळख करून देणे : त्यानंतर पुन्हा ८ वर्षांचा कालावधी गेला. १९९७ मध्ये मी गुरुदेवांच्या प्रवचनाला लांजा (रत्नागिरी) येथे गेलो. मी पहिल्याच रांगेमध्ये प्रवचनाला बसलो होतो. सभेच्या आरंभी त्या भागातील साधनेत नवीन आलेले साधक व्यासपिठावर येऊन त्यांची ओळख सांगायचे. कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर नवीन साधक व्यासपिठावर येऊन त्यांचे नाव आणि गाव सांगत होते. मला सनातन संस्था आणि साधना यांची काहीच ओळख नव्हती, तरीही मला कुणीतरी उठवून नेले, त्याप्रमाणे मी त्या साधकांच्या रांगेत उभा राहिलो आणि ‘गजानन मुंज, पाचल’ अशी ओळख सांगितली अन् पुन्हा जागेवर येऊन बसलो. ‘मी कसा गेलो ? का गेलो ?’, हे मला काहीही कळले नाही.
२. पाचल, राजापूर येथे प्रसार
२ अ. साधक म्हणून ओळख करून दिलेल्या संदर्भावरून गुरुदेवांनी साधनेत खेचून घेणे : या प्रवचनातून मला साधनेविषयी माहिती कळली आणि ती आवडली. साधारण ७ – ८ मासांचा कालावधी लोटला. ‘पाचल’, हे मोठे गाव असल्यामुळे तिकडे प्रसार करायचा’, असे लांजा येथील श्री. उदय केळुसकर यांना वाटत होते. ‘तिथे जायचे कुणाकडे ?’, यासंदर्भात त्यांना काही संदर्भ मिळत नव्हता. एकदा केळुसकर पती-पत्नी लांजा येथील सभेची ध्वनीफित (कॅसेट) ऐकत होते. ऐकतांना त्यांना ‘गजानन मुंज, पाचल’, असे नाव ऐकायला मिळाले. तो संदर्भ घेऊन श्री. केळुसकर पाचलला आमच्याकडे आले. तेव्हा त्यांनी मला साधना सांगितली आणि प्रवचन ठरवले. पुढच्या १ – २ मासांमध्ये त्या भागांमध्ये पुष्कळ प्रसार झाला.
३. प.पू. डॉक्टरांचा सहवास आणि कृतीतून शिकवणे
३ अ. आमच्या साध्या घरात अधिक काही सुखसोयी नसतांना गुरुदेव ३ दिवस आनंदाने रहाणे : त्या वेळी गुरुदेवांच्या गावोगावी सभा होत असत. ‘पाचलला सभा घ्यायची आहे’, असे केळुसकर आणि काही मंडळींनी सांगितले. पाचलची सभा निश्चित झाली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘गुरुदेव तुमच्याकडे रहातील.’’ आमचे घर साधे होते. घरात फारशा सोयी नव्हत्या, तरीही केळुसकर म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर इथेच रहातील.’’ त्या वेळी मला पुष्कळ ताण आला होता.
३ आ. आपल्याजवळ कुणालाही घरी न ठेवता गुरुदेवांनी साधकांना प्रसाराला पाठवणे : आम्ही दोघेही पती-पत्नी शिक्षक असल्यामुळे दुसर्या दिवशी गुरुदेव आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही शाळेत गेलात, तरी चालेल. आता मला घरातील सगळे ठाऊक झाले आहे. मी मला हवे, ते घेऊ शकतो.’’ सभेच्या दिवशी सकाळी आम्ही घरातच होतो. तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘जवळपासच्या भागात जाऊन प्रसार करा. लोकांना सांगा. सांगितले, तरच लोक येतील.’’ पाचलची सभा संपल्यानंतर गुरुदेव, श्री. विजय कदम आणि मी घरी आलो. गुरुदेव म्हणाले, ‘‘सभेसाठी लांबून लोक आले आहेत. त्यांच्या जाण्याची व्यवस्था करायला हवी. मला आता घरातील सगळे ठाऊक झाले आहे. तुम्ही पटांगणात सेवेला जा.’’
३ इ. त्या रात्री जेवण झाल्यावर एक जिज्ञासू घरी आले होते. ते पुष्कळ वेळ ‘गुरुदेवांनी गुरुमंत्र द्यावा’, यासाठी हटून बसले होते. जोरजोरात वाद घालत होते. गुरुदेव शांतपणे सगळे ऐकत होते आणि त्यांना शास्त्र समजावून सांगत होते. गुरुदेवांनी अत्यंत शांतपणे प्रसंग हाताळला आणि आम्हाला प्रसंगातून शिकवले.
३ ई. गुरुदेवांनी साधकांचे केलेले कौतुक : ५.१२.१९९७ या दिवशी राजापूरची सभा संपवून प.पू. डॉक्टर सायंकाळी सातच्या सुमारास पाचलला आले. मी दिवसभर राजापूरला होतो. माझ्या मित्रांनी गेटपासून घराच्या दरवाजापर्यंत कमान उभारली होती. विजेच्या माळा सोडल्या होत्या. गुरुदेव फाटकाजवळ येताच कौतुकाने म्हणाले, ‘‘संत येती घरा, तोची दिवाळी दसरा !’’
४. प.पू. डॉक्टर पाचल येथील घरात राहून गेल्यानंतर आलेल्या अनुभूती
४ अ. सौ. विजया मुंज (पत्नी) यांना शाळेतून एकही दिवस सुटी मिळत नसे; परंतु गुरुदेव घरी असेपर्यंत त्या ३ दिवस शाळेत गेल्या नाहीत. त्यांना वाटले, ‘आता शाळेत गेल्यानंतर अध्यक्ष त्यांना धारेवर धरतील’; परंतु ते एक शब्दही बोलले नाहीत.
४ आ. प.पू. डॉक्टर पाचल येथील घरात राहून गेल्यानंतर आधुनिक वैद्य जगदीश रेडीज यांना ८ दिवस घरावर सुदर्शनचक्र फिरतांना दिसणे : पाचल येथील आधुनिक वैद्य जगदीश रेडीज त्यांच्या पत्नीला चिकित्सालयात सोडायला प्रतिदिन सकाळी १० वाजता आमच्या घरासमोरील मार्गावरून जात असत. आधुनिक वैद्य रेडीज यांनी सत्संगात सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टर येऊन गेल्यानंतर सलग ८ दिवस मला जाता-येता तुमच्या घरावर सुदर्शनचक्र फिरतांना दिसत होते.’’
४ इ. एका ग्रामस्थाला प.पू. डॉक्टर श्रीकृष्णाच्या रूपात दिसणे : ६.१२.१९९७ या दिवशी पाचल येथील सभा झाली. या सभेला आजूबाजूच्या गावांतील लोक आले होते. तळवडे येथे आम्ही शिक्षक होतो आणि तेथील ग्रामस्थही आले होते. एक रबसे नावाचे ग्रामस्थ म्हणाले की, मला प.पू. डॉक्टर श्रीकृष्णाच्या रूपात दिसले आणि सर्वत्र पिवळा प्रकाश दिसला.
४ ई. प.पू. डॉक्टर येऊन गेल्यानंतर पुढील दोन मासांत पाचल परिसरात १३ सत्संग चालू झाले.
४ उ. गुरुदेव घरी राहिले असतांना ३ रात्री डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहाणे आणि रात्रभर झोप न येताही दुसर्या दिवशी प्रसन्न वाटणे : गुरुदेव आमच्या घरात एका छोट्या खोलीत रहात होते आणि त्या खोलीच्या बाहेरच्या बाजूला दाराच्या बाहेर मी झोपायचो. ते तीनही दिवस मी झोपलो नाही. माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहात असायच्या, तरीही मला दुसर्या दिवशी प्रसन्न आणि उत्साही वाटत होते. त्या वेळी ‘याला सात्त्विक भाव म्हणतात’, हे मला ठाऊक नव्हते.
४ ऊ. गुरुदेव रहात असलेल्या खोलीत ८ दिवस कस्तुरीचा सुगंध येणे : गुरुदेव ज्या खोलीत रहात होते, त्या खोलीमध्ये ८ दिवस कस्तुरीचा सुगंध येत होता. माझी मुलगी कु. बागेश्री (विवाहानंतरचे नाव सौ. बागेश्री पुंगलिया, कात्रज, पुणे) त्या वेळी ८ वर्षांची होती. गुरुदेव मुंबईला गेल्यावर सुगंध निघून जाईल; म्हणून ती गुरुदेव राहिलेल्या खोलीचे दार बंद करून घ्यायची.
४ ए. सुगंधाच्या अनुभूतीने भाऊ रमेश मुंज साधनेला लागणे : गुरुदेव येऊन गेल्यानंतर ८ दिवसांनी माझा मोठा भाऊ श्री. रमेश मुंज पाचलला आला होता. त्यालाही सुगंधाची अनुभूती आली आणि तो मुंबईत सत्संगाला जाऊ लागला. त्या सुगंधाच्या अनुभूतीने त्याच्या साधनेला आरंभ झाला. त्यानंतर २ वर्षांनी तो पूर्ण वेळ साधना करू लागला.
४ ऐ. गुरुदेवांच्या ३ दिवसांच्या सत्संगानंतर स्वतःमध्ये झालेले पालट : गुरुदेव ३ दिवस राहून पुढील प्रवासासाठी गेले आणि मी शाळेत जाऊ लागलो. शाळेत गेल्यानंतर मी चालतांना गुरुदेवांप्रमाणे अगदी हळूहळू चालत होतो. त्यांच्याप्रमाणे हळू बोलत होतो. माझा संपूर्ण देह हलका झाला होता. ‘चालतांना हवेत तरंगत आहे’, असे मला वाटत होते. पुढचे काही दिवस मी प्रवचन घेतांना गुरुदेवांप्रमाणेच बोलायचो. ‘माझा आवाजही तसाच होता’, असे अनेकांनी सांगितले. ‘आनंदाची ही स्थिती आता अशीच राहील’, असे मला वाटत होते; मात्र काही दिवसांनंतर मी पुन्हा मूळ स्थितीला आलो.’
– श्री. गजानन मुंज (वय ६८ वर्षे ), ओरोस केंद्र, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. (२६.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |