नगर – येथील बडीसाजन ओसवाल श्री संघ कार्यालयात १८ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा शुभारंभ शोभायात्रेने करण्यात येणार असून त्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. फुलगांव येथील श्रृतीसागर आश्रमाचे पिठाधिपती प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या सुशिष्या प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या रसाळ अमृतवाणीमधून शुद्ध मराठी भाषेत श्रीरामकथेचे निरूपण होणार आहे. स्व.सौ. ताराबाई श्रीनिवास झंवर यांच्या स्मरणार्थ हा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. माळीवाड्यातील श्रीविशाल गणपतीचे महापूजन करून कार्यक्रम पत्रिका वाटपाचा शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती श्री. श्रीनिवास झंवर यांनी दिली.
प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते श्रीविशाल गणपतीचे महापूजन करून सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती करण्यात आली. याप्रसंगी स्वामी शिवानंद, महंत संगमनाथ महाराज, विशाल गणपतति देवस्थानचे अध्यक्ष अभयराव आगरकर, विश्वस्त अशोकराव कानडे, पंडितराव खरपुडे, रंगनाथ फुलसोंदर, गजानन ससाणे, पांडुरंग नन्नवरे, नितीन पुंड यांच्यासह वसंतशेठ लोढा, पोपटशेठ लोढा, झंवर परिवार आणि भाविक उपस्थित होते. या वेळी विशाल गणपति मंदिराचे जिर्णोध्दारासाठी झंवर परिवाराच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
१८ ते २६ जुलै २०२३ या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सलग ९ दिवस प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या अमृतवाणीमधून श्रीरामकथा श्रवण करण्याची पर्वणी नगरकरांना मिळणार आहे. २७ जुलैला सकाळी ९ ते ११.३० या वेळेत श्रीसालासर सत्संग मंडळाचे संगीतमय सुंदरकांड होईल. त्यानंतर दुपारी १२ ते २.३० या कालावधीत महाप्रसाद कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होईल.
श्रीरामभक्तांनी मोठ्या संख्येने या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्वश्री गणेश झंवर, मुकुंद झंवर, डॉ. राहुल झंवर, अनिल झंवर, अरूण झंवर, राजगोपाल झंवर, मनिष झंवर आदींनी केले आहे.